मुंबई : स्थानिक स्वराज्य संस्थांमधून निवडून द्यायच्या विधानपरिषद आमदारांच्या निवडणुकीला अखेर जून महिन्याचा मुहूर्त लागेल अशी लक्षणे आहेत. गेली चार वर्षे विविध कारणांनी रखडलेली स्थानिक स्वराज्य संस्था प्राधिकारीसाठीची सोळा जागांची निवडणूक जून महिन्यात होण्याची दाट शक्यता आहे. यासोबतच नागपूर स्थानिक स्वराज्य प्राधिकारी मतदारसंघाचीही पोटनिवडणूक घेतली जाईल अशी शक्यता आहे. त्यामुळे मे महिन्यात ९ जागांसाठीच्या निवडणुकांपाठोपाठ लगेच जूनमध्ये महायुती व महाआघाडी आमनेसामने येणार आहेत.
आधी कोरोनाचे संकट आणि नंतर इतर मागासवर्गाच्या आरक्षणाचे सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित प्रकरण यामुळे राज्यातील पालिका तसेच जिल्हा परिषदांच्या निवडणुका बराच काळ झाल्या नव्हत्या. तेथे प्रशासकाची राजवट असल्याने मतदारच अस्तित्वात नव्हते. आता राज्यातील बहुतांश स्थानिक निवडणुका पार पडल्या आहेत. काही ठिकाणी जिल्हा परिषदांच्या निवडणुका अजूनही झालेल्या नसल्या तरी त्या जिल्ह्यांमध्ये इतर मतदारांची संख्या पुरेशी आहे.
त्यामुळे राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने याबाबतचा प्रस्ताव भारत निवडणूक आयोगाला सादर केला आहे. १२ मे रोजी होऊ घातलेल्या विधान परिषदेच्या ९ जागांची आणि एका जागेच्या पोटनिवडणुकीची प्रक्रिया पार पडल्यानंतर निवडणूक आयोगाकडून विधान परिषदेच्या १७ जागांसाठी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होऊ शकतो, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयातील सूत्रांनी दिली.
निवडणूक होऊ घातलेल्या १७ मतदारसंघाच्या नावाची आणि संबंधित मतदारसंघातील मतदारांच्या संख्येची माहिती आयोगाला पाठवण्यात आली आहे. या १७ मतदारसंघातील काही मतदारसंघात जिल्हा परिषदेचे सदस्य नसले तरी येथे ७५ टक्के मतदार संख्येची पूर्तता होत असल्याने निवडणूक घेण्यात कोणतीही अडचण नसल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यामुळे या निवडणुकीचा कार्यक्रम मे महिन्यात जाहीर होऊन प्रत्यक्ष मतदान जूनच्या दुसऱ्या, तिसऱ्या आठवड्यात होण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली.विधान परिषदेच्या अहमदनगर, सोलापूर यासारख्या स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाची मुदत १ जानेवारी २०२२ रोजी संपली आहे. तर काहींची मुदत २०२४ मध्ये संपली आहे. गेल्या वर्षीच्या अखेरीस आणि या वर्षीच्या सुरुवातीला राज्यातील बहुतांश महापालिका, नगरपालिका, नगर पंचायत, कटक मंडळे आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका पार पडल्याने विधान परिषदेवर जाण्यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांचे डोळे स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या निवडणुकीकडे लागले आहेत.चौकटनागपूरमध्ये पोटनिवडणूकदरम्यान, निवडणूक होऊ घातलेल्या स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या १७ जागांमध्ये नागपूर पोटनिवडणुकीचा समावेश आहे. महसूल मंत्री आणि भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे हे २०२२ मध्ये नागपूर स्थानिक प्राधिकारी मतदारसंघातून निवडून आले होते. मात्र, २०२४ मध्ये ते विधानसभेवर निवडून आल्याने नागपूरची जागा सध्या रिक्त आहे. या जागेची मुदत १ जानेवारी २०२८ पर्यंत असल्याने येथे पोटनिवडणूक होईल.चौकटविधान परिषदेचे स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ आणि कंसात मतदारांची संख्यासोलापूर (५९५), अहमदनगर (४६१), ठाणे - पालघर (१०५४), जळगाव (५२६), सांगली - सातारा (८५३), नांदेड (४३२), यवतमाळ (४०५), पुणे ( ७९८), भंडारा - गोंदिया (४५७), रायगड - रत्नागिरी - सिंधुदुर्ग (९४७), नाशिक ( ५८१), वर्धा - चंद्रपूर - गडचिरोली (९७७), अमरावती (४५३), उस्मानाबाद - लातूर - बीड (१०५१), परभणी तथा हिंगोली (४६८) औरंगाबाद तथा जालना (५८०) आणि नागपूर (७६१).