आ. गायकवाड पुन्हा वादाच्या भोवऱ्यात; ‘शिवाजी कोण होता?’ पुस्तकावरून प्रकाशकाला धमकावले, विरोधी पक्षांकडून कारवाईची मागणी (Photo-X/@sanjaygaikwad34)
महाराष्ट्र

आ. गायकवाड पुन्हा वादाच्या भोवऱ्यात; ‘शिवाजी कोण होता?’ पुस्तकावरून प्रकाशकाला धमकावले, विरोधी पक्षांकडून कारवाईची मागणी

दिवंगत गोविंद पानसरे यांनी लिहिलेल्या ‘शिवाजी कोण होता?’ या पुस्तकाच्या शीर्षकावरून शिवसेना शिंदे गटाचे बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी गुरुवारी पुस्तकाच्या प्रकाशकाला अश्लील शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याने ते पुन्हा नव्या वादात सापडले आहेत.

Swapnil S

मुंबई : दिवंगत गोविंद पानसरे यांनी लिहिलेल्या ‘शिवाजी कोण होता?’ या पुस्तकाच्या शीर्षकावरून शिवसेना शिंदे गटाचे बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी गुरुवारी पुस्तकाच्या प्रकाशकाला अश्लील शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याने ते पुन्हा नव्या वादात सापडले आहेत. या प्रकरणी विरोधकांनी गायकवाड यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. यापूर्वीही मंत्रालयाच्या शेजारील आमदार निवासात उपाहारगृहाच्या कर्मचाऱ्याला केलेली मारहाण, कार्यकर्त्यांसाठी ३५ कोटींचे कमिशन सोडून दिल्याचे विधान करून गायकवाड यांनी वाद ओढवून घेतला होता.

गायकवाड यांनी पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबी यांना फोन करून पुस्तकाच्या शीर्षकावरून अर्वाच्च्य भाषेत शिवीगाळ केली. गायकवाड आणि आंबी यांच्यात मोबाईलवर झालेल्या संभाषणाची ऑडिओ क्लिप गुरुवारी समाज माध्यमांमध्ये व्हायरल झाली. पानसरे यांनी १९८८ मध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांची महती सांगणारे ‘शिवाजी कोण होता?’ या नावाचे पुस्तक लिहिले. पुस्तक प्रकाशित होऊन ३८ वर्षे झाल्यानंतर पुस्तकाच्या शीर्षकामुळे महाराजांचा अपमान होत असल्याचा साक्षात्कार गायकवाड यांना झाला आहे .

प्रकाशकाला फोनवरून जीभ कापण्याची धमकी

याबद्दल त्यांनी आंबी यांना फोनवर जीभ कापण्याची धमकी दिली. तसेच गोविंद पानसरे यांचे काय झाले माहित आहे ना? तू ब्राम्हण आहेस काय? असे सवाल करत गायकवाड यांनी आंबी यांना घरात घुसून मारण्याची धमकी दिली. ऑडिओ क्लिपमधील आवाज आपलाच असल्याचे गायकवाड यांनी मान्य केल्यानंतर विरोधी पक्षाने त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

शिवरायांचा कोणता वारसा पुढे नेत आहेत? -मेघा पानसरे

दरम्यान, प्रकाशकाला धमकावणाऱ्या आमदार गायकवाड यांना कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या स्नुषा मेघा पानसरे यांनी कोल्हापूर येथून सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे. गोविंद पानसरेंचे विचार महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचले असून ते संपवणे अशक्य आहे, तसेच त्यांच्या विचारसरणीचा प्रतिवाद करण्यासाठी तुमच्याकडे कोणताही सक्षम विचार नाही. गायकवाड यांनी कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्याविषयी ज्या पद्धतीची भाषा वापरली आहे, त्याचा मी तीव्र निषेध करते. छत्रपती शिवाजी महाराज हे सौजन्यशील, न्यायप्रिय आणि गोरगरीबांचा रयतेचा राजा म्हणून ओळखले जातात. त्यांचा वारसा सांगत आणि नाव घेत या पद्धतीची भाषा करणारे नक्की शिवरायांचा कोणता वारसा पुढे नेत आहेत? मी याचा निषेध करते, अशा शब्दांत मेघा पानसरे यांनी आ. गायकवाड यांच्या वर्तणुकीचा समाचार घेतला आहे.

संजय गायकवाड यांनी हे पुस्तक वाचावे...

पुढे बोलताना मेघा पानसरे म्हणाल्या, कॉम्रेड गोविंद पानसरे यांचे 'शिवाजी कोण होता' हे पुस्तक महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचले आहे. या पुस्तकाच्या लाखो प्रती छापल्या गेल्या आहेत, वाटल्या गेल्या आहेत. हे पुस्तक आजही वाचले जाते. कॉम्रेड पानसरे यांनी जो विचार सांगितला आहे तो मारता येत नाही, त्यावर दूसरा तुल्यबळ विचार त्यांच्यापाशी नाही. त्यामुळे अशा पद्धतीचा विचार केला जात आहे. संजय गायकवाड यांनी हे पुस्तक वाचलेय, असे मला वाटत नाही. त्यांनी केवळ पुस्तकाचे शीर्षक बघून हे वक्तव्य केल्याचे दिसत आहे. त्यांनी हे पुस्तक वाचावे, हे आवाहन आहे.

छत्रपतींचे नाव घेण्याचीही यांची पात्रता नाही - सपकाळ

प्रकाशकाला दिलेल्या काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी तीव्र निषेध करत गायकवाडांवर जोरदार टीका केली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेण्याचीदेखील गायकवाड यांची पात्रता नाही, अशा शब्दात त्यांनी हल्ला केला आहे. बुलढाणा जिल्ह्याचे नाव बदनाम करण्याचा विडाच त्यांनी उचलल्याचा आरोप करत त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलेय की, आमदार निवासातील कँटीनमध्ये हाणामारी करणे, सुरक्षेसाठी असलेल्या पोलिसांकडून स्वतःची गाडी धुवून घेणे आणि आता प्रकाशकाला धमकी देणे अशा अनेक घटनांमुळे गायकवाड सातत्याने वादात आहेत. एका लोकप्रतिनिधीने अशी भाषा वापरणे आणि अशा प्रकारे वागणे हे अत्यंत गंभीर असल्याचे त्यांनी नमूद केले.

गायकवाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल करा : वडेट्टीवार

स्वतःला छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज म्हणवून घेणाऱ्या आमदाराने पानसरे यांच्या हत्येचा संदर्भ देत इतरांना धमक्या देणे महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्यासाठी लज्जास्पद आहे. त्यामुळे धमकी देणाऱ्या आमदाराच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. त्याशिवाय प्रकाशक प्रशांत आंबी यांना पोलीस संरक्षण देण्याची मागणीही त्यांनी केली आहे.

मूळ मालकाला भरपाई दिल्याशिवाय प्रकल्पाग्रस्तांना जमिनीचे वाटप अयोग्य; मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय

प्रल्हाद जोशी नवे केंद्रीय शिक्षणमंत्री; धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर स्वीकारला पदभार

Mumbai : शिवाजी पार्कवर तरुणाईचा महासागर! ठाकरे बंधूंच्या विजय जल्लोष सभेला हजारोंची उपस्थिती; VIDEO

'ही केवळ सुरुवात, अजून खूप लांबचा पल्ला गाठायचा आहे'; अभिजीत दिपकेंचा नवा व्हिडीओ चर्चेत

युनेस्कोकडून सारनाथला जागतिक वारसा स्थळाचा दर्जा; भारताच्या सांस्कृतिक वैभवात मानाचा तुरा, जाणून घ्या इतिहास अन् वैशिष्ट्ये