

मुंबई : जोगेश्वरी पश्चिम येथे भरधाव टँकरने दुचाकीला धडक देऊन एका फूड डिलिव्हरी बॉयला चिरडल्याची धक्कादायक घटना शनिवारी (दि.४) पहाटे घडली. या भीषण अपघातात डिलिव्हरी बॉयचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर टँकरचालकाने घटनास्थळावरून पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, स्थानिक नागरिकांनी पाठलाग करून त्याला पकडत पोलिसांच्या ताब्यात दिले. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
भरधाव टँकरची दुचाकीला धडक
'टीव्ही ९ भारतवर्ष'च्या वृत्तानुसार, ओशिवरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एस. व्ही. रोडवरील अजित ग्लास गार्डनजवळ शनिवारी पहाटे सुमारे १.२० वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. हर्ष नावाचा तरुण ऑनलाइन फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्मसाठी रात्रीच्या वेळी डिलिव्हरीचे काम करत होता. त्याचवेळी भरधाव टँकरने त्याच्या दुचाकीला मागून जोरदार धडक दिली. धडकेनंतर टँकर त्याच्या अंगावरून गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला, अशी माहिती पोलिसांनी दिली.
अपघातानंतर चालकाने केला पळण्याचा प्रयत्न
अपघातानंतर टँकरचालकाने वाहनासह घटनास्थळावरून पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, घटनास्थळी उपस्थित नागरिक आणि प्रत्यक्षदर्शींनी टँकरचा पाठलाग करून चालकाला अडवले. त्यानंतर त्याला ओशिवरा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आला असून, त्यामध्ये पोलीस चालकाला ताब्यात घेत असल्याचे दिसत आहे. यावेळी संतप्त नागरिक चालकाविरोधात घोषणाबाजी करत असून, काही जण त्याच्यावर धावून जाण्याचाही प्रयत्न करताना दिसत आहेत. अपघातग्रस्त इलेक्ट्रिक दुचाकीही रस्त्यावर पडलेली दिसत आहे.
चालक मद्यधुंद होता का?
प्रत्यक्षदर्शींनी टँकरचालक मद्यधुंद अवस्थेत असल्याचा संशय व्यक्त केला आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी चालकाला ताब्यात घेत वैद्यकीय तपासणी आणि रक्ताचे नमुने तपासणीसाठी पाठवले आहेत. तो मद्याच्या प्रभावाखाली वाहन चालवत होता का, याचा अहवाल आल्यानंतर स्पष्ट होणार आहे.
दरम्यान, पोलिसांनी अपघातात वापरण्यात आलेला टँकर जप्त केला असून चालकाविरोधात संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला असून, घटनेचा पुढील तपास सुरू आहे.
(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)