ऑगस्टमध्ये एसटीच्या उत्पन्नात ६६ कोटींची वाढ; प्रवाशांच्या मागणीनुसार फेऱ्या वाढविण्याचा सकारात्मक परिणाम (संग्रहित छायाचित्र)
महाराष्ट्र

ऑगस्टमध्ये एसटीच्या उत्पन्नात ६६ कोटींची वाढ; प्रवाशांच्या मागणीनुसार फेऱ्या वाढविण्याचा सकारात्मक परिणाम

एसटी महामंडळाच्या उत्पन्नवाढीसाठी एसटी महामंडळाने राबविलेल्या उपक्रमांचा परिणाम आता दिसून येऊ लागला आहे. जुलै महिन्याच्या तुलनेत ऑगस्टमध्ये एसटीच्या उत्पन्नात तब्बल ६६ कोटी रुपयांची वाढ झाली आहे. प्रवाशांच्या मागणीनुसार फेऱ्या वाढविल्यामुळे हा परिणाम दिसून आला आहे.

Swapnil S

मुंबई : एसटी महामंडळाच्या उत्पन्नवाढीसाठी एसटी महामंडळाने राबविलेल्या उपक्रमांचा परिणाम आता दिसून येऊ लागला आहे. जुलै महिन्याच्या तुलनेत ऑगस्टमध्ये एसटीच्या उत्पन्नात तब्बल ६६ कोटी रुपयांची वाढ झाली आहे. प्रवाशांच्या मागणीनुसार फेऱ्या वाढविल्यामुळे हा परिणाम दिसून आला आहे.

महामंडळाने उत्पन्नवाढीसाठी सुचविलेल्या उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी सुरू झाल्याने एसटीच्या तोट्याचे प्रमाणही कमी होऊ लागले आहे. आगामी काही महिन्यांत एसटीचा चालू तोटा भरून काढण्याच्या दिशेने महामंडळाची वाटचाल सुरू झाली आहे. एसटीच्या एकूण प्रवाशांपैकी तब्बल ८५ टक्क्यांहून अधिक प्रवासी १०० किलोमीटरच्या आतील अंतरात प्रवास करतात. त्यामुळे प्रत्येक आगाराने आपल्या कार्यक्षेत्रातील प्रवाशांची गरज ओळखून त्यानुसार वाहतूक नियोजन करण्याची तयारी सुरू केली आहे.

महामंडळ गेल्या काही वर्षांत अनुत्पादक फेऱ्यांवर अधिक भर देत होते. त्यामुळे प्रवासी संख्या आणि उत्पन्नाच्या तुलनेत खर्च अधिक होऊन एसटीच्या तोट्यात भर पडत होती. त्यानंतर ऑगस्ट महिन्यापासून प्रत्येक आगाराने प्रवाशांची प्रत्यक्ष उपलब्धता आणि प्रवासाची मागणी लक्षात घेऊन वेळापत्रकात आवश्यक बदल करण्यास सुरुवात केली.

ग्रामीण तसेच निमशहरी भागातील दररोज प्रवास करणारे नोकरदार, शेतकरी, महिला, विद्यार्थी-विद्यार्थिनी आणि ज्येष्ठ नागरिक यांच्या प्रवासाच्या वेळा लक्षात घेऊन बसफेऱ्यांचे नियोजन करण्यात आले. त्याचबरोबर आठवडी बाजार, यात्रा-जत्रा तसेच स्थानिक गर्दीचे दिवस लक्षात घेऊन संबंधित मार्गांवर अतिरिक्त फेऱ्याही वाढविण्यात आल्या.

ऑगस्ट महिन्यात प्रथमच एसटीने एक हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक मासिक उत्पन्न मिळवले आहे. उत्पन्नवाढीचा हा कल कायम राहिल्यास पुढील दोन ते तीन महिन्यांत एसटीचा चालू तोटा भरून निघण्याची शक्यता आहे. ‘जिथे प्रवासी, तिथे एसटीची फेरी’ या भूमिकेतून करण्यात आलेल्या बदलांचा थेट परिणाम एसटीच्या उत्पन्नावर दिसून आला आहे.

३१ ऑगस्टला एसटीचे विक्रमी उत्पन्न

विविध उपाययोजनांसह रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर ३१ ऑगस्ट रोजी एसटीला आतापर्यंतचे सर्वाधिक दैनंदिन उत्पन्न मिळाले. एका दिवसात तब्बल ४५ कोटी रुपयांची तिकीट विक्री झाली. विशेष म्हणजे, एसटीच्या इतिहासात प्रथमच एका दिवसात एवढे विक्रमी उत्पन्न मिळाले आहे. सध्या एसटीला दररोज सरासरी ३४ ते ३५ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळते. त्या तुलनेत ३१ ऑगस्ट रोजी एका दिवसात सुमारे १० कोटी रुपयांचे विक्रमी उत्पन्न महामंडळाने मिळवले. प्रवाशांची गरज आणि मागणी लक्षात घेऊन बस फेऱ्यांचे करण्यात आलेले नियोजन यामागील प्रमुख कारण ठरले आहे.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Mumbai : बाप्पा आम्हाला पाव, पण फुले खाणार भाव! गणेशोत्सवात फुलांचे दर वाढणार

मध्य रेल्वेच्या अतिरिक्त गणपती 'विशेष गाड्या'; पनवेल-चिपळूण दरम्यान ३० अनारक्षित मेमू सेवा, LTT आणि मडगाव दरम्यान ४ गाड्या

मुंबईत सप्टेंबरमध्येही पाऊस रुसणार

आरोग्य मंत्र्यांचा ‘परफॉर्मन्स मंत्र'; अधिकाऱ्यांना पुढची जबाबदारी कामगिरीनुसार, नियुक्त्यांमध्येही गुणवत्तेला प्राधान्य

महाराष्ट्र स्वतंत्र डेटा सेंटर धोरण तयार करणार