Nagpur : इंस्टाग्रामवर मैत्री, 'ते' फोटो व्हायरल करण्याची धमकी अन्... १६ वर्षीय मुलीला ओलीस ठेवून अत्याचार, ठाण्याच्या तरुणाला अटक  प्रातिनिधिक छायाचित्र
महाराष्ट्र

Nagpur : इंस्टाग्रामवर मैत्री, 'ते' फोटो व्हायरल करण्याची धमकी अन्... १६ वर्षीय मुलीला ओलीस ठेवून अत्याचार, ठाण्याच्या तरुणाला अटक

पोलीस घटनास्थळी पोहोचले तेव्हा, पीडित तरुणी पलंगावर हात-पाय बांधलेल्या अवस्थेत पडली होती. आरोपी निर्भय पाखरेही जवळच उभा होता आणि त्याच्या हातात बेल्ट होता, तर पलंगाजवळ एक चाकू...

Mayuri Gawade

सोशल मीडियावर होणारी मैत्री किती धोकादायक ठरू शकते, याची प्रचिती देणारी धक्कादायक घटना नागपुरात उघडकीस आली आहे. पोलिसांनी बुधवारी (दि ०५) दिलेल्या माहितीनुसार, इंस्टाग्रामवर बनावट ओळख तयार करून १६ वर्षीय अल्पवयीन मुलीशी मैत्री करणाऱ्या एका तरुणाने तिचे खासगी फोटो मिळवून ब्लॅकमेल केल्याचा आरोप आहे. त्यानंतर तिला भाड्याच्या खोलीत तब्बल २० तास ओलीस ठेवत वारंवार लैंगिक अत्याचार करण्यात आल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव निर्भय पाखरे असून तो ठाणे जिल्ह्यातील रहिवासी असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

तांत्रिक तपासातून मुलीची सुटका

'पीटीआय'ने दिलेल्या वृत्तानुसार, रविवारी (दि. २) अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाल्यानंतर तिच्या कुटुंबीयांनी हुडकेश्वर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. तांत्रिक माहितीच्या आधारे पोलिसांनी तिचा ठावठिकाणा शोधून काढला. सोमवारी रात्री सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी दिघोरी परिसरातील एका भाड्याच्या घराचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला आणि मुलीची सुटका केली. घटनास्थळावरून आरोपी निर्भय पाखरे यालाही अटक करण्यात आली.

हात-पाय बांधलेल्या अवस्थेत आढळली मुलगी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलगी पलंगावर हात-पाय बांधलेल्या अवस्थेत पडली होती. आरोपीच्या हातात बेल्ट होता, तर पलंगाजवळ एक चाकूही आढळून आला. मुलीच्या शरीरावर मारहाणीच्या आणि जखमांच्या खुणा असल्याचेही पोलिसांनी सांगितले. मुलीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिच्यावर वैद्यकीय उपचार सुरू आहेत.

बनावट इंस्टाग्राम अकाऊंट तयार करून जाळ्यात ओढलं

प्राथमिक तपासानुसार, आरोपी निर्भय पाखरेने गेल्या वर्षी 'आकाश मेहरा' या नावाने बनावट इंस्टाग्राम अकाऊंट तयार केल्याचे समोर आले आहे. त्याद्वारे त्याने अल्पवयीन मुलीशी मैत्री केली. दोघांमध्ये नियमित संवाद सुरू झाला आणि डेटिंगलाही सुरूवात झाली. याचदरम्यान मुलीने त्याच्यावर विश्वास ठेवून स्वतःचे काही खासगी फोटोही त्याला पाठवले होते.

खासगी फोटो व्हायरल करण्याची धमकी

पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपीने मुलीचे खासगी फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत तिला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. त्यामुळे भीतीपोटी मुलगी त्याला भेटत राहिली. याचाच फायदा घेत आरोपीने एका हॉटेलमध्ये तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. त्यानंतर जेव्हा जेव्हा तो नागपुरात येत असे, तेव्हा दिघोरी येथील भाड्याच्या खोलीत तिला बोलावून अत्याचार करत असल्याचा आरोप पोलिसांनी केला आहे.

POCSO अंतर्गत गुन्हा

या प्रकरणी पोलिसांनी आरोपीविरुद्ध पॉक्सो (POCSO) कायदा, अपहरण आणि इतर संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. न्यायालयाने आरोपीला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

दरम्यान, आरोपीचे मोबाईल फोन, सोशल मीडिया अकाऊंट आणि इतर डिजिटल पुराव्यांची पोलिसांकडून तपासणी सुरू असून, या प्रकरणात आणखी काही धक्कादायक माहिती समोर येते का, याचाही तपास केला जात आहे.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

मुंबईत शेतीविषयक ॲॅग्रोटेक प्रदर्शन भरणार; महाराष्ट्र राज्य आंबा उत्पादक संघातर्फे १३ ऑगस्टला आयोजन

Ulhasnagar : महापालिकेचे मुख्यालयच असुरक्षित; ‘त्या’ २८३ इमारतींचे भवितव्य धोकादायक इमारतीतूनच जाहीर

Thane : पालिकेच्या नऊ प्रभाग समिती सभापतींची निवड; आठ बिनविरोध, मुंब्र्यात राष्ट्रवादीची (शरद पवार) बाजी

चार उत्पादनांवरील अँटी डम्पिंग शुल्क वाढवले; भारताने जुलैमध्ये नव्या उत्पादनावर लागू केले

घोडबंदर किल्ल्यावर होणाऱ्या गैरप्रकारांवर कारवाईची मागणी