महाराष्ट्र

"न्यायालयाने दिलेल्या निर्णयाच्या बळावर फुरफुरणाऱ्यांची मस्ती...", मनसेचे चित्रपट निर्मात्यांना थेट आव्हान; म्हणाले, "पाकड्यांकडून..."

"पाकिस्तानी कलाकार इथे खपवून घेतले जाणार नाहीत म्हणजे नाहीत, हीच मनसेची भूमिका होती, आहे आणि पुढेही राहणार. फक्त बॉलीवूडच नाही तर कोणत्याही भाषेतील चित्रपटात.."

Rakesh Mali

प्रसिद्ध पाकिस्तानी गायक अतिफ अस्लम हा सात वर्षांनंतर बॉलिवूडमध्ये कमबॅक करणार असल्याची सध्या चर्चा सुरु आहे. अतिफ अस्लमला 'लव्ह स्टोरी ऑफ ९०' या आगामी चित्रपटातील गाणे गाण्याची ऑफर देण्यात आली आहे. मात्र, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने याला विरोध दर्शवला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी याबाबत एक ट्विट केले असून यात त्यांनी बॉलिवूडसह इतर भाषेतील चित्रपट निर्मात्यांना इशारा दिला आहे. या ट्विटने अनेकांचे लक्ष वेधून घेतले आहे.

"अतिफ अस्लम या पाकड्या गायकाला बॉलीवूड फिल्ममध्ये गाण्यासाठी इथलेच काही निर्माते पायघड्या घालतायत. विरोध झाला तर फाट्यावर मारण्याची भाषा अरिजीत सिंग करतोय. न्यायालयाने दिलेल्या निर्णयाच्या बळावर फुरफुरणाऱ्यांची मस्ती आता उतरवावीच लागेल. पुन्हा पुन्हा सांगावं लागतंय हेच दुर्दैव आहे, पण तरीही सांगतोच. पाकिस्तानी कलाकार इथे खपवून घेतले जाणार नाहीत म्हणजे नाहीत, हीच मनसेची भूमिका होती, आहे आणि पुढेही राहणार. फक्त बॉलीवूडच नाही तर कोणत्याही भाषेतील चित्रपटात पाकड्यांकडून गाणं रेकॉर्ड करुन दाखवाच. हे चॅलेंज स्वीकारण्याची हिंमत कुणी करु नये, एवढाच सल्ला आत्ता देतोय", असे खोपकर यांनी त्यांच्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

सलमान खानच्या ‘टायगर जिंदा है’ या चित्रपटात अतिफ अस्लमने शेवटचे गाणे गायले होते. त्यानंतर भारत-पाकिस्तानातील संघर्ष वाढल्यामुळे पाकिस्तानी कलाकारांना भारतात कला सादर करण्यास मज्जाव करण्यात आल्याने अतिफही बॉलिवूडपासून दूर होता. परंतु, त्याला बॉलिवूडमधील चित्रपटात गाण्याची ऑफर असल्याने अमेय खोपकर यांनी संताप व्यक्त केला आहे. दरम्यान, खोपकर यांनी इशारा दिल्याने आता अरिजीत सिंग काय भूमिका घेतो, हे गाणे गाण्यापासून अतिफ अस्लमला अडवले जाते का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

न्यायालयाने का हटवली पाकिस्तानी कलाकारांवरील बंदी?

मुंबई उच्च न्यायालयाने २०२३च्या ऑक्टोबरमहिन्यात ही बंदी हटवली. सांस्कृतिक समरसता, एकता आणि शांती प्रस्थापित करण्याकरता ही बंदी हटवण्यात आली. विदेशी आणि शेजारील देशातील कलाकारांना विरोध करणे देशभक्ती होत नाही, असे कोर्टाने ही बंदी हटवताना म्हटले होते. २०१६ साली उरी दहशतवादी हल्ल्या झाल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर भारतात बंदी घालण्यात आली होती. इंडियन मोशन पिक्चर प्रोड्युसर्स असोसिएशनने सुरक्षा आणि देशभक्तीचा दाखला देत काही नियम बनवले होते. त्यानुसार सीमेपलिकडील कलाकारांना भारतात बंदी घालण्यात आली होती.

"६ जुलैपर्यंत मुसळधार पावसाचा इशारा, अनावश्यक प्रवास टाळा"; मुख्यमंत्री फडणवीसांचे नागरिकांना आवाहन

Telegram ला केंद्र सरकारची नोटीस; बेकायदेशीर चित्रपट आणि ओटीटी कंटेंटवर कारवाईचे निर्देश

Mumbai Rain : पावसाचा जोर कायम; मध्य, पश्चिम आणि हार्बर मार्गावरील लोकल सेवा विस्कळीत

Mumbai Rain : मुसळधार पावसाने मुंबईची दाणादाण; अनेक भाग जलमय, वसई-विरारलाही फटका, Video

जोगेश्वरीत भरधाव टँकरने डिलिव्हरी बॉयला चिरडलं; पळ काढणाऱ्या चालकाला नागरिकांनी केलं पोलिसांच्या हवाली, Video