मुंबई : राज्याच्या कानाकोपऱ्यात प्रवाशांना सुरक्षित पोहोचवणाऱ्या एसटीच्या लांब पल्ल्याच्या प्रवासात आता १५ टक्क्यांची सवलत मिळणार आहे. लांब व मध्यम पल्ल्याच्या (१५० किमीपेक्षा जास्त) प्रवासासाठी आगाऊ आरक्षण करणाऱ्या पूर्ण तिकीटधारी (सवलतधारक प्रवासी वगळून) प्रवाशांना तिकीट दरात १५ टक्के सवलत दिली जाणार आहे. ही योजना दिवाळी व उन्हाळी सुट्टीचा गर्दीचा हंगाम वगळता, वर्षभर सुरू राहणार आहे. या योजनेची अंमलबजावणी मंगळवार १ जुलैपासून करण्यात येणार आहे.
अधिकाधिक प्रवाशांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी सोमवारी केले. १ जूनला एसटीच्या ७७व्या वर्धापन दिनी सरनाईक यांनी कमी गर्दीच्या हंगामामध्ये लांब पल्ल्याच्या बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी आगाऊ आरक्षण केल्यास त्यांच्या तिकीटात १५ टक्के सूट देण्यात येईल, अशी घोषणा केली होती. त्यानुसार ही योजना सर्वप्रकारच्या बसेससाठी १ जुलैपासून लागू करण्यात येत आहे. अर्थात, ही योजना पूर्ण तिकीट काढणाऱ्या प्रवाशांसाठी लागू राहणार आहे.येत्या आषाढी एकादशीला व गणपती उत्सवासाठी आगाऊ आरक्षण करणाऱ्या प्रवाशांना या योजनेचा लाभ घेता येऊ शकतो.