संग्रहित छायाचित्र 
महाराष्ट्र

महायुतीच ठरलं! स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत मुंबईत युती तर अन्यत्र स्वबळावर लढण्याचे संकेत

राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थेचे पडघम वाजू लागले आहेत. सत्ताधारी महायुती व विरोधक मविआने निवडणुकीसाठी तयारी सुरू केली आहे. या निवडणुकीसाठी सत्ताधारी महायुतीने आपला जागावाटपाचा फॉर्म्युला निश्चीत केल्याचे खात्रीलायक सूत्रांनी सांगितले.

Swapnil S

मुंबई : राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थेचे पडघम वाजू लागले आहेत. सत्ताधारी महायुती व विरोधक मविआने निवडणुकीसाठी तयारी सुरू केली आहे. या निवडणुकीसाठी सत्ताधारी महायुतीने आपला जागावाटपाचा फॉर्म्युला निश्चीत केल्याचे खात्रीलायक सूत्रांनी सांगितले. त्यानुसार, महायुती मुंबई व मोजक्या ठिकाणी युती म्हणून निवडणूक लढवणार आहे. तर अन्यत्र अन्य महानगरपालिका आणि नगरपंचायतींमध्ये महायुतीमधील तिन्ही पक्ष स्वबळावर निवडणूक लढवतील, अशी रणनीती आखल्याचे कळते.

येत्या एक ते दोन महिन्यात राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुकीसाठी महायुती सरकारने रणनीती आखायला सुरुवात केली आहे. महायुतीतील घटक पक्ष एकमेकांवर कुरघोडी करत असले तरीही स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी त्यांनी कंबर कसली आहे. महायुतीतील पक्षांमध्ये जोरदार स्पर्धा आहे. त्यामुळे फक्त मुंबई आणि मोजक्या ठिकाणी एकत्र युती करुन निवडणूक लढवेल. मात्र, या निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर तिन्ही पक्ष पुन्हा एकत्र येतील, अशी रणनीती महायुतीने आखली आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीमधील पक्ष वेगवेगळे लढल्यास मविआला व अन्य विरोधकांना त्याचा फायदा होऊ शकतो. महायुतीच्या तीन पक्षांमध्ये मतांचे विभाजन होऊन त्याचा फायदा मविआच्या उमेदवारांना होऊ शकतो. हीच गोष्ट टाळण्यासाठी महायुतीने मुंबई महानगरपालिकेची निवडणूक एकत्रितरित्या लढवण्याचा निर्णय घेतला आहे. तर उर्वरित स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महायुतीमधील पक्ष वेगवेगळे लढून नंतर पुन्हा एकत्र येतील.

ठाण्यात जोरदार रस्सीखेच

ठाणे महानगरपालिकेचा विचार करता २०१७ मध्ये शिवसेना आणि भाजप वेगळे लढले होते. यात शिवसेनेला स्पष्ट बहुमत मिळाले होते. शिवसेनेचे ६७ नगरसेवक निवडून आले होते. तर भाजपचे २३ नगरसेवक निवडून आले होते. दरम्यानच्या काळात ठाण्यातील राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलली आहे. सध्या भाजपचे आमदार संजय केळकर, गणेश नाईक हे ठाण्यात एकनाथ शिंदेंची कोंडी करताना दिसत आहेत. त्यामुळे शिंदे गट आणि भाजप निवडणुकीत वेगवेगळे लढल्यास महायुतीमध्ये मतांची विभागणी होऊ शकते. याउलट मविआ एकत्र लढल्यास त्यांना फायदा होण्याची शक्यता आहे.

मुख्यमंत्र्यांकडून संकेत

मुख्यमंत्री फडणवीस मुंबईतील त्यांच्या अधिकृत निवासस्थान ‘वर्षा’ येथे माध्यमांशी दिवाळीच्या निमित्ताने संवाद साधत होते. मुख्यमंत्री फडणवीस यांनी बुधवारी पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा मारताना याबाबत भाष्य केले. त्यांनी ‘मुंबईत महायुती एकत्र लढेल’, असे संकेत दिले. देशातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका असा लौकिक असणारी मुंबई महानगरपालिका सर्व राजकीय पक्षांसाठी महत्त्वाची आहे. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचे शिवसेना आणि मनसे पक्ष एकत्र आले आहेत. या दोघांचे आव्हान महायुती कशाप्रकारे परतवून लावणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या होत्या. त्यामुळेच महायुतीने मुंबईत एकत्र लढण्याचा निर्णय घेतल्याचे दिसत आहे. तर उर्वरित ठिकाणी रणनीती आखून एकत्र लढायचे की वेगवेगळे लढायेच हे आम्ही ठरवू, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

२०२९ पर्यंत महाराष्ट्राचा मुख्यमंत्री राहीन : फडणवीस

माझ्या माहितीनुसार दिल्ली अजून खूप दूर आहे. मी २०२९ पर्यंत महाराष्ट्राचा मुख्यमंत्री राहणार आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. तसेच भाजप, एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेना आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस यात कोणताही बदल होणार नाही. ‘नवे भागीदार येणार नाहीत, किंवा जुने बदलले जाणार नाहीत,” असे त्यांनी नमूद केले.

ठाकरे बंधूंची भाऊबीजही खास! बहिणीने बऱ्याच वर्षांनी एकत्र ओवाळलं

लाडक्या बहिणींना भाऊबीज भेट! ‘ई-केवायसी’ला तात्पुरती स्थगिती

सलीम डोला ड्रग्ज प्रकरण : हँडलर मोहम्मद सलीम शेख दुबईतून हद्दपार; मुंबई पोलिसांनी केली अटक

दिवाळी साजरी करायला गेलेल्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर; नॅशनल पार्कमध्ये भरधाव बाईकने दीड वर्षांच्या चिमुरडीला उडवले, जागीच मृत्यू

Mumbai : सोसायटीमध्ये खेळत असलेल्या ७ वर्षाच्या मुलाला कारने चिरडले, महिला चालकाविरोधात गुन्हा दाखल, धक्कादायक व्हिडिओ व्हायरल