तब्बल ३३ तासांनंतर मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील अभूतपूर्व वाहतूक कोंडी फुटली असून अडकलेल्या हजारो वाहनचालकांना मोठा दिलासा मिळाला आहे. आडोशी बोगद्याजवळ उलटलेला अत्यंत ज्वलनशील प्रोपलिन वायूचा टँकर हटवण्यात आल्यानंतर मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावरील वाहतूक पहाटे १.४६ वाजता पुन्हा सुरू करण्यात आली, अशी माहिती महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या (एमएसआरडीसी) एका अधिकाऱ्याने दिली आहे.
प्रोपलिन गॅस सुरक्षितरीत्या इतर टँकरमध्ये हस्तांतरित
MSRDC अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, बुधवारी रात्री उशिरा उलटलेल्या टँकरमधील प्रोपलिन गॅस सुरक्षितरीत्या इतर टँकरमध्ये हस्तांतरित करण्यात आला. त्यानंतर अवजड क्रेनच्या सहाय्याने अपघातग्रस्त टँकर हटवण्यात आला. अखेर गुरुवारी पहाटे १.४६ वाजता मुंबईकडे जाणारी वाहतूक सुरू करण्यात आली.
पुन्हा मंदावली होती वाहतूक
टँकर हटवल्यानंतर घाट विभागातील वाहतूक हळूहळू सुरळीत झाली. मात्र काही अवजड वाहने अडकून पडल्याने काही काळ वाहतूक संथ होती. काही तासांत परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आली, अशी माहिती पोलिस अधिकाऱ्यांनी दिली. गुरुवारी सकाळी ७.३० च्या सुमारास अमृतांजन पुलाजवळील घाटाच्या पट्ट्यात काही अवजड वाहने बंद पडल्यामुळे वाहतूक काही काळासाठी मंदावली होती, असे त्यांनी सांगितले. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF), राज्य आपत्ती प्रतिसाद दल (SDRF), भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (BPCL), महामार्ग पोलीस आणि MSRDC यांनी संयुक्तपणे हे काम केले.
महिला, लहान मुलांचे हाल
मंगळवारी संध्याकाळी ५ वाजण्याच्या सुमारास टँकर उलटल्यानंतर प्रोपलिन गॅसची गळती सुरू झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते. खबरदारी म्हणून वाहतूक थांबवण्यात आली होती. मुंबईकडे जाणारा मार्ग पूर्णपणे बंद करण्यात आला होता, तर पुण्याकडे जाणाऱ्या मार्गावर टप्प्याटप्प्याने वाहतूक वळवण्यात आली होती. निर्माण झालेल्या प्रचंड कोंडीमुळे MSRDC ने तात्पुरते टोल वसुलीही स्थगित केली होती. जवळपास २०-२५ किमी लांब वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. महिला आणि मुलांसह प्रवासी, अन्न, पाणी किंवा शौचालयाच्या सुविधेविना अनेक तास आपल्या वाहनांमध्ये अडकून पडले होते.