तपासात फेरफाराची भीती; पुढील निर्णय घेण्यापूर्वी महिनाभर तपासावर लक्ष ठेवणार- जरांगे  ANI
महाराष्ट्र

तपासात फेरफाराची भीती; पुढील निर्णय घेण्यापूर्वी महिनाभर तपासावर लक्ष ठेवणार- जरांगे

Manoj Jarange Audio Clip Controversy : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपण प्रसिद्ध केलेल्या कथित ऑडिओ क्लिपची न्यायवैद्यक तपासणी करण्याची घोषणा केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी, मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी शनिवारी या तपासात फेरफार होण्याची भीती व्यक्त केली.

Swapnil S

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपण प्रसिद्ध केलेल्या कथित ऑडिओ क्लिपची न्यायवैद्यक तपासणी करण्याची घोषणा केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी, मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी शनिवारी या तपासात फेरफार होण्याची भीती व्यक्त केली. सत्य दडपण्यासाठी सरकारकडून ही क्लिप बनावट असल्याचे भासवले जाण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली. पुढील निर्णय जाहीर करण्यापूर्वी महिनाभर या न्यायवैद्यक तपासावर बारकाईने लक्ष ठेवणार असल्याचे त्यांनी सांगितले.

कोटी "मराठा आरक्षण आंदोलन संपवण्यासाठी ५०० रुपयांच्या आरोपाचा वापर करण्यात आला. कोणत्याही परिस्थितीत मी हा मुद्दा संपुष्टात येऊ देणार नाही," असे जरांगे यांनी जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले.

या कथित ऑडिओ क्लिपमुळे राज्यातील राजकारण तापले आहे. या क्लिपमध्ये एका महिलेचा आवाज असून, मराठा समाजाच्या आरक्षणासाठी सुरू असलेले आंदोलन मागे घेण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून जरांगे यांना ५०० कोटी रुपये दिल्याचा दावा करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. या आरोपावरून भाजप आणि शिवसेनेच्या नेत्यांमध्ये एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. दिल्लीतील संपर्काचा वापर करून ही क्लिप बनावट असल्याचे भासवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप जरांगे यांनी केला. "मी मराठा समाजाच्या आणि शेतकऱ्यांच्या समस्या मांडत असल्यामुळे माझ्यावर ५०० कोटी रुपये घेतल्याचा आरोप करण्यात आला. राजकीय नेत्यांच्या आरोप-प्रत्यारोपांमध्ये मला रस नाही," असे ते म्हणाले.

सरकारने चर्चेसाठी आपला प्रतिनिधी पाठवल्यास आपली बदनामी करण्यामागे पडद्यामागून कोण सक्रिय होते, याची माहिती देऊ, असेही जरांगे यांनी सांगितले. "केवळ आरोपांच्या आधारे कोणालाही अटक करू नये. निष्पक्ष तपास होऊ द्या. सत्य बाहेर येऊ द्या. तपासाच्या निष्कर्षानुसारच कारवाई झाली पाहिजे," असे जरांगे म्हणाले.

दरम्यान, जरांगे यांच्या इशाऱ्यानंतर त्यांचे माजी सहकारी अमोल खुणे यांनी केलेल्या दाव्यामुळे नव्या वादाला तोंड फुटले. जरांगे आणि त्यांचे सहकारी गंगाधर काळकुटे यांचे परदेशात संबंध असल्याचा दावा खुणे यांनी केला. "अंतरवालीपासून मुंबईपर्यंत ठिकठिकाणी बॅनर लावण्यात आले. एवढा पैसा आला कुठून? सर्वांची चौकशी झाली पाहिजे. त्यांच्याकडे परदेशातही मालमत्ता असल्याचे समोर येईल," असे खुणे म्हणाले.

शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी हा प्रकार एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांच्यात फूट पाडण्याचे षडयंत्र असल्याचे म्हटले. "एकनाथ शिंदे हे भाजपमुळे मुख्यमंत्री झाले, असे कुठेतरी सांगितले जात आहे. मात्र, एकनाथ शिंदे यांनी बंडाचे नेतृत्व केले नसते, तर १०६ आमदार असूनही भाजपला घरी बसावे लागले असते. महाराष्ट्रात जिंकलेल्या २३६ जागा केवळ एकनाथ शिंदे यांचा चेहरा पुढे केल्यामुळे जिंकता आल्या," असा दावा गायकवाड यांनी केला.

दरम्यान, शिवसेना आणि भाजपच्या नेत्यांमधील वाद मिटवण्यासाठी उद्योगमंत्री उदय सामंत यांनी मध्यस्थी केल्याचे समजते. एकनाथ शिंदे यांनीही आपले निकटवर्तीय रामदास कदम यांना ५०० कोटी रुपयांच्या आरोपावरून जाहीरपणे बोलू नये, अशी सूचना केल्याचे वृत्त आहे. या विषयावरील चर्चा थांबवावी, अशी भूमिका शिंदे यांनी घेतल्याचे सूत्रांनी सांगितले.

५०० कोटी देणारा माणूस मीही शोधतोय - श्रीकांत शिंदे

५०० कोटी रुपये दिले कुणी, याचा शोध मलाही घ्यायचा आहे, अशा शब्दांत खासदार श्रीकांत शिंदे यांनी मनोज जरांगे-पाटील यांच्या आरोपांवर उपरोधिक प्रतिक्रिया दिली. 'त्या दिवसापासून मी त्या माणसाला शोधतोय, ज्याने पाचशे कोटी रुपये दिले. एकत्रित पाचशे कोटी रुपये कसे दिसतात, याची आम्ही चर्चा करत होतो. जरांगेंना पडलेला प्रश्न मलाही पडला आहे,' असे शिंदे यांनी ठाण्यात पत्रकारांशी बोलताना सांगितले. शिंदे यांनी या प्रकरणावर भाष्य करताना उपरोधिक टिप्पणी केली. 'जरांगेंना जो प्रश्न पडला आहे, तोच प्रश्न मलाही पडला आहे,' असे सांगत त्यांनी कथित व्यवहारातील रकमेबाबतच प्रश्न उपस्थित केला. पाचशे कोटी रुपये एकत्रित कसे दिसतात, यावर आम्ही चर्चा करत होतो, असेही त्यांनी नमूद केले.

ती क्लिप फोडणारा भाजपचा आमदार - संजय राऊत

मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील यांनी जारी केलेली कथित ऑडिओ क्लिप ही भाजपच्याच विधान परिषदेतील एका आमदाराने फोडली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना हा आमदार कोण हे माहिती आहे, असा आरोप शिवसेना उबाठा नेते संजय राऊत यांनी शनिवारी केला. क्लिपमधील ५०० कोटींच्या दाव्याप्रकरणी आधी एफआयआर नोंदवून चौकशी केली पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली. मुंढवा जमीन घोटाळा प्रकरणात उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या कार्यालयातील अधिकाऱ्यांना समन्स येते. मग या ५०० कोटींच्या प्रकरणी गुन्हा का दाखल केला जात नाही, असा सवाल राऊत यांनी केला. भाजपमध्येच अंतर्गत प्रचंड लाथाळ्या सुरू आहेत. गृह खाते भाजपकडेच आहे, तरीही हे रेकॉर्डिंग होत आहे. या प्रकरणात मनोज जरांगे-पाटील हे मुख्य पात्र आहेत. या ऑडिओ क्लिपची चौकशी होईल, असे मुख्यमंत्री सांगत आहेत. पण आतापर्यंत जितक्या एसआयटी चौकशा झाल्या त्याची माहिती त्यांनी जाहीर करावी, असे राऊत म्हणाले.

(संबंधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Kojagiri Purnima 2026 : आज कोजागिरी पौर्णिमा; चंद्रोदय किती वाजता? जाणून घ्या पूजेचा मुहूर्त

आजचे राशिभविष्य, २५ ऑक्टोबर २०२६ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

Diwali 2026 : दिवाळीच्या फराळात झणझणीत ट्विस्ट; घरच्या घरी बनवा कुरकुरीत लसूण शेव

Mumbai : मध्य रेल्वेवर उद्या मेगाब्लॉक; हार्बर मार्गावर कुर्ला ते वाशी दरम्यान ब्लॉक

Navi Mumbai : खारघर हाफ मॅरेथॉनमुळे उद्या वाहतुकीत बदल; पहाटे ५ वाजल्यापासून 'या' मार्गांवर निर्बंध, वाहतूक पोलिसांकडून सूचना