कोकणात शिमग्याक जावा सहा तासांत; मुंबई-विजयदुर्ग रो-रो सेवेला अखेर १ मार्चचा मुहूर्त; मोजावे लागणार तीन ते नऊ हजार रुपये 
महाराष्ट्र

कोकणात शिमग्याक जावा सहा तासांत; मुंबई-विजयदुर्ग रो-रो सेवेला अखेर १ मार्चचा मुहूर्त; मोजावे लागणार तीन ते नऊ हजार रुपये

मुंबई-कोकण प्रवास जलद करण्यासाठी महाराष्ट्र सागरी मंडळाची मुंबई–विजयदुर्ग रो-रो सेवा अखेर सुरू होत आहे. ऑगस्ट २०२५ मध्ये गणेशोत्सवात सुरू होणारी ही सेवा काही कारणांमुळे रखडली होती. आता १ मार्चपासून भाऊचा धक्का येथून सकाळी ८ वाजता ‘एम टू एम’ बोट सुटणार असून अवघ्या सहा तासांत कोकण गाठता येणार आहे. या प्रवासासाठी ३ ते ९ हजार रुपये भाडे आकारले जाणार आहे.

Swapnil S

मुंबई : मुंबई-कोकण प्रवास अतिजलद करता यावा यासाठी महाराष्ट्र सागरी मंडळाने मुंबई-विजयदुर्ग रो-रो सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार गेल्या ऑगस्ट २०२५ मध्ये, गणेशोत्सवादरम्यान ही सेवा सुरू होणार होती. मात्र काही कारणांमुळे ती सुरू होऊ शकली नाही. त्यामुळे गणेशोत्सवात बोटीने कोकणात जाण्याचे प्रवाशांचे स्वप्न अपूर्णच राहिले. आता मात्र शिमग्यात रो-रो सेवेद्वारे केवळ सहा तासांत कोकण गाठता येणार आहे. रखडलेल्या या सेवेसाठी अखेर १ मार्चचा मुहूर्त निश्चित करण्यात आला असून १ मार्चपासून मुंबई-विजयदुर्ग रो-रो सेवा सुरू होत आहे. भाऊचा धक्का येथून १ मार्च रोजी सकाळी ८ वाजता पहिली 'एम टू एम' बोट सुटणार आहे. मात्र या अतिजलद जलप्रवासासाठी प्रवाशांना तीन ते नऊ हजार रुपये मोजावे लागणार आहेत.

सुसाट आणि सुखकर प्रवास मुंबई-कोकण असा दैनंदिन प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. मुंबई-गोवा महामार्ग प्रकल्प अनेक वर्षे रखडल्याने रस्ते मार्गे प्रवास हा वेळखाऊ आणि गैरसोयीचा होत आहे, तर रेल्वे किंवा एसटीने कोकण गाठण्यासाठी किंवा कोकणातून मुंबईत परतण्यासाठी १२ ते १४ तास लागत आहेत. त्यातही गणेशोत्सव व अन्य काळात प्रवास अत्यंत वेदनादायी व कष्टप्रद होतो. या पार्श्वभूमीवर जलवाहतुकीचा पर्याय उपलब्ध करून मुंबई -कोकण प्रवास सुसाट आणि सुखकर करण्याचा निर्णय सागरी मंडळाने घेतला. त्यानुसार मुंबई- विजयदुर्ग असा जलमार्ग निश्चित करण्यात आला.

प्रवासी जेट्टीचे केले रो-रो जेट्टीत रूपांतर

विजयदुर्ग येथील प्रवासी जेट्टीचे रो-रो जेट्टीत रूपांतर करण्याचे काम हाती घेण्यात आले. भाऊचा धक्का आणि विजयदुर्ग जेट्टी येथे आवश्यक पायाभूत सुविधा विकसित करण्यात आल्या. बोटीची चाचणीही पूर्ण करण्यात आली. ही सर्व तयारी पूर्ण करून ऑगस्ट २०२५ मध्ये गणेशोत्सवादरम्यान सेवा सुरू करण्याचे नियोजन होते. मात्र तांत्रिक अडचणी आणि परवानग्या मिळण्यासाठी झालेल्या विलंबामुळे सेवा सुरू होऊ शकली नाही. आता १ मार्चपासून मुंबई - विजयदुर्ग रो-रो सेवा सुरू होणार असल्याची माहिती सागरी मंडळातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.

मुंबईहून बुधवार, शनिवार बोट

'एम टू एम प्रिन्सेस' ही बोट मुंबई विजयदुर्गदरम्यान धावणार आहे. प्रत्येक बुधवारी आणि शनिवारी सकाळी ८ वाजता ही बोट मुंबईहून सुटेल आणि दुपारी सुमारे २ वाजता विजयदुर्गला पोहोचेल. विजयदुर्ग- मुंबईदरम्यान गुरुवारी आणि रविवारी बोट धावेल. दुपारी १२ वाजता विजयदुर्गहून सुटणारी बोट सायंकाळी ६ पर्यंत मुंबईत पोहोचेल. या अतिजलद प्रवासासाठी ३००० ते ९००० रुपये असे तिकीटदर निश्चित करण्यात आले आहेत. हे दर प्रवाशांना परवडतात का आणि सेवेला कसा प्रतिसाद मिळतो, हे लवकरच स्पष्ट होईल.

तिकीट दर

  • इकॉनॉमी-३००० रुपये

  • प्रीमियम इकॉनॉमी-५००० रुपये

  • बिझनेस-७००० रुपये

  • प्रथम श्रेणी-९००० रुपये

वाहनांसाठी दर

  • एक्सएल (एक्स्ट्रालार्ज)-९००० रुपये

  • एल (लार्ज)-८००० रुपये

  • एम (मीडियम)-७००० रुपये

  • एस (स्मॉल)-६००० रुपये

  • दुचाकी-१००० रुपये

  • सायकल-६०० रुपये

प्रवासाचे वेळापत्रक

  • मुंबई-विजयदुर्ग - प्रत्येक बुधवारी आणि शनिवारी सकाळी ८ वाजता भाऊचा धक्का येथून सुटणार

  • विजयदुर्ग-मुंबई - प्रत्येक गुरुवारी आणि रविवारी दुपारी १२ वाजता विजयदुर्ग जेट्टीवरून सुटणार

अधिक माहितीसाठी संकेतस्थळ http://www.m2mfer ries.com

नळाला पाणी नाही, पण बिल वाढले! पहिल्याच महासभेत उल्हासनगरकरांना पाणीपट्टीचा झटका

जाधवजी मॅन्शन बहुमजली इमारतीवर टांगती तलवार; निर्धारित उंचीपेक्षा उभारलेले वरचे मजले पाडावे लागतील, हायकोर्टाचा इशारा

तात्पुरत्या स्वरूपात कामावर ठेवलेला चालक 'कर्मचारी'च; मुंबई उच्च न्यायालयाचा निकाल

MPSC च्या राज्यसेवांमध्ये ४८४ जागांची वाढ? खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर यांची मुख्यमंत्री फडणवीसांकडे मागणी

रायगड जिल्हा परिषदेचे भवितव्य गोव्यात ठरणार; भाजप-राष्ट्रवादीच्या नवनिर्वाचित सदस्यांचा फोटो व्हायरल