महाराष्ट्र

शासकीय बांधकाम ठेकेदाराच्या खुनाच्या आरोपीला ‘मकोका’

शासकीय बांधकाम ठेकेदार विठ्ठल पोळेकर यांचे अपहरण करून दोन कोटी रुपयांच्या खंडणीसाठी निर्घृण खून करण्यात आल्याचा प्रकार घडला होता.

Swapnil S

पुणे: शासकीय बांधकाम ठेकेदार विठ्ठल पोळेकर यांचे अपहरण करून दोन कोटी रुपयांच्या खंडणीसाठी निर्घृण खून करण्यात आल्याचा प्रकार घडला होता. या खून प्रकरणात मुख्य गुन्हेगार योगेश उर्फ बाबू भामे याच्यासह साथीदार आरोपी विरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मकोका) कारवाई करण्याचे आदेश पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी दिले.

योगेश उर्फ बाबू किसन भामे (वय ३२), राेहित उर्फ बाळा किसन भामे (वय २२, दोघे रा. डोणजे, सिंहगड पायथा, ता. हवेली), शुभम पोपट सोनवणे (वय २४, सध्या रा. नगर रस्ता, मूळ रा. खळवाडी, चिंचोली गुरव, ता. संगमनेर, जि. अहिल्यानगर), मिलिंद देवीदास थोरात (वय २४, सध्या रा. वाघोली, नगर रस्ता, मूळ रा. बेलगाव, ता. कर्जत, जि. अहिल्यानगर), रामदास दामोदर पोळेकर (वय ३२, रा. पोळेकरवाडी, डोणजे, सिंहगड पायथा, ता. हवेली) अशी ‘मकोका’ कारवाई केलेल्या आरोपीची नावे आहेत.

शासकीय बांधकाम ठेकेदार विठ्ठल पोळेकर १४ नोव्हेंबर २०२४ रोजी सकाळी फिरायला निघाले होते. त्यावेळी दबा धरून बसलेल्या आरोपी योगेश भामे आणि त्याच्या साथीदारांनी ठेकेदार पोळेकर यांना धमकावून त्यांचे कार मधून अपहरण केले. त्यांच्यावर धारदार शस्त्राने वार करून खून करत त्यांच्या मृतदेहाचे तुकडे करुन संबंधित तुकडे हे खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्रात फेकून दिले होते.

आरोपी योगेश भामे आणि साथीदारांनी सिंहगड रस्ता, डोणजे, खडकवासला परिसरात गंभीर गुन्हे केले होते. त्यांनी ठेकेदार विठ्ठल पोळेकर यांच्याकडे दोन कोटीं रुपयांची खंडणी मागितली होती. पोळेकर यांच्याकडून रस्त्याचे काम करण्यात येत होते. भामे याने रस्त्याच्या कामात अडथळा आणण्याची धमकी दिली होती, तसेच भामे याने पोळेकर यांच्याकडे आलिशान कार मागितली होती. खंडणी देण्यास नकार दिल्यानंतर आरोपींनी त्यांचे अपहरण करून निर्घृण खून केला. याप्रकरणाचा तपास ग्रामीण गुन्हे शाखा, तसेच हवेली पोलिसांनी केला होता.

...तर मुख्यमंत्र्यांच्या कारकीर्दीला धोका! मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचा इशारा

...तर भारताचा 'टॅरिफ' कमी करू! व्हाइट हाऊसचे सल्लागार पीटर नवारो यांचे वक्तव्य

शक्तीपीठ महामार्ग जमीन संपादनातून कोल्हापूर वगळले; शेतकऱ्यांच्या विरोधानंतर महायुतीचा निर्णय

बिहारमध्ये जदयू १०२, भाजप १०१ जागा लढणार

नृशंस हत्यांचा कळस अन् बेदरकार नेतन्याहू