मोठी बातमी! महापालिका निवडणुकांसाठी ठाकरे बंधूंची युती; राज-उद्धव दोघांकडूनही अधिकृत घोषणा; कोणत्या जिल्ह्यांत एकत्र लढणार?

राज ठाकरे पत्रकार परिषदेत म्हणाले, "अनेक दिवसांपासून सर्वांना प्रश्न होता, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार का? त्यांची युती होणार का? तर आज मी महाराष्ट्राच्या जनतेला सांगतो...
मोठी बातमी! महापालिका निवडणुकांसाठी ठाकरे बंधूंची युती; राज-उद्धव दोघांकडूनही अधिकृत घोषणा;  कोणत्या जिल्ह्यांत एकत्र लढणार?
मोठी बातमी! महापालिका निवडणुकांसाठी ठाकरे बंधूंची युती; राज-उद्धव दोघांकडूनही अधिकृत घोषणा; कोणत्या जिल्ह्यांत एकत्र लढणार?
Published on

महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात झाल्यानंतर शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे या दोन्ही बंधूंच्या युतीची घोषणा बुधवारी (दि. २४) दुपारी १२ वाजता होणार, अशी माहिती शिवसेना ठाकरे गटाचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी मंगळवारी (दि.२३) सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली. त्यानुसार, आज वरळी येथील हॉटेल ब्लू सी याठिकाणी ठाकरे बंधूंनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. युतीच्या घोषणेआधी ठाकरे बंधूंनी शिवाजी पार्क येथील बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळावर जाऊन बाळासाहेबांना अभिवादन केले. यावेळी राज ठाकरे, उद्धव ठाकरे यांच्यासह रश्मी ठाकरे, शर्मिला ठाकरे, आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे यांचीही उपस्थिती होती.

महाराष्ट्राला फक्त ठाकरेच नेतृत्व देऊ शकतात

पत्रकार परिषदेच्या सुरुवातीला शिवसेना उबाठाचे प्रवक्ते संजय राऊत म्हणाले, "आजचा दिवस महाराष्ट्रासाठी ऐतिहासिक आहे. मराठी मंगलकलशची आठवण आज येत आहे. हा आनंदाचा क्षण महाराष्ट्राला अनुभवायला मिळत आहे. महाराष्ट्राला फक्त ठाकरेच नेतृत्व देऊ शकतात हे सांगणारी ही पत्रकार परिषद आहे."

संयुक्त पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे म्हणाले, "संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याची आठवण संजय राऊत यांनी करून दिली. अनेकांनी बलिदान देऊन मुंबई महाराष्ट्राला मिळवून दिली. संयुक्त महाराष्ट्राच्या लढाईत असलेले आमचे दोघांचे आजोबा प्रबोधनकार ठाकरे, माझे वडील बाळासाहेब ठाकरे आणि राज ठाकरे यांचे वडील श्रीकांत ठाकरे यांनी मुंबईसाठी बलिदान दिले."

एकत्र आलो आहोत...

पुढे ते म्हणाले, "मुंबईचे लचके तोडण्याचे मनसुबे दिल्लीत आखले जात आहेत. आज आम्ही आमचं कर्तव्य म्हणून एकत्र आलो आहोत. मी याआधीही म्हणालो आहे, एकत्र आलो आहोत एकत्र राहण्यासाठी."

चुकाल तर संपाल...

"तुटू नका फुटू नका, मराठीचा वसा टाकू नका. मला खात्री आहे मराठी माणूस कोणाच्या वाटेला जात नाही पण त्याच्या वाटेला कोणी गेलं तर जाऊ देत नाही. मुंबईला महाराष्ट्रापासून कोणी वेगळं करण्याचा प्रयत्न करेल तर त्याचा खात्मा केल्याशिवाय राहणार नाही. भाजपने अपप्रचार केला होता 'बटेंगे तो कटंगे' तसं मी आता सांगतोय, चुकाल तर संपाल." असा सूचक इशाराही यावेळी उद्धव ठाकरे यांनी दिला.

मुंबईचा महापौर मराठीच होणार

यावेळी राज ठाकरे म्हणाले, "निवडणूका लढवणाऱ्यांना संधी दिली जाईल. मुंबईचा महापौर मराठीच होणार आणि तो आमचाच होणार. कुठल्याही वादापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. तिथून आम्ही एकत्र येण्याची सुरुवात झाली. कोण किती जागा लढवणार, आकडा काय ते नाही सांगणार. महाराष्ट्रात लहान मुले पळवण्याच्या टोळ्या सक्रिय आहेत."

शिवसेना आणि मनसेची युती झाली

"अनेक दिवसांपासून सर्वांना प्रश्न होता, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार का? त्यांची युती होणार का? तर आज मी महाराष्ट्राच्या जनतेला सांगतो, शिवसेना आणि मनसेची युती झाली, हे जाहीर करतो", असे म्हणत राज ठाकरे यांनी युतीची अधिकृत घोषणा केली.

कोणत्या जिल्ह्यांत एकत्र लढणार?

ठाकरे बंधूंची ही युती मुंबईसह नाशिक, कल्याण-डोबिंवली, पुणे, ठाणे आणि मीरा-भाईंदर महापालिकांसाठी असणार आहे. अशी माहिती यापूर्वीच संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना दिली होती. आता युतीची अधिकृत घोषणा तर झाली आहे पण जागावाटपाचं काय? याची उत्कंठा अनेकांना लागली आहे.

युतीच्या चर्चांना पूर्णविराम

मराठीच्या मुद्द्यावरून २० वर्षांनंतर एकाच व्यासपीठावर एकत्र आल्यानंतर गेल्या काही महिन्यांपासून उद्धव ठाकरे व राज ठाकरे यांच्या गाठीभेटी वारंवार वाढल्याचे पाहायला मिळाले. त्यासोबतच, कौटुंबिक कार्यक्रमांमध्येही ठाकरे बंधू एकत्र दिसून आले. त्यामुळे हे दोन्ही बंधू राजकीयदृष्ट्या एकत्र येणार असे संकेत मिळाले होते. त्यानंतर संजय राऊत यांनीच युतीसंदर्भात सूतोवाच केल्याने महाराष्ट्रातील महत्त्वपूर्ण युतीवर शिक्कामोर्तब झाला होता. आता एकत्रितरित्या पत्रकार परिषद घेत राज आणि उद्धव ठाकरे यांनी युतीच्या चर्चांना पूर्णविराम दिला आहे.

logo
marathi.freepressjournal.in