पावसाळी हंगामात मांडवा-गेटवे जलवाहतूक बंद; २६ मेपासून सेवा स्थगित प्रातिनिधिक छायाचित्र
महाराष्ट्र

पावसाळी हंगामात मांडवा-गेटवे जलवाहतूक बंद; २६ मेपासून सेवा स्थगित

पावसाळी हंगाम आणि संभाव्य खराब हवामानाच्या पार्श्वभूमीवर मांडवा जेट्टी ते गेटवे ऑफ इंडिया दरम्यान सुरू असलेली प्रवासी जलवाहतूक सेवा मंगळवार, दि. २६ मेपासून तात्पुरती बंद करण्यात येणार आहे.

Swapnil S

अलिबाग : पावसाळी हंगाम आणि संभाव्य खराब हवामानाच्या पार्श्वभूमीवर मांडवा जेट्टी ते गेटवे ऑफ इंडिया दरम्यान सुरू असलेली प्रवासी जलवाहतूक सेवा मंगळवार, दि. २६ मेपासून तात्पुरती बंद करण्यात येणार आहे. ही सेवा ३१ ऑगस्टपर्यंत बंद राहणार असल्याची माहिती महाराष्ट्र सागरी मंडळ यांच्या मांडवा बंदर कार्यालयाकडून देण्यात आली आहे.

पावसाळ्यात समुद्र खवळलेला असण्याची शक्यता लक्षात घेता प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला आहे. महाराष्ट्र सागरी मंडळ अंतर्गत मांडवा बंदर निरीक्षक कार्यालयाने यासंदर्भातील अधिकृत आदेश जारी केले असून अंतर्गत जलवाहतुकीवर निर्बंध लागू करण्यात आले आहेत.

मांडवा ते गेटवे ऑफ इंडिया या मार्गावर दररोज हजारो प्रवासी जलवाहतुकीचा वापर करतात. विशेषतः मुंबई-अलिबाग दरम्यान प्रवास करणारे नोकरदार, पर्यटक तसेच स्थानिक नागरिकांसाठी ही सेवा अत्यंत महत्त्वाची मानली जाते. मात्र, पावसाळ्यात समुद्रातील वादळी परिस्थिती, भरती-ओहोटी आणि जोरदार वाऱ्यांमुळे जलवाहतूक धोकादायक ठरण्याची शक्यता असल्याने प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून सेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

मांडवा बंदर निरीक्षक कार्यालयाने जारी केलेल्या पत्रानुसार, महाराष्ट्र सागरी मंडळाचे मुख्य बंदर अधिकारी तसेच मोरा बंदरे समूह, ठाणे येथील प्रादेशिक बंदर अधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार ही कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान, प्रवाशांनी या कालावधीत पर्यायी रस्ते वाहतुकीचा वापर करावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Mumbai : कोस्टल रोडवरील बोगद्यात धावत्या कारला आग; जीव वाचवण्यासाठी प्रवाशांची धावपळ, वाहतूक विस्कळीत, Video

Mumbai : कौटुंबिक वादातून पत्नीची निर्घृण हत्या; ओशिवरा पोलीस ठाण्याच्या शेजारीच थरार

माळशेज घाटात सोसाट्याचा वारा; दुचाकीही डगमगली, VIDEO पाहून नेटकरी थक्क

RailOne वरून तिकीट बुक करता? जाणून घ्या महत्त्वाचा नियम, नाहीतर भरावा लागू शकतो दंड

पालकांचं क्षणभर दुर्लक्ष... अन् ४ वर्षीय चिमुकली थेट पहिल्या मजल्यावरून खाली; VIDEO व्हायरल