माणिकराव कोकाटे संग्रहित छायाचित्र
महाराष्ट्र

माणिकराव कोकाटे यांचे मंत्रिपद धोक्यात; नाशिक सत्र न्यायालयाकडून शिक्षेवर शिक्कामोर्तब; अटकेची टांगती तलवार

बनावट कागदपत्रांच्या आधारे शासकीय सदनिका लाटल्याच्या प्रकरणात सिन्नरचे आमदार व राज्याचे क्रीडामंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांना नाशिक येथील प्रथमवर्ग न्यायालयाने दिलेली दोन वर्षाची शिक्षा सत्र न्यायालयाने कायम ठेवल्याने त्यांची आमदारकी व पर्यायाने मंत्रिपदही धोक्यात आले आहे. तसेच त्यांच्यावर अटकेची टांगती तलवार कायम आहे.

Swapnil S

लासलगाव : बनावट कागदपत्रांच्या आधारे शासकीय सदनिका लाटल्याच्या प्रकरणात सिन्नरचे आमदार व राज्याचे क्रीडामंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांना नाशिक येथील प्रथमवर्ग न्यायालयाने दिलेली दोन वर्षाची शिक्षा सत्र न्यायालयाने कायम ठेवल्याने त्यांची आमदारकी व पर्यायाने मंत्रिपदही धोक्यात आले आहे. तसेच त्यांच्यावर अटकेची टांगती तलवार कायम आहे.

वेगवेगळ्या कारणांमुळे वादात सापडणारे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मंत्री ॲड. कोकाटे हे सदनिका प्रकरणात शिक्षा कायम राहिल्याने अडचणीत आले आहेत. बनावट दस्तावेजाच्या आधारे अल्प उत्पन्न गटातून शासकीय कोट्यातील सदनिका लाटून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी कनिष्ठ न्यायालयाने मंत्री माणिकराव कोकाटे आणि त्यांचे बंधू विजय कोकाटे यांना दोन वर्षांचा कारावास आणि प्रत्येकी ५० हजार रुपये दंड, अशी शिक्षा ठोठावली होती.

त्यावरील अपिलामध्ये सत्र न्यायालयाने कोकाटे बंधूंना जामीन मंजूर करून शिक्षेच्या अंमलबजावणीस आधीच स्थगिती दिली होती. अपील प्रलंबित असेपर्यंत शिक्षेला स्थगिती न दिल्यास कोकाटे बंधूंचे नुकसान होईल, या बाबी न्यायालयासमोर कोकाटे यांच्या वकिलांकडून मांडल्या गेल्या होत्या.

सत्र न्यायालयाने स्पष्ट निरीक्षण नोंदविले की, ज्या सदनिका कोकाटे यांनी घेतल्या त्या निकषानुसार नाहीत. यात शासनाची फसवणूक झाल्याचे दिसून येते. मुळात शिक्षा झाल्यानंतर माणिक कोकाटे यांनी नैतिकतेच्या आधारावर राजीनामा देणे अपेक्षित होते. आता त्यांना जामीन मिळू नये, म्हणून उच्च न्यायालयात कागदपत्रे सादर करून प्रक्रिया सुरू करण्यात आल्याचे ॲड. राठोड यांनी सांगितले.

ऑनलाइन रमी

यापूर्वी कोकाटे यांनी कृषिमंत्री असताना केलेल्या काही विधानांमुळे महायुती सरकारवर मोठी नामुष्की ओढवली होती. शेतकरी कर्जमाफीवर केलेल्या विधानामुळे तसेच विधिमंडळातील सभागृहात थेट रमी हा ऑनलाइन गेम खेळताना दिसल्यामुळे त्यांच्यावर टीकेची झोड उठली होती. परिणामी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कोकाटे यांचे खाते बदलावे लागले. त्यांची कृषी मंत्रिपदावरून उचलबांगडी करून क्रीडा मंत्र्याची जबाबदारी सोपवण्यात आली.

कोकाटेंच्या भूमिकेकडे लक्ष

माणिकराव कोकाटे अडचणीत सापडलेले हे प्रकरण २९ वर्षांपूर्वीचे आहे. १९९५ मध्ये कोकाटे आणि त्यांचे बंधू विजय कोकाटे यांनी आर्थिक दुर्बल घटकातील असल्याचे दाखवून मुख्यमंत्र्यांच्या कोट्यातील १० टक्के आरक्षित सदनिका मिळवली होती. ही सदनिका मिळविण्यासाठी त्यांनी कागदपत्रांमध्ये फेरफार केल्याचा आरोप आहे. त्यांच्याविरोधात सरकारवाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. याच प्रकरणात आता जिल्हा सत्र न्यायालयाने कोकाटे यांना सुनावलेली शिक्षा कायम ठेवली आहे. त्यामुळे आता कोकाटे नेमके काय करणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

शिक्षा कायम

यासंदर्भात मूळ तक्रार दिवंगत माजी मंत्री तुकाराम दिघोळे यांनी केली होती. मंत्री कोकाटे यांच्या शिक्षेला सत्र न्यायालयाने तात्पुरती स्थगिती दिली होती. तेव्हा माजी मंत्री दिघोळे यांची कन्या ॲड. अंजली दिघोळे-राठोड यांनी हस्तक्षेप याचिका दाखल केली. त्यांची बाजू ॲड. आशुतोष राठोड यांनी मांडली. कनिष्ठ न्यायालयाची शिक्षा सत्र न्यायालयाने कायम ठेवल्याची माहिती ॲड. राठोड यांनी दिली.

माणिकराव कोकाटेंविरोधात अटक वॉरंट: HC कडूनही झटका; तातडीने सुनावणी घेण्यास नकार, कधीही होऊ शकते अटक

दादर स्थानकात बदलापूर-CSMT एसी लोकलचे दरवाजेच उघडले नाही; प्रवाशांचा संताप, मोटरमनला जाब - Video व्हायरल

मी माफी का मागू?... ‘ऑपरेशन सिंदूर’बाबतच्या 'त्या' वक्तव्यावर पृथ्वीराज चव्हाण यांचा माफी मागण्यास नकार

शिल्पा शेट्टी-राज कुंद्राच्या अडचणी वाढल्या; ६० कोटींच्या फसवणूक प्रकरणात EOW कडून मोठा धक्का

Ambernath : भाजप उमेदवारांच्या कार्यालयावर गोळीबार; परिसरात तणाव, सुरक्षा रक्षक जखमी - CCTV व्हिडिओ समोर