मुंबई : आतापर्यंत ४,७८३ तृतीयपंथीयांना ओळखपत्र जारी करण्यात आले आहेत. उर्वरित ओळखपत्र लवकरच जारी करण्यात येणार असल्याची माहिती राज्य शासनाच्या वतीने देण्यात आली. समाजातील तृतीयपंथीयांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शिक्षण, आरोग्य आणि रोजगारात समान संधी देत योजनांची प्रभावी अंमलबजावणी व्हावी, त्यांना मोफत व उच्च शिक्षण मिळावे यासाठी उपाययोजना करण्याचे निर्देशही सामाजिक न्याय राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी दिले.
६८ तृतीयपंथी उच्च शिक्षण घेत असून अधिकाधिक तृतीयपंथी यांच्यात शिक्षणाची रुची वाढावी, विदेशी शिष्यवृत्तीचा ही भविष्यात त्यांना लाभ मिळावा यासाठी प्रबोधनपर कार्यक्रम घ्यावेत, असे निर्देश मिसाळ यांनी दिले.
आतापर्यंत ३,९०१ आधार कार्ड वितरीत करण्यात आले असून १,२४० आयुष कार्ड प्रदान करण्यात आले आहेत. वैद्यकीय सुविधा देण्यासंदर्भात वैद्यकीय मंडळाने आरोग्य संदर्भात समुपदेशन करावे, अशा सूचनाही करण्यात आल्या आहेत.