विधान परिषद निवडणूक : आघाडीत शह-काटशहचे राजकारण; उद्धव ठाकरेंनी निवडणूक लढवावी - राष्ट्रवादी, ठाकरे नसतील तर उमेदवार कोण? - काँग्रेस

विधान परिषदेच्या द्विवार्षिक निवडणुकीच्या निमित्ताने विरोधी पक्ष महाविकास आघाडीत शह-काटशहचे राजकारण रंगले आहे.
उद्धव ठाकरेंनी निवडणूक लढवावी - राष्ट्रवादी, ठाकरे नसतील तर उमेदवार कोण? - काँग्रेस
उद्धव ठाकरेंनी निवडणूक लढवावी - राष्ट्रवादी, ठाकरे नसतील तर उमेदवार कोण? - काँग्रेस
Published on

मुंबई : विधान परिषदेच्या द्विवार्षिक निवडणुकीच्या निमित्ताने विरोधी पक्ष महाविकास आघाडीत शह-काटशहचे राजकारण रंगले आहे. ही निवडणूक माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लढवावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्याध्यक्षा सुप्रिया सुळे यांनी गुरुवारी केली, तर उद्धव ठाकरे नसतील महाविकास आघाडीचा उमेदवार कोण? अशी विचारणा काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.

उद्धव ठाकरेंनी निवडणूक लढवावी - राष्ट्रवादी, ठाकरे नसतील तर उमेदवार कोण? - काँग्रेस
महाराष्ट्र विधान परिषदेच्या १० जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ मे रोजी मतदान

विधान परिषदेच्या ९ जागांसाठी येत्या १२ मे रोजी निवडणूक होत आहे. या निवडणुकीत विधानसभा सदस्य मतदान करणार आहेत. उमेदवाराला पहिल्या फेरीत निवडून येण्यासाठी २९ मतांची आवश्यकता आहे. विधानसभेत महाविकास आघाडीचे शिवसेना ठाकरे गट, काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे मिळून ४६ आमदार आहेत. विधानसभेतील संख्याबळ लक्षात घेता या निवडणुकीत विरोधी पक्ष महाविकास आघाडीची एक जागा हमखास निवडून येईल. या एका जागेवरून काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटात जोरदार रस्सीखेच सुरू आहे.

नुकत्याच पार पडलेल्या राज्यसभा निवडणुकीवेळी काँग्रेसने एका जागेवर हक्क सांगितला होता. मात्र, आघाडीला ही जागा राष्ट्रवादीच्या शरद पवारांना सोडावी लागली. त्यामुळे आता काँग्रेसने विधान परिषदेच्या जागेवर दावा सांगितला आहे. याबाबत काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटात चर्चा सुरू असताना राष्ट्रवादीने उद्धव ठाकरे यांनी निवडणूक लढवण्याची मागणी केल्याने काँग्रेसमध्ये नाराजी आहे.

सपकाळ यांनी घेतली ठाकरेंची भेट

विधान परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली असताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी गुरुवारी 'मातोश्री'वर जाऊन शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीत विधान परिषदेच्या जागेबाबत चर्चा झाल्याचे समजते. मात्र, सकपाळ यांनी या चर्चेचा इन्कार केला. महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षांत योग्य संवाद राहावा यासाठी ही भेट होती. विधान परिषद निवडणुकीसंदर्भात काँग्रेस पक्षाची भूमिका स्पष्ट आहे. राज्यसभा निवडणूक काँग्रेसने लढवावी आणि उद्धव ठाकरे हे आघाडीचा चेहरा असल्याने त्यांनी विधान परिषद लढवावी, अशी भूमिका यापूर्वीच जाहीर केलेली आहे, असे हर्षवर्धन सपकाळ यांनी ठाकरेंच्या भेटीनंतर प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितले.

विधान परिषदेची ही निवडणूक माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीच लढावी, अशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आग्रहाची विनंती आहे. उद्धवजी हे राज्यातील ज्येष्ठ आणि अनुभवी नेते आहेत. त्यांच्या अनुभवाचा राज्याला तसेच सभागृहाला सदैव फायदाच होत राहील. उद्धवजींनी या मागणीचा सकारात्मक विचार करावा.

सुप्रिया सुळे (कार्याध्यक्ष, राष्ट्रवादी शरद पवार गट)

विधान परिषद निवडणुकीत उद्धव ठाकरे उमेदवारी स्वीकारत असतील तर स्वागतच. अन्यथा महाविकास आघाडीचा उमेदवार कोण? यावर तिन्ही पक्षांनी समन्वयाने निर्णय घ्यावा. तसेच पुढील राज्यसभा जागेबाबतही आताच स्पष्टता आवश्यक आहे.

विजय वडेट्टीवार (विधिमंडळ पक्षनेते, काँग्रेस)

logo
marathi.freepressjournal.in