मालेगावला यंत्रमागाचा खडखडाट बंद; कापडाचे भाव घसरल्याचा परिणाम 
महाराष्ट्र

मालेगावला यंत्रमागाचा खडखडाट बंद; कापडाचे भाव घसरल्याचा परिणाम

सुताचे वाढलेले भाव, कापडाला मीटरमागे एक ते दीड रुपये कमी मिळत असलेल्या भावामुळे दर आठवड्याला यंत्रमागधारकांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान होत आहे.

Swapnil S

लासलगाव : सुताचे वाढलेले भाव, कापडाला मीटरमागे एक ते दीड रुपये कमी मिळत असलेल्या भावामुळे दर आठवड्याला यंत्रमागधारकांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान होत आहे. कापडावरील बंद पडलेले प्रक्रिया उद्योग आणि सुताच्या होत असलेल्या निर्यातीमुळे उद्भवलेल्या संकटाकडे केंद्र व राज्य शासनाचे लक्ष वेधण्यासाठी व आर्थिक मंदीच्या गर्तेत सापडलेला यंत्रमाग उद्योग वाचविण्यासाठी येते ७ दिवस मालेगाव शहरातील ३ लाख २५ हजार यंत्रमाग बंद ठेवण्याचा निर्णय शहातील यंत्रमागधारकांच्या बारा संघटनांनी घेतला आहे.

मालेगाव तालुका पॉवरलूम समितीचे अध्यक्ष हाजी युसूफ इलियास यांनी तांबाकाटा येथे यंत्रमागधारक सूत व कापड व्यापारी यांची बैठक घेऊन ६ ते १२ ऑक्टोबरदरम्यान यंत्रमाग बंद राहणार असल्याची माहिती दिली.

सुताचे वाढलेले भाव, कापडाला मीटरमागे एक ते दीड रुपये कमी मिळत असलेल्या भावामुळे दर आठवड्याला यंत्रमागधारकांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान होत असल्याने निर्माण झालेल्या परिस्थितीकडे पाहत यंत्रमाग उद्योग विशेषत: लहान यंत्रमागधारकांना आर्थिक संकटातून वाचविण्यासाठी हा निर्णय घेतला असल्याचे यंत्रमाग संघटनांनी स्पष्ट केले. प्रदूषणाच्या मुद्द्यावरून सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशावरून राजस्थानातील पाली, बालोत्रा व जोधपूर येथील कापडावर प्रक्रिया करणारे उद्योग बंद करण्याची कारवाई सुरू झाली आहे. जे प्रक्रिया उद्योग सुरू होते ते पोलिसांतर्फे बंद केले जात असल्याने सुती कापडावरील प्रक्रिया ठप्प झाली आहे. यामुळे प्रक्रिया होत नसल्याने कापडाचे भाव मोठ्या प्रमाणात घसरत असून मीटरमागे एक ते दीड रुपयांचे नुकसान यंत्रमागधारकांचे होऊ लागले आहे. यामध्ये २४ यंत्रमाग असलेल्या कारखानदारास आठवड्यात २५ ते ३० हजारांचा आर्थिक फटका बसू लागला असल्याने यंत्रमागधारक हवालदिल झाले आहेत. गत पाच ते सहा महिन्यांपासून हे संकट यंत्रमागधारकांवर उभे ठाकले आहे.

बांगलादेशातील निर्यात थांबवा

सुताचे भाव वाढत असल्याने केंद्राने बांगलादेशात केली जाणारी सुताची निर्यात थांबवावी व यंत्रमागधारकांना स्वस्त दरात सुत द्यावे. कापडावर प्रक्रिया करणारे राजस्थानातील उद्योग नियमानुसार सुरू करण्यासाठी तातडीने पावले उचलावीत व यंत्रमाग उद्योगासंदर्भात सद्यस्थितीत असलेले धोरण केंद्र सरकारने तातडीने बदलावे आदी मागण्या यंत्रमागधारकांनी केल्या आहेत.

केंद्र सरकारतर्फे बांगलादेशला सुताची निर्यात जीएसटी कर न आकारता केली जात आहे. यामुळे सुताचे भाव वाढले आहेत, तर मीटर मागे एक ते दीड रुपये कापडाला कमी भाव मिळत असल्याने यंत्रमागधारकांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. केंद्र सरकारने कापडाची निर्यात करावी. तसेच सहा महिन्यांचे वीजबिल यंत्रमागधारकांना माफ करावे व प्रक्रिया उद्योग सुरू करावेत या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी सात दिवस यंत्रमाग बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
हाजी युसूफ इलियास, तालुकाध्यक्ष पॉवरलूम संघटना

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Pune : आंदोलकांवर कारवाईचा बडगा! MPSC विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल करण्यास सुरुवात

बदलापूरच्या रस्त्यावर थुंकल्यास ५०० रुपये दंड; नियमांचे पालन करा, नगर परिषदेचे आवाहन

Mumbai : सत्कार केटरर्ससह ८ उपाहारगृहांचे परवाने निलंबित; अन्न सुरक्षा आणि स्वच्छतेच्या उल्लंघनेनंतर FDA ची कारवाई

Mumbai : न्यायालयाच्या कामकाजाचे गुपचूप रेकॉर्डिंग करणे पडले महागात

Ulhasnagar : महापालिकेतील सत्तासंघर्ष थेट पोलिसांच्या दारात; शिवसेना-भाजपच्या दोन्ही गटांवर परस्परविरोधी गुन्हे दाखल