माथेरान : माथेरान नगरपरिषदेची निवडणूक अंतिम टप्प्यात पोहचली असून प्रचाराला चांगला जोर चढला आहे. महाराष्ट्राचे पर्यटन मंत्री शंभूराज देसाई आणि खासदार सुनील तटकरे यांच्या सभा एकाच दिवशी झाल्याने राजकीय वातावरण आणखी तापले. मतदारांना आकर्षित करणारी आश्वासने आणि मोठमोठे मुद्दे चर्चेत असताना ई-रिक्षा सुरू करण्याचा निर्णय आणि घोडेवाल्यांच्या हितरक्षणाचा प्रश्न हे या निवडणुकीतील महत्त्वाचे मुद्दे ठरत आहेत.
पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी सभेत स्पष्ट केले की, सुप्रीम कोर्टाने ई-रिक्षाबाबत दिलेल्या आदेशाची राज्य सरकार तत्काळ अंमलबजावणी करील. तसेच ई-रिक्षा स्वतः राज्य सरकारच खरेदी करणार असून त्यामुळे घोडेवाले किंवा अश्वचालकांच्या व्यवसायावर कोणताही प्रतिकूल परिणाम होणार नाही, अशी हमी त्यांनी दिली.
दरम्यान, शिवराष्ट्र पॅनलच्या सभेत खासदार सुनील तटकरे यांनी सांगितले की, ई-रिक्षा सुरू झाल्यामुळे पर्यटकांची पायपीट कमी झाली आणि वाहतूक व्यवस्थेत सकारात्मक बदल झाला आहे. यामुळे पर्यटन वाढीस चालना मिळेल. मात्र, ई-रिक्षा पॉइंटवर जाणार नसल्याने अश्वचालकांचा व्यवसाय घटण्याऐवजी उलट वाढेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. माथेरानमध्ये अश्वचालकांची मतदारसंख्या मोठी असल्याने सर्व राजकीय पक्ष निवडणूक काळातच त्यांच्या सुखदुःखात सामील होतात, अशी भावना घोडेवाल्यांमध्ये आहे. “निवडणूक आली की आठवण; संपली की विसर,” अशी नाराजी त्यांनी व्यक्त केली. शिवसेना-भाजप युतीने मात्र सुरुवातीपासूनच ई-रिक्षाबाबत आपली भूमिका स्पष्ट ठेवली आहे. अश्वचालकांवर कोणताही अन्याय होणार नाही, अशी ठाम भूमिका त्यांनी घेतली असून याचे प्रतिबिंब निवडणूक प्रचारात दिसून येत आहे.
तबेल्यांचा प्रश्न दशकानुदशके रखडलेला
माथेरानमध्ये तबेल्यांचा प्रश्न दशकानुदशके रखडलेला आहे. मागील ४० वर्षांत एकही नवीन तबेला बांधून देण्यात आलेला नाही, हे कटू वास्तव घोडेवाल्यांकडून पुन्हा एकदा समोर आले आहे. माथेरानमध्ये ‘ई-रिक्षा’ हा मुद्दा जसा केंद्रस्थानी आला आहे, तसा घोडेवाल्यांचा विश्वास जिंकणे ही सर्वच पक्षांसाठी मोठी कसोटी ठरणार आहे. पर्यटकांची सोय, पर्यावरणाचा समतोल आणि घोडेवाल्यांचे अस्तित्व यांचा समन्वय साधत पुढील धोरण कोण आखते, याकडे संपूर्ण माथेरानचे लक्ष लागले आहे.