महाराष्ट्र

MPSC Students : पुण्यात एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचे पुन्हा आंदोलन ; टायपिंग स्किल टेस्टमध्ये बदल केल्यामुळे विद्यार्थी आक्रमक

लिपिक टंकलेखक आणि कर सहाय्यक कौशल्य चाचणीबाबत एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी हे आंदोलन सुरू केले

प्रतिनिधी

पुण्यात एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी पुन्हा आंदोलन सुरू केले असून, लिपिक टंकलेखक आणि कर सहाय्यक परीक्षेच्या टायपिंग स्किल टेस्टमध्ये आयोगाने केलेल्या बदलामुळे विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहेत. पुण्यातील बालगंधर्व चौकात एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचे हे आंदोलन सुरू आहे.

लिपिक टंकलेखक आणि कर सहाय्यक कौशल्य चाचणीबाबत एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी हे आंदोलन सुरू केले आहे. महाराष्ट्र आयोगाने टायपिंग स्किल टेस्ट ही महाराष्ट्र परीक्षा परिषद यांच्या नियमानुसार न घेता अचानक त्यात बदल केले आहेत. ही टेस्ट राज्य परीक्षा परिषद यांच्या नियमानुसार केली पाहिजे, या मागणीसाठी विद्यार्थी सोमवारी रस्त्यावर उतरले आहेत. जोपर्यंत ही मागणी पूर्ण होणार नाही तोपर्यंत आम्ही असेच रस्त्यावर उतरून आंदोलन करणार असल्याची भूमिका विद्यार्थ्यांनी घेतली आहे.

पुण्यातील बालगंधर्व चौकात विद्यार्थ्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. लिपिक टंकलेखक आणि कर सहाय्यक या परीक्षेसाठीच्या कौशल्य चाचणीसाठीची शब्दमर्यादा जास्त असल्यामुळे विद्यार्थ्यांनी हे आंदोलन सुरू केले आहे. आयोगाचा १२० ते १३० शब्दांचा पॅसेज १० मिनिटांमध्ये पूर्ण करावा लागतो, पण आयोगाने आता त्यात बदल करून मराठीसाठी ३०० शब्द आणि इंग्रजीसाठी ४०० शब्द केले आहेत. ही शब्दमर्यादा दुपटीपेक्षा जास्त असल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. अवघ्या सात दिवसांवर पेपर असताना हे बदल करण्यात आले आहेत. तसेच मराठीची चाचणी असताना आम्हाला हिंदीचा कीबोर्ड देण्यात आला आहे. अद्याप आयोगाकडून आम्हाला कोणताच प्रतिसाद मिळाला नसल्याचे विद्यार्थ्यांनी म्हटले आहे.

UPSC उमेदवार पडताळणीसाठी AI ची मदत घेणार

Mumbai-Ahmedabad Bullet Train Project : बुलेट ट्रेन प्रकल्पाला वेग; घणसोली-शीळफाटा दरम्यान पाच किमीचा बोगदा पूर्ण

Kalyan-Dombivli : रहिवाशांची फसवणूक करणाऱ्यांवर कारवाई - शिंदे

संघर्षाची सुरुवात व शेवट कसा करायचा हे भारताकडून शिकावे! हवाई दलप्रमुख ए.पी. सिंग यांचे प्रतिपादन

आत्मनिर्भर भारतच देशाची शक्ती - मोदी