संग्राहित छायाचित्र 
महाराष्ट्र

मनोज जरांगे यांचे उपोषण स्थगित; सरकारला १३ ऑगस्टपर्यंतची दिली मुदत

Swapnil S

जालना : सगेसोयरेची अधिसूचना जारी करून मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण द्या, या मागणीसाठी आमरण उपोषणास बसलेले मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी उपोषणाच्या पाचव्या दिवशी आपले उपोषण स्थगित करीत सरकारला पुन्हा एक महिन्याच्या वेळ देत १३ आगस्टपर्यंत मागण्या मान्य कराव्यात, असे आवाहन केले आहे. दरम्यान, यावेळी त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर पुन्हा एकदा जोरदार टीका केली आहे.

जरांगे यांनी बुधवारी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी सकाळीच उपोषण स्थगित करणार असल्याची माहिती दिली. यामागील कारण सांगताना ते म्हणाले, रात्री माझी तब्येत खालावल्याने मराठा बांधवांना काळजी लागली होती. त्यामुळे ४० जणांनी माझे हातपाय दाबून धरले आणि मला सलाईन दिली. त्यांची माया आहे म्हणून त्यांनी तसे केले. माझे कुणीही ऐकले नाही. आम्हाला आरक्षण पण पाहिजे आणि तुम्ही पण पाहिजे असे समाजाचे म्हणणे होते, असे मनोज जरांगे यांनी सांगितले.

आमरण उपोषणाच्या शक्तीला सरकार घाबरते. पण आता सलाईन लागल्यामुळे उपोषणाचा काही उपयोग नाही. मी सलाईन लावून उपोषण करणारा माणूस नाही. आता सलाईन लागलीच आहे, तर आता उपोषणाला अर्थ नाही. त्यामुळे आज दुपारी मी माझे उपोषण सोडणार, असे मनोज जरांगे पाटील म्हणाले.

सरकारचा जीव खुर्चीत, ती खेचण्यासाठी तयारी करणार

या ठिकाणी पडून राहण्यापेक्षा पुढच्या निवडणुकीची तयारी सुरू केलेली बरी. सरकारचा जीव ज्या खुर्चीत आहे, ती खुर्ची खेचण्यासाठी आता मला तयारी करावी लागेल व सलाईन लावून बेगडी उपोषण मी करणार नाही. मी उपोषण करायला तयार आहे. मात्र, गावकऱ्यांनी उपचार घेण्यासाठी, पाणी पिण्यासाठी किंवा सलाईन लावण्यासाठी आग्रह करायचा नाही. विनाउपचार घेता आणि सलाईन न लावता मी मरेपर्यंत उपोषण करायला तयार आहे. सलाईन लावून मी उपोषण करायला तयार नाही, असे मनोज जरांगे यांनी स्पष्ट केले.

आता पाठवण्यासाठी सरकारकडे मंत्रीच उरले नाहीत

याचबरोबर, मनोज जरांगे यांनी उपोषण सोडण्याची घोषणा करताना राज्य सरकारला पुन्हा १ महिन्याचा अल्टिमेटम दिला आहे. येत्या १३ ऑगस्टपर्यंत मागण्या मान्य करा, असा इशारा मनोज जरांगे यांनी दिला आहे. तसेच, सरकारतर्फे कुणीही आले नाही. कारण आता सरकारकडे मंत्रीच उरले नाहीत. अनेकजण आधीच आले. अशात आता पुन्हा कोणत्या तोंडाने जायचे हा विषय असेल, असे म्हणत मनोज जरांगे यांनी सरकारवर निशाणा साधला.

दरेकर मराठा आहेत का हे शोधावे लागेल

दरेकर मराठा आहेत का हे शोधावे लागेल. मी काही झुकत नाही, जेलमध्ये जायला तयार आहे, टाका आता जेलमध्ये. मी उद्या जेलमध्ये जायला तयार आहे. मला आता जेलमध्ये टाकून फडणवीस यांना निवडणूक काढायची आहे. मी आत गेलो तर भाजपची एकही सीट येणार नाही. याचा बीमोड झाला पाहिजे, वेळ आली तर ओबीसींचे निवडून आणू, असे मनोज जरांगे पाटील म्हणाले.

अटक वॉरंट हा फडणवीसांचा खेळ

दरम्यान, एका नाट्य निर्मात्याची फसवणूक केल्याप्रकरणी पुणे कोर्टाने मनोज जरांगे पाटील यांच्याविरोधात अटक वॉरंट काढले आहे. यावरदेखील मनोज जरांगे यांनी भाष्य केले. ते म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांचे हिंदुत्वाचे विचार दाखवण्यासाठी आम्ही नाटकाचे काम केले होते. नाटकातील पैसे काही जणांनी चोरले. त्यात माझा तिळभरही हात नव्हता. माझ्याविरोधात अटक वॉरंट काढणे हा सर्व देवेंद्र फडणवीस यांचा खेळ आहे. मला जेलमध्ये टाकून मारण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. बारा-तेरा वर्षापूर्वीचे वॉरंट आताच का निघाले? न्याय, गृह विभाग फडवणीस यांच्याकडे आहे. हा देवेंद्र फडणवीस यांनी रचलेला डाव आहे. न्यायाधीश हे फडणवीस यांचे नातेवाईक आहेत. मला जेलमध्ये टाकून जीवे मारले जाऊ शकते. मी कुठेच अडकत नाही, म्हणून हा कट आहे, असे जरांगे म्हणाले.

नौटंकीबाज माणसापुढे मराठा समाज झुकणार नाही - दरेकर

मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाच्या भावनांशी खेळ मांडला आहे. त्यांना आता सत्तेची आस लागलेली आहे. त्यातून ते कोणाची बाजू धरत आहेत, हे अगदी स्पष्ट झालेले आहे. त्यांच्या नौटंकीपुढे मराठा समाज आता झुकणार नाही, असा हल्लाबोल प्रवीण दरेकर यांनी केला.

मुंबईत आज पाऊस बरसणार; १६ ऑक्टोबरपर्यंत महाराष्ट्रासह 'या' राज्यांत मुसळधारचा IMD चा इशारा

विधानसभेचे रणशिंग फुंकणार; दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे-एकनाथ शिंदे भिडणार!

IND vs BAN 3rd T20I : टीम इंडिया आज क्लीन स्वीपचे 'तोरण' बांधणार; 'या' ४ खेळाडूंना संधी मिळणार?

रतन टाटांचा वारसदार मिळाला; नोएल टाटा बनले टाटा ट्रस्टचे चेअरमन

इस्रायलचा लेबनॉनमधील संयुक्त राष्ट्रांच्या इमारतीवर हल्ला; भारताकडून चिंता व्यक्त