MPSC आंदोलनात फूट? पुण्यात तीन ठिकाणी विद्यार्थ्यांची आंदोलने, विद्यार्थ्यांमध्येही मतभेद छायाचित्र : आनंद चैनी
महाराष्ट्र

MPSC आंदोलनात फूट? पुण्यात तीन ठिकाणी विद्यार्थ्यांची आंदोलने, विद्यार्थ्यांमध्येही मतभेद

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) अध्यक्षांना पदावरून हटविण्याच्या मागणीवरून सुरू झालेल्या स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला आता वेगळे वळण लागल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.

Swapnil S

पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) अध्यक्षांना पदावरून हटविण्याच्या मागणीवरून सुरू झालेल्या स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला आता वेगळे वळण लागल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेल्या मुख्य आंदोलनानंतर विद्यार्थ्यांच्या गटांमध्ये मतभेद निर्माण झाल्याने पुण्यात तीन स्वतंत्र ठिकाणी आंदोलने सुरू झाली आहेत. विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांकडून या आंदोलनांना पाठिंबा दिला जात असतानाच, आंदोलनाच्या मागण्यांवरून विद्यार्थ्यांमध्येच वेगवेगळे मतप्रवाह असल्याचे समोर आले आहे.

पुण्यातील एस. एम. जोशी पूल, हटविण्याच्या टिळक चौक आणि शास्त्री रस्ता येथे विद्यार्थ्यांकडून आंदोलने करण्यात येत आहेत. एमपीएससीचे अध्यक्ष विवेक भीमनवार यांना पदावरून मागणीसाठी आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली विद्यार्थ्यांनी १ ऑक्टोबरपासून आंदोलन सुरू केले. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी शास्त्री रस्त्यावर काही विद्यार्थ्यांनी स्वतंत्र आंदोलन सुरू केले. आंदोलनाच्या तिसऱ्या दिवशी टिळक चौकातही विद्यार्थ्यांच्या एका गटाने स्वतंत्र आंदोलन सुरू केले.

वर्णनात्मक पद्धतीऐवजी पुन्हा वस्तुनिष्ठ पद्धतीने परीक्षा घेण्याच्या हालचाली सुरू असल्याचा दावा करण्यात येत आहे. इतर काही राज्यांमध्ये वर्णनात्मक पद्धतीने परीक्षा घेतल्या जात असल्याचे सांगत, परीक्षा पद्धतीतील त्रुटी दूर करून वर्णनात्मक पद्धत कायम ठेवण्याची मागणी एका गटाने केली आहे.

दुसरीकडे, वस्तुनिष्ठ पद्धतीनेच परीक्षा घेण्यात याव्यात, अशी भूमिका काही विद्यार्थ्यांनी घेतली आहे. दरम्यान, आंदोलनाला मिळणारा राजकीय पाठिंबा आणि विविध नेत्यांची आंदोलनस्थळी उपस्थिती यावरून विद्यार्थी वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

परीक्षेच्या स्वरूपावरून वेगवेगळ्या भूमिका

परीक्षेच्या स्वरूपावरून विद्यार्थ्यांमध्ये वेगवेगळ्या भूमिका असल्याचे दिसून येत आहे. एका गटाकडून एमपीएससीच्या परीक्षा वर्णनात्मक पद्धतीनेच घेण्याची मागणी केली जात आहे. तर दुसऱ्या गटाकडून परीक्षा वस्तुनिष्ठ पद्धतीने घेण्याची मागणी करण्यात येत आहे. तिसऱ्या गटाने एमपीएससीच्या अध्यक्षांना पदावरून हटविण्याच्या मागणीवर भर दिला आहे. परीक्षा पद्धतीत वारंवार होणाऱ्या बदलांमुळे विद्यार्थ्यांच्या तयारीवर परिणाम होत असल्याचे काही विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. सरकारवर दबाव आणून परीक्षा नियमांमध्ये बदल करण्याचा प्रयत्न होत असल्याचाही आरोप काही विद्यार्थ्यांनी केला आहे.

राजकीय नेत्यांची आंदोलनस्थळी उपस्थिती

स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांना पाठिंबा देण्यासाठी भाजप, राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांतील तसेच काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांनी पुढाकार घेतल्याचे दिसून येत आहे. खासदार सुप्रिया सुळे, आमदार धनंजय मुंडे, गोपीचंद पडळकर, संग्राम जगताप आणि विक्रम पाचपुते यांनी विद्यार्थ्यांच्या मागण्यांबाबत पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिल्याचे सांगण्यात आले. आगामी एक-दोन दिवसांत आणखी राजकीय नेते आंदोलनस्थळी भेट देण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

वेळेआधीच मान्सूनची माघार; मुंबईसह महाराष्ट्रातून परतीचा प्रवास सुरू, हवामान खात्याची घोषणा

Mumbai : ठाकरे बंधूंचा आज गर्जना मोर्चा

'मविआ'त नाराजीनाट्य; काँग्रेसने विधान परिषद उमेदवारी जाहीर केल्याने आघाडीत बिघाडी; नेत्यांमध्ये आज पुन्हा चर्चा

शिवाजी पार्कवर विनापरवानगी आंदोलन; ५०० जणांवर गुन्हे, दीपकेंसह आयोजकांचा समावेश

जंतरमंतरवर १५० आंदोलक ताब्यात; नेहा बोरा, योगेंद्र यादव, प्रशांत भूषण यांचा समावेश