महाराष्ट्र

सोलापुरात मविआची ताकद वाढली; काँग्रेस उमेदवार प्रणिती शिंदेंना आडम मास्तर यांचा पाठिंबा

Swapnil S

विशेष प्रतिनिधी/मुंबई

सोलापूरमध्ये महाविकास आघाडीने प्रचारात आघाडी घेतली असून, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या कन्या आणि काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांचे बळ दिवसेंदिवस वाढत चालले आहे. काही दिवसांपूर्वीच माजी आमदार दिलीप माने यांनी पुन्हा काँग्रेस पक्षात प्रवेश केला. त्यामुळे सोलापूर दक्षिणमधून प्रणिती शिंदे यांना पाठबळ मिळाले. यासोबतच माजी आमदार आडम मास्तर यांनीदेखील सोमवारी थेट प्रणिती शिंदे यांची भेट घेऊन खंबीर साथ देण्याची भूमिका घेतली. त्यामुळे प्रणिती शिंदे यांची सोलापुरात ताकद वाढली आहे. विशेष म्हणजे माजी आमदार दिलीप माने आणि माजी आमदार आडम मास्तर या दोघांनीही प्रणिती शिंदे यांच्या विरोधात निवडणूक लढविलेली आहे. त्यांचा पाठिंबा प्रणिती शिंदे यांची ताकद वाढविणारा आहे.

सोलापूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे आणि भाजपचे उमेदवार राम सातपुते या तरुण नेत्यांमध्ये थेट लढत होईल, अशी शक्यता वाटत होती. मात्र, वंचित बहुजन आघाडी आणि आता एमआयएमही मैदानात उतरणार असल्याने याचा फटका प्रणिती शिंदे यांनाच बसू शकतो, असे मानले जात आहे. त्यामुळे प्रणिती शिंदे यांची कोंडी होणार की काय, अशी शक्यता व्यक्त केली जात होती. अशा स्थितीत माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे मतदारसंघात आपले गणित जुळवून आणण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यातूनच नाराज होऊन शिवसेनेत दाखल झालेले माजी आमदार दिलीप माने यांना पुन्हा स्वगृही आणण्यात यश मिळविले. त्यांच्यामुळे दक्षिण सोलापुरात काँग्रेसला बळ मिळणार आहे. यासोबतच आता प्रणिती शिंदे यांचे कट्टर विरोधात माजी आमदार आडम मास्तर यांनीदेखील प्रणिती शिंदे यांना जाहीर पाठिंबा दिला. माजी आमदार आडम मास्तर यांची सोलापुरात फार मोठी ताकद आहे. ते माकपचे नेते आहेत. त्यांच्या पाठिंब्यामुळे सोलापुरात प्रणिती शिंदे यांची ताकद वाढली आहे.

प्रणिती शिंदे यांनी सोमवारी माकपच्या कार्यालयात जाऊन माजी आमदार नरसय्या आडम यांची भेट घेतली. त्यावेळी आडम मास्तर यांनी प्रणिती शिंदे यांना पाठिंबा जाहीर केला. यावेळी त्यांनी सर्व कामगार आपल्या पाठीमागे उभे राहतील, अशी ग्वाही दिली. या अगोदर आडम मास्तर प्रणिती शिंदे यांचे कट्टर विरोधक म्हणून ओळखले जात होते. कारण प्रणिती शिंदे यांच्या विरोधात विधानसभा निवडणुकीत ते पराभूत झाले होते. त्यामुळे त्यांच्या मनात प्रणिती शिंदे यांच्याबद्दल राग होता. परंतु आता माकपही महाविकास आघाडीत असल्याने त्यांनी प्रणिती शिंदे यांना साथ देण्याची भूमिका घेतली आहे. त्यामुळे सोलापुरात महाविकास आघाडी मजबूत झाली आहे.

सोलापूर मध्य मतदारसंघ माकपला सोडण्याची अपेक्षा

याअगोदर नरसय्या आडम यांनी सोलापूर मध्य विधानसभा मतदारसंघ माकपला मिळावा, अशी अपेक्षा व्यक्त करीत तसा निर्णय होत असेल तर आपण प्रणिती शिंदे यांना पाठिंबा जाहीर करू, असे म्हटले होते. दरम्यान, या संदर्भात आडम मास्तर यांनी थेट शरद पवार, उद्धव ठाकरे आणि नाना पटोले यांच्याशी चर्चा केली आहे. त्यावेळी काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांच्याशी चर्चा करून निर्णय घ्यावा, असे ठरले असल्याचे बोलले जात आहे. या प्रस्तावाला खुद्द सुशीलकुमार शिंदे यांनीही ग्रीन सिग्नल दिला असल्याचे समजते.

'त्या' कंपनीचे अजून ८ बेकायदा होर्डिंग्ज, BMC ची रेल्वेला नोटीस; पालिकेने होर्डिंग हटवल्यास खर्च रेल्वेकडून वसूल करणार

३० होर्डिंग्जचे नूतनीकरण स्थगित: स्ट्रक्चरल स्टॅबिलिटी प्रमाणपत्र सादर न केल्याने दणका

पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या दीड तासांचा ब्लॉक, 'या' वेळेत वाहतूक राहणार बंद

मध्य रेल्वे मार्गावर रविवारी ब्लॉक; पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांना दिलासा

येत्या आठवड्यात बारावीचा निकाल