भाजपचे नेते आणि पर्यटनमंत्री मंगल प्रभात लोढा (Mangal Prabhat Lodha) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बंडाची तुलना ही शिवाजी महाराजच्या आग्र्याच्या सुटकेशी केली होती. यावर अखेर त्यांनी माफी मागत स्पष्ट केले की, "मी कधीही असे राजकारण करत नाही. मला माफ करा. छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना मीच काय, कोणीही करू शकत नाही. त्यांचे उदाहरण आपण लहान मुलांना पण देतो, तसेच मी फक्त उदाहरण दिले होते. यामागे माझा दुसरा काही उद्देश नव्हता. माझी सर्वांना हात जोडून विनंती आहे की, हा राजकारणाचा विषय नाही. हा फक्त एका कार्यक्रम होता, आणि मी फक्त उदाहरण दिले. कृपया यावरून राजकारण करू नका."
नेमकं प्रकरण काय?
प्रतापगडावर शिवप्रताप दिनाचा कार्यक्रम सुरु असताना मंगल प्रभात लोढा म्हणाले की, "छत्रपती शिवाजी महाराजांना औरंगजेबाने आग्रामध्ये कैद करुन ठेवले होते. परंतु छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वत:साठी नाही तर हिंदवी स्वराज्याच्या निर्मितीसाठी औरंगजेबाच्या हातावर तुरी देऊन अतिशय चतुराईने तिथून निसटले. एकनाथ शिंदे यांनाही रोखण्याचे भरपूर प्रयत्न झाले, पण तेदेखील महाराष्ट्रासाठी बाहेर पडले." यावरून विरोधकांनी जोरदार टीका केली. तसेच, त्यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे महाराष्ट्रभर अनेक ठिकाणी त्यांच्याविरुद्ध आंदोलने करण्यात आली.