पीटीआय
महाराष्ट्र

महाविकास आघाडीची पंचसूत्री; बड्या उद्योगपतींच्या मदतीने भाजपने मविआ सरकार पाडले - राहुल गांधी

महायुती सरकारने अडीच वर्षांच्या काळात काय केले याची चिरफाड करत महाविकास आघाडीने बुधवारी आपला ‘पंचसूत्री’ जाहीरनामा प्रसिद्ध केला.

Swapnil S

मुंबई : महायुती सरकारने अडीच वर्षांच्या काळात काय केले याची चिरफाड करत महाविकास आघाडीने बुधवारी आपला ‘पंचसूत्री’ जाहीरनामा प्रसिद्ध केला. महिलांना एसटीचा मोफत प्रवास, कर्नाटक-तेलंगणा राज्यांप्रमाणे महाराष्ट्रात महालक्ष्मी योजना राबवत महिलांच्या बँक खात्यात दर महिना ३ हजार रुपये जमा होणार, कृषी समृद्धी योजनेंतर्गत शेतकऱ्यांना ३ लाखांपर्यंत कर्जमाफी, ५० हजार रुपये शेतकऱ्यांना प्रोत्साहन अशी ‘पंचसूत्री’ जाहीर करीत महाविकास आघाडीने बीकेसी मैदानात प्रचाराचा नारळ फोडला.

यावेळी बोलताना लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी म्हणाले की, दोन-तीन उद्योगपतींच्या मदतीने भाजपने पैसे देऊन महाराष्ट्रातील मविआचे सरकार पाडले. धारावीची एक लाख कोटी रुपयांची गरिबांची जमीन तुमच्या डोळ्यादेखत बळकावून एका अरबपतीला दिली जात आहे. महाराष्ट्रातील उद्योग दुसऱ्या राज्यात पळवल्याने राज्याचे ५ लाख रोजगार गेले. आयफोन कंपनी, टाटा एअरबस प्रकल्प, वेदांता फॉक्सकॉन गुजरातला पळवले. आता तुमच्यासाठी काम करणारे सरकार निवडून द्या, असे आवाहन राहुल गांधी यांनी यावेळी केले.

महाराष्ट्रातील सरकार महिलांना पैसे देण्याची घोषणा करत आहे, दुसरीकडे पेट्रोल, डिझेल, गॅससह सर्व वस्तुंची महागाई झाली आहे. या महागाईतून भाजप सरकार प्रत्येक कुटुंबाच्या खिशातून ९० हजार रुपये काढून घेते व अदानीसारख्या अरबपतींना देत आहे. अदानी, अंबानी रोजगार देऊ शकत नाहीत, रोजगार लघु, मध्यम व्यापारी देतात. पण भाजप सरकारने हे उद्योगच बंद केले. जीएसटी, नोटबंदी हे छोट्या व्यापाऱ्यांना मारणारे शस्त्र आहे, असेही राहुल गांधी सांगितले.

महायुतीच्या काळात सर्वच क्षेत्रात भ्रष्टाचार - शरद पवार

महायुती सरकारच्या काळात महिलांवरील अत्याचार वाढले आहेत. भ्रष्टाचार बोकाळला असून शिक्षण, आरोग्य क्षेत्रात प्रचंड भ्रष्टाचार सुरु आहे. मालवणमध्ये छत्रपतींचा पुतळा भ्रष्टाचारामुळे कोसळला, यावरून भ्रष्टाचार कोणत्या टोकाला पोहचला हे दिसून येते. डॉ. मनमोहनसिंह यांचे सरकार असताना ७१ हजार कोटींची शेतकरी कर्जमाफी जाहीर केली होती. आता मविआचे सरकार आल्यावर शेतकऱ्यांचे तीन लाख रुपयांचे कर्ज माफ करू व नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार प्रोत्साहन देऊ, असे आश्वासन देऊन मविआचे सरकार बहुमताने निवडून देण्याचे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले.

शिंदे-भाजपच्या चोरांच्या सरकारला घरी बसवा - खर्गे

यावेळी बोलताना काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे म्हणाले की, नरेंद्र मोदींनी आतापर्यंत अनेक गॅरंटी दिल्या पण त्यातील एकही पूर्ण केली नाही. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणार, प्रत्येकाच्या खात्यात १५ लाख रुपये देऊ, दरवर्षी २ कोटी नोकऱ्या देऊ अशा गॅरंटी दिल्या, पण त्यातील एकही पूर्ण केली नाही, ते सातत्याने खोटे बोलतात. काँग्रेस पक्षाने कर्नाटकमध्ये ज्या गॅरंटी दिल्या त्या पूर्ण केल्या आहेत. मोदींनी फक्त अदानी, अंबानींची गॅरंटी पूर्ण केली. मुंबई भारताची आर्थिक राजधानी आहे, देशाचे नाक आहे, पण भाजप सरकारने मुंबईला काय दिले याचे उत्तर दिले पाहिजे. लोकशाही व संविधान वाचवण्याचे काम आपल्याला करावे लागणार आहे. फुले, शाहु, आंबेडकरांनी देशाला दिशा दिली, पण त्याच महाराष्ट्रात या विचाराला संपवण्याचे काम केले जात आहे. अदानीच्या बंदरातून ड्रग्ज येत आहे ते थांबवले पाहिजे. उडता पंजाबसारखी महाराष्ट्राची अवस्था होऊ देऊ नका. शिंदे, भाजपच्या चोरांच्या सरकारला घरी बसवा, असे आवाहन खर्गे यांनी केले आहे.

कोळीवाडे, गावठाण जागा बिल्डरांच्या घशात जाऊ देणार नाही - उद्धव ठाकरे

मोदी व शिंदे सरकार महागाईवर नियंत्रण मिळवू शकले नाहीत, पण मविआचे सरकार आल्यानंतर पाच जीवनावश्यक वस्तूंचे भाव स्थिर ठेवले जातील. आम्ही जे बोलतो तेच करतो, मविआ सरकार असताना २ लाख रुपयांचे शेतकरी कर्जमाफ केले आहे. आता मुलांनाही मोफत शिक्षण दिले जाईल. एक धारावी वसवण्यासाठी मुंबईतील किती जमिनी अदानीला देणार? दहिसर, मालवण, मुलुंड, मदर डेअरीची जमीन दिली आहे. मविआचे सरकार आल्यानंतर धारावीच्या निविदा रद्द केल्या जातील. आता क्लस्टरच्या नावाखाली कोळीवाडे व गावठाणही बिल्डरांच्या घशात घालण्याचा प्रयत्न सुरू आहे, पण आम्ही ते होऊ देणार नाही. महाराष्ट्राचे गुजरातीकरण सुरू आहे ते थांबवायचे आहे. मुंबई व महाराष्ट्राची जनता जागरुक आहे, असे सांगून २३ तारखेला विजयाचे फटाके फोडायचे आहेत. महाविकास आघाडीचे सरकार आल्यावर सुशिक्षित बेरोजगार तरुणांना चार हजार रुपये महिना मदत करण्यात येईल, असे शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

पोलिसांच्या सहाय्याने निवडणुका जिंकण्याचा प्रयत्न - पटोले

आपला महाराष्ट्र महाराष्ट्रद्रोही, शिवद्रोही लोकांपासून वाचवण्याची गरज आहे. शिंदे, भाजप सरकारने महाराष्ट्र गुजरातला गहाण ठेवला आहे, नोकरभरती बंद केली आहे, पवित्र पोर्टलच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची फसवणूक केली जात आहे. मोदी-शहा महाराष्ट्राला एटीएम समजून लुटत आहेत, त्यांच्याविरोधातील ही लढाई आहे. देवेंद्र फडणवीसांनी लाल रंग नक्षलवाद्यांशी जोडून हिंदूंचा अपमान केला आहे. पोलीस विभागात निवृत्त झालेल्या अधिकाऱ्याला मुदतवाढ दिली जात आहे. पोलीस विभागात दुसरे कोणी कार्यक्षम अधिकारी नाहीत का? निवडणुकीच्या काळात पोलीस यंत्रणेचा वापर करता यावा यासाठी भाजप हे काम करत आहे. निवडणूक आयोगाकडे सातत्याने तक्रार केल्यानंतर पोलीस महासंचालक बदलला. झारखंड व पश्चिम बंगालमध्ये एक कायदा व महाराष्ट्रात दुसरा का? पोलिस यंत्रणेच्या माध्यमातून निवडणुका जिंकण्याचा प्रयत्न सुरु आहे, पण आम्ही ते खपवून घेणार नाही. महाराष्ट्रातील स्वाभिमानी जनता लोकसभेपेक्षा जास्त बहुमताने मविआचे सरकार निवडून देईल, असा विश्वास यावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केला.

मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा खा. वर्षा गायकवाड यांनीही आपल्या भाषणातून केंद्र व राज्य सरकारवर चौफेर टीका केली.

या सभेला काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खा. शरद पवार, शिवसेना पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण, काँग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्य आणि प्रदेश कार्याध्यक्ष नसीम खान, मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष खा. वर्षा गायकवाड, राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, शिवसेना खासदार संजय राऊत, सुप्रिया सुळे, राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत, छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल, कर्नाटकचे गृहमंत्री जी. परमेश्वर, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस अविनाश पांडे, मुकुल वासनिक, समाजवादी पक्षाचे नेते अबु आझमी यांच्यासह महाविकास आघाडीचे प्रमुख नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पंचसूत्री

महिलांना महिन्याला ३ हजार रुपये

युवकांना महिन्याला ४ हजार रुपये

५० टक्के आरक्षणाची मर्यादा हटवणार

२५ लाखांपर्यंत आरोग्य विमा

नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ३ लाखांपर्यंत कर्जमाफी

मविआचा महानिक्काल, महायुतीच लाडकी; महायुतीला २३६ जागा, तर मविआला केवळ ४९ जागा

‘लाडकी बहीण’ योजना ठरली गेमचेंजर; देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्रीपदाचे प्रमुख दावेदार

झारखंडमध्ये ‘जेएमएम’च्या नेतृत्वाखालील सरकार; इंडिया आघाडीकडे बहुमत, भाजप दुसऱ्या क्रमांकावर

‘सिंह’ म्हातारा झालाय!

‘बटेंगे तो कटेंगे’, ओबीसीने भाजपला तारले