कराड : आळंदीहून प्रस्थान केलेल्या संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पालखीचे सातारा जिल्ह्यात गुरुवारी आगमन झाले असून, येत्या ६ जून रोजी आषाढी एकादशीनिमित्त वारकरी पंढरपूला जात असल्याच्या पार्श्वभूमीवर वारकरी आणि भाविकांच्या सोयीसाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ सज्ज झाले आहे. पालखी सोहळ्याच्या कालावधीत २६ ते २९ जूनदरम्यान वारकऱ्यांच्या सेवेसाठी विविध मार्गांवर एकूण ९६ विशेष बसेस सोडण्यात येणार असल्याची माहिती एसटी प्रशासनाने दिली आहे.
सातारा जिल्ह्यातील विविध आगारांमधून या बसेसची व्यवस्था करण्यात आली असून यामध्ये फलटण आगारातून सर्वाधिक २८ बसेस तर सातारा येथून १२ वाई आणि दहिवडी प्रत्येकी १०,पारगाव खंडाळा १० आणि वडुज येथून आठ बसेस वारकऱ्यांच्या सेवेत असतील. या व्यतिरिक्त कराड, कोरेगाव, पाटण, महाबळेश्वर आणि मेढा आगारांतूनही बसेस उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. सातारा-लोणंद मार्गावर २८ बसेस तर लोणंद-फलटण-पंढरपूर-शिंगणापूर मार्गावर २४ बसेस असतील.
दरम्यान,२९ जूननंतरही आषाढी एकादशी संपल्यानंतर म्हणजे गुरुपाैर्णिमा १० जुलैपर्यंत प्रवाशांच्या संख्येनुसार परतीच्या प्रवासासाठीही या बसेस सोडण्यात येणार आहेत.
वाहतूक निरीक्षक व नियंत्रकांची नियुक्ती
श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याच्या सातारा जिल्ह्यातील पालखी मार्गावर कापडगाव फाटा, गोटे माळ, विरोबाबस्ती येथे तात्पुरत्या शेड्सची उभारणी करण्यात आली असून, तेथे वाहतूक निरीक्षक व नियंत्रकांची नियुक्ती केली आहे. लोणंद, तरडगाव फलटण, बरड येथे अतिरिक्त अधिवारी व कर्मधारी नियुक्त करून वाहतूक सुरळीत ठेवण्याचे नियोजन करण्यात आले आहे, असेही एसटी प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
अतिरिक्त बसेसची सोय
तरडगाव मुक्कामावेळी तरडगाव-फलटण मार्गावर १० आणि तरडगाव- लोणंद मार्गावर पाच जादा बसेस फलटण मुक्कामावेळी (दि. २८) फलटण-सातारा मार्गावर ३० फलटण-शिंगणापूर-पंढरपूर मार्गावर २० तर बरड मुक्कामावेळी (दि. २९) फलटण-बरड मार्गावर १० जादा बसेस सोडण्यात येतील.