महाराष्ट्र

पुणे जिल्ह्यावर महायुतीचा झेंडा; २१ पैकी १८ जागा जिंकल्या

Maharashtra Assembly Elections Results 2024: पुणे जिल्हय़ातील २१ पैकी १८ विधानसभा मतदारसंघात बाजी मारत महायुतीने शनिवारी विजयाचा झेंडा फडकवला. बारामतीत अपेक्षेप्रमाणे राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी सरशी साधल्याने लोकसभेत ताई आणि विधानसभेत दादा हाच मतदारांचा वादा असल्याचे दिसून आले.

Swapnil S

पुणे : पुणे जिल्हय़ातील २१ पैकी १८ विधानसभा मतदारसंघात बाजी मारत महायुतीने शनिवारी विजयाचा झेंडा फडकवला. बारामतीत अपेक्षेप्रमाणे राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी सरशी साधल्याने लोकसभेत ताई आणि विधानसभेत दादा हाच मतदारांचा वादा असल्याचे दिसून आले. तर कोथरूडमधून भाजपाचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत पाटील यांनी लाखभर मतांनी विजय मिळवित आपला प्रभाव दाखवून दिला. राज्याप्रमाणे पुणे जिल्हय़ातही लाडक्या बहिणींचा कौल महत्त्वाचा ठरल्याचे मानले जात आहे.

पुणे जिल्हय़ात विधानसभेच्या एकूण २१ जागा असून, जिल्हय़ात ६० टक्क्यांवर मतदान झाले होते. त्यामुळे जिल्हा नेमका कुणाला कौल देणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लागले होते. बारामती हा राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार व अजितदादा पवार यांचा बालेकिल्ला मानला जातो. येथून अजितदादांविरोधात शरद पवारांनी आपले नातू आणि दादांचे पुतणे युगेंद्र पवार यांना रिंगणात उतरवल्याने चुरस निर्माण झाली होती. मात्र, सरतेशेवटी अजितदादांनीच बारामतीचे मैदान मारले. अजितदादांनी युगेंद्र पवार यांच्यावर १ लाख १६ हजार मतांनी विजय मिळविला.

बारामतीबरोबरच इंदापूरच्या निकालाकडेही राज्याचे लक्ष लागले होते. या मतदारसंघात दादा गटाचे दत्तामामा भरणे आणि शरद पवार गटाचे हर्षवर्धन पाटील आमनेसामने होते. मात्र, हर्षवर्धन पाटील यांना पुन्हा एकदा भरणे यांनी पराभवाचा धक्का दिला. पुरंदर विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे आमदार संजय जगताप, शिंदे गटाचे विजय शिवतारे आणि अपक्ष संभाजी झेंडे यांच्यात तिरंगी लढत झाली. यामध्ये शिवतारे यांनी विजयश्री खेचून आणली. दौंड विधानसभा मतदारसंघात भाजपाचे राहुल कुल आणि शरद पवार गटाचे रमेशअप्पा थोरात यांच्यात प्रमुख लढत झाली. मात्र, कुल यांच्यापुढे थोरात यांची डाळ शिजली नाही. काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या भोर वेल्हा मतदारसंघात पक्षाचे नेते संग्राम थोपटे यांना दादा गटाच्या शंकरराव मांडेकर यांनी धक्का दिला. जुन्नर विधानसभा मतदारसंघात अजितदादा गटाने अतुल बेनके आणि शरद पवार गटाचे सत्यशील शेरकर या दोघांच्या भांडणात अपक्ष शरद सोनवणे यांचा लाभ झाला. तर खेड-आळंदी विधानसभा मतदारसंघात अजितदादा गटाचे दिलीप मोहिते यांना ठाकरेसेनेच्या बाबाजी काळे यांनी अस्मान दाखवले.

आंबेगाव विधानसभा मतदारसंघात अजितदादा गटाचे नेते दिलीप वळसे पाटील आणि शरद पवार गटाने देवदत्त निकम यांच्यात जोरदार लढत झाली. पवारांनी ताकद लावलेल्या या मतदारसंघात अखेर वळसेंची सरशी झाली. शिरुर विधानसभा मतदारसंघात शरद पवार गटाने पुन्हा अशोक पवार यांच्यावरच विश्वास दाखविला.

पिंपरीतही महायुतीच भारी

पिंपरी चिंचवडमधील तीनही मतदारसंघात महायुतीने विजयाचा झेंडा फडकवला. चिंचवड विधानसभा मतदारसंघात भाजपाच्या शंकर जगताप यांनी शरद पवार गटाच्या राहुल कलाटे यांच्यावर लाखभर मतांच्या फरकाने विजय मिळविला. पिंपरी विधानसभेत दादा गटाच्या अण्णा बनसोडे यांनी पुन्हा बाजी मारली. येथून सुलक्षणा शिलवंत यांना उतरवण्याचा शरद पवार यांचा निर्णय मतदारांनी फोल ठरविला. भोसरी विधानसभा मतदारसंघाचा आखाडा पुन्हा एकदा भाजपाच्या महेशदादा लांडगे यांनीच गाजवला. लांडगे यांच्या घेरण्यासाठी शरद पवार यांनी माजी स्थायी समिती अध्यक्ष अजितभाऊ गव्हाणे यांना उमेदवारी दिली होती.

India T20 World Cup Squad : सूर्यकुमार यादव कर्णधार तर अक्षर पटेलकडे उपकर्णधारपदाची धुरा; गिलला संघातून डच्चू

दिल्ली विमानतळावर प्रवाशाला पायलटकडून मारहाण; सोशल मीडियावर संताप, एअर इंडिया एक्सप्रेसची कारवाई

"आज तुमच्या हक्काचा दिवस..." ; नगरपरिषद निवडणुकीसाठी मुख्यमंत्री फडणवीसांचे नागरिकांना आवाहन

अंबरनाथ नगरपरिषद निवडणूक : मतदानाच्या दिवशी अंबरनाथमध्ये गोंधळ; २०८ महिला भिवंडीतून आणल्याचा दावा, पोलिसांचा हस्तक्षेप

चीनमधील कॉन्सर्टमध्ये रोबोट्सचा भन्नाट डान्स; एलन मस्क यांची एका शब्दात प्रतिक्रिया, VIDEO व्हायरल