अरे व्वा! गावकऱ्यांना दिला दिवाळी बोनस; साताऱ्यातील मान्याचीवाडी ग्रामपंचायतीचा कौतुकास्पद उपक्रम 
महाराष्ट्र

अरे व्वा! गावकऱ्यांना दिला दिवाळी बोनस; साताऱ्यातील मान्याचीवाडी ग्रामपंचायतीचा कौतुकास्पद उपक्रम

ग्रामविकासात लोकसहभागाचा आदर्श निर्माण करणाऱ्या पाटण तालुक्यातील मान्याचीवाडी ग्रामपंचायतीने गावकऱ्यांना दिवाळी बोनस देत त्यांची दिवाळी गोड केली आहे.

Swapnil S

कराड : ग्रामविकासात लोकसहभागाचा आदर्श निर्माण करणाऱ्या पाटण तालुक्यातील मान्याचीवाडी ग्रामपंचायतीने गावकऱ्यांना दिवाळी बोनस देत त्यांची दिवाळी गोड केली आहे. ग्रामपंचायतीच्या या अनोख्या उपक्रमामुळे ग्रामस्थांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला असून, या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

सुमारे पाचशे लोकसंख्या असलेली मान्याचीवाडी ग्रामपंचायत ग्रामविकासाचे अभ्यासकेंद्र म्हणून ओळखली जाते. गेल्या २४ वर्षांपासून ग्रामस्थांनी एकजुटीने लोकसहभागाची चळवळ उभी केली असून, त्यातून गावाच्या विकासाला नवी दिशा मिळाली आहे. ग्रामस्थ आणि ग्रामपंचायत यांच्यातील विश्वासाचे नातेही या गावाच्या विकासाचे महत्त्वाचे वैशिष्ट्य ठरले आहे.

ग्रामस्थांच्या सहकार्यामुळे स्थापनेपासून सलग २५ वर्षे घरपट्टी, पाणीपट्टी आणि इतर कर आर्थिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी म्हणजे १ एप्रिल रोजी जमा होतात. राष्ट्रीय आणि राज्य शासनाच्या विविध योजना प्रभावीपणे राबवून ग्रामपंचायतीने आतापर्यंत तब्बल ८३ पुरस्कार मिळवले आहेत.

या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायतीने २०२४ मध्ये स्वतःची एक योजना आखून त्यासाठी ठरावीक रक्कम जमा केली. या रकमेवर दरवर्षी मिळणाऱ्या व्याजातून जमा होणारी अतिरिक्त रक्कम ग्रामस्थांच्या हितासाठी वापरण्याचा निर्णय घेण्यात आला.

त्यानुसार घरपट्टी, पाणीपट्टी आणि इतर करांची रक्कम वजा करून उर्वरित रक्कम संबंधित खातेदारांना रोख स्वरूपात दिवाळी बोनस म्हणून देण्यात आली. या उपक्रमामुळे ग्रामस्थांना आर्थिक दिलासा मिळण्यासोबतच त्यांच्या दिवाळीचा आनंदही द्विगुणित झाला.

यावेळी ग्रामपंचायत सदस्य उत्तमराव माने, दिलीप गुंजाळकर, सीमा माने, लता आसळकर, निर्मला पाचपुते, दूध संस्थेचे अध्यक्ष अशोक माने, उपाध्यक्ष अशोक पाचपुते, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष दादासाहेब माने, पोलीस पाटील विकास माने, अधिकराव माने आणि ग्रामपंचायत अधिकारी अनिल चव्हाण आदी उपस्थित होते.

नागरिकांच्या चेहऱ्यावरील आनंद हेच समाधान

ग्रामपंचायतीच्या कामकाजात ग्रामस्थांच्या अपेक्षा लक्षात घेणे महत्त्वाचे आहे. कायमस्वरूपी लाभ देणाऱ्या योजना नागरिकांपर्यंत पोहोचाव्यात, या उद्देशाने दिवाळी बोनसचा उपक्रम हाती घेतला. या उपक्रमामुळे नागरिकांच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले, याचेच समाधान वाटते, अशी भावना गावाचे पोलीस पाटील विकास माने यांनी व्यक्त केली.

मुंबईत पाणीकपात वाढणार? BMC ची राखीव पाण्यासाठी फिल्डिंग, ७ धरणांत फक्त ८२.४७ टक्के पाणी, ६ महिने आधीच राज्य सरकारला पत्र

महाराष्ट्रातील MBBS इंटर्नना कमी विद्यावेतन

पुणे-मिरज-कोल्हापूर लोहमार्गाला सुरक्षा 'कवच'

दिवाळी पहाट : षण्मुखानंद हॉलमध्ये महेश काळे यांच्या स्वरोत्सवाला तुफान प्रतिसाद; पंडित हरिप्रसाद चौरसियांनी केले कौतुक

Mumbai : अंधेरीत उंच इमारतीत अग्निभडका; लिफ्ट ऑपरेटरचा गुदमरून मृत्यू