बारावी गणिताचा पेपरही फुटला; रसायनशास्त्र, भौतिकशास्त्राचा पेपर फुटल्यानंतर गुन्हा दाखल; मुख्य सूत्रधार अजूनही फरार 
महाराष्ट्र

बारावी गणिताचा पेपरही फुटला; रसायनशास्त्र, भौतिकशास्त्राचा पेपर फुटल्यानंतर गुन्हा दाखल; मुख्य सूत्रधार अजूनही फरार

बारावी पेपरफुटीबाबत धक्कादायक खुलासे सुरूच आहेत. नागपूर विभागात सेंट उर्सुला शाळेत एका मुलीच्या मोबाईलवरून १६ फेब्रुवारीला रसायनशास्त्र आणि १८ फेब्रुवारीला भौतिकशास्त्राचा पेपर फुटल्याचे उघड झाले होते. याप्रकरणी १८ फेब्रुवारी रोजी पेपर फुटीचा गुन्हा दाखल झाल्यानंतरही, आरोपींनी २१ फेब्रुवारीला गणिताचा पेपर फोडल्याची घटना घडली आहे.

Swapnil S

नागपूर : बारावी पेपरफुटीबाबत धक्कादायक खुलासे सुरूच आहेत. नागपूर विभागात सेंट उर्सुला शाळेत एका मुलीच्या मोबाईलवरून १६ फेब्रुवारीला रसायनशास्त्र आणि १८ फेब्रुवारीला भौतिकशास्त्राचा पेपर फुटल्याचे उघड झाले होते. याप्रकरणी १८ फेब्रुवारी रोजी पेपर फुटीचा गुन्हा दाखल झाल्यानंतरही, आरोपींनी २१ फेब्रुवारीला गणिताचा पेपर फोडल्याची घटना घडली आहे. शिक्षण मंडळाचे अध्यक्ष डॉ. शिवलिंग पटवे यांनी याला दुजोरा दिला आहे. शिक्षण मंडळ याप्रकरणी पोलिसांशी समन्वय साधून असल्याचे पटवे यांनी सांगितले. सध्या या प्रकरणात चार आरोपी अटकेत असून मुख्य सूत्रधार अजूनही फरार आहे. या प्रकरणात शिक्षक निशिकांत मून, एक्सेलन्ट अकादमीचे मुस्तफा खान, जुनेद जावेद हे अटकेत आहेत.

दरम्यान, पेपरफुटी प्रकरणात अटकेतील आरोपींनी मोबाईल फॉरमॅट केला होता, पोलिसांनी तो डेटा रिकव्हर केल्यानंतर ही धक्कादायक बाब समोर आली आहे. १८ तारखेला हा प्रकार समोर आल्यानंतर गुन्हा दाखल झाला, काही आरोपींनी मोबाईल डेटा फॉरमॅट केला, तरीही २१ फेब्रुवारीला गणिताचा पेपर फुटल्याचे डिजिटल पुरावे पोलिसांना मिळाले. दुसरीकडे, पाच सदस्यीय विशेष तपास पथकाकडून पेपर फुटीसंदर्भात डिजिटल पुरावे गोळा करण्याचे काम सुरू आहे. रसायन, भौतिकसोबत गणिताचाही पेपर फुटल्याने पेपरफुटीचे रॅकेट असल्याची शक्यता वर्तविली जात आहे.

प्रश्नपत्रिका परीक्षेपूर्वीच फुटल्याचा संशय

दुसरीकडे, १८ फेब्रुवारी रोजी झालेल्या बारावीच्या रसायनशास्त्राच्या परीक्षेची प्रश्नपत्रिका परीक्षेपूर्वीच फुटल्याचा संशय आला होता. हा पेपर नागपूरमधील सोशल मीडियावर प्रसारित करण्यात आला होता. हायस्कूलच्या परीक्षा केंद्रावर एक विद्यार्थिनी वारंवार शौचालयात जात असल्याने संशयास्पद गैरव्यवहार उघडकीस आला होता. मोबाईल फोन वापरून फसवणूक करताना तिला पकडण्यात आले, जो मोबाईल नंतर जप्त करण्यात आला. विश्लेषणानंतर, अधिकाऱ्यांना असे आढळून आले की परीक्षा सुरू होण्यापूर्वीच प्रश्नपत्रिका एका व्हॉट्सअॅप ग्रुपवर शेअर करण्यात आली होती. त्याच ग्रुपमध्ये संभाव्य उत्तरे देखील देण्यात आली होती.

पैशांच्या मोबदल्यात शेअर केल्या प्रश्नपत्रिका

प्राथमिक तपासात एका खाजगी कोचिंग संस्थेशी संबंधित असलेल्या व्यक्तीने पैशांच्या बदल्यात प्रश्नपत्रिका शेअर केल्याचा आरोप आहे, असे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले. सदरप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि पुढील तपास सुरू आहे. बारावीच्या परीक्षा १० फेब्रुवारी रोजी सुरू झाल्या असून ११ मार्च रोजी संपतील.

अमरावतीत मोठी कारवाई! लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अयाजच्या घरावर बुलडोझर; अनधिकृत बांधकाम पाडले, VIDEO

Navi Mumbai : हापूस आंबा झाला स्वस्त; APMCमध्ये दरात घट, १५००रुपयांपासून पेटी उपलब्ध

चहाच्या टपरीवर रेल्वे कर्मचारी कोसळला; ३ मिनिटे तडफडल्यानंतर मृत्यू, घटना CCTV मध्ये कैद

वेदांता पॉवर प्लांट स्फोटातील मृतांचा आकडा वाढला; मॅनेजमेंटविरूद्ध FIR नोंदवा, न्यायालयीन चौकशी करा - काँग्रेसची मागणी

Mumbai : अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर मुंबादेवी मंदिरात आंबा महोत्सव; भक्तांसाठी खास सोहळा