महाराष्ट्र

पंतप्रधान मोदींच्या वैचारिक पूर्वजांचेच मुस्लिम लीगवर प्रेम; नाना पटोले यांचा आरोप

Swapnil S

प्रतिनिधी/मुंबई

काँग्रेस पक्षाने सर्वसामान्य जनतेला न्याय देण्याचा संकल्प हाती घेऊन ‘न्यायपत्र’ हा जाहीरनामा प्रसिद्ध केल्यापासून भाजप व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची झोप उडालेली दिसत आहे. काँग्रेसच्या जाहीरनाम्यावर मुस्लिम लीगची छाप असल्याचा पंतप्रधान मोदींचा आरोप हास्यास्पद असून इतिहासाचा अभ्यास नाही, हे स्पष्ट दिसते. १९४२ च्या ‘भारत छोडो आंदोलनात’ संपूर्ण देश रस्त्यावर उतरला होता, तेव्हा जनसंघाचे संस्थापक श्यामाप्रसाद मुखर्जी बंगाल, सिंध आणि वायव्य सरहद्द प्रांतात मुस्लिम लीगच्या सहकार्याने सरकार चालवत होते आणि चळवळ दडपण्याच्या सूचना देत होते. मुस्लिम लीगशी असलेल्या या जुन्या संबंधाचीच पंतप्रधान नरेंद्र मोदींना पुन्हा पुन्हा आठवण होत असावी, असे टीकास्त्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सोडले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी चंद्रपूरच्या सभेतून काँग्रेस व इंडिया आघाडीवर केलेल्या आरोपांचा समाचार घेताना नाना पटोले म्हणाले की, “काँग्रेस पक्ष व इंडिया आघाडीवर भ्रष्टाचाराचे आरोप करून पंतप्रधान नरेंद्र मोदी हे त्यांचे सरकारने केलेल्या भ्रष्टाचारापासून पळ काढू शकत नाही. ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले त्यांनाच मानाचे पान देणाऱ्या मोदींना भ्रष्टाचारावर बोलण्याचा काय अधिकार? कार्पोरेट कंपन्यांना ब्लॅकमेल करून तसेच ठेकेदारांना मोठी कंत्राटे देण्याच्या बदल्यात, इलेक्टोरल बाँडच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांची खंडणी वसुली केली, त्यावर नरेंद्र मोदी का बोलत नाहीत? काँग्रेसने एकाच परिवाराचा विकास केला, हा आरोपही तद्दन फालतू असून नरेंद्र मोदी यांनीच मागील १० वर्षांत केवळ अदानी परिवाराचाच विकास केला आहे, हे सर्व जनतेला माहित आहे.” “दलित, वंचित, आदिवासी व मागासवर्गीय कुटुंबासाठी सरकारने मोठे काम केल्याची वल्गना पंतप्रधान मोदींनी केली. परंतु देशातील ८० कोटी लोकांना मोफत रेशन देतो, यात कसला अभिमान व कसला विकास? ही तर अधोगती आहे. गरीबांना उज्ज्वला योजना देऊन त्यांचे रेशनवरील रॉकेल बंद केले व गॅस सिलिंडरही महाग केला.

वाजपेयी सरकारने तीन दहशतवाद्यांना सोडले

काँग्रेस सरकारने दहशतवाद पोसला असा आरोप करताना पंतप्रधान मोदी भाजप सरकारच्या काळातील दहशतवाद सोयीस्करपणे विसरले. जैश-ए-मोहम्मद अतिरेकी संघटनेचा प्रमुख मौलाना मसूद अजहर, अहमद जरगर आणि शेख अहमद उमर सईद या तीन दहशतवाद्यांना तत्कालीन वाजपेयी सरकारने सोडून दिले आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे या तीन अतिरेक्यांना कंधारला सोडण्यासाठी खुद्द वाजपेयी सरकारचे परराष्ट्र मंत्री जसवंत सिंह गेले होते. भाजप सरकारच्या काळातच संसदेवर अतिरेकी झाला होता, पठानकोट एअरबेसवरील हल्लाही भाजप सरकारच्या काळात झाला. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीवेळी पुलवामामध्ये झालेल्या अतिरेकी हल्ल्यात ४० जवान शहीद झाले, त्याचा आजपर्यंत तपासही मोदी सरकार करू शकले नाहीत. असे असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी कोणत्या तोंडाने दहशतवादावर बोलतात? असा प्रहार नाना पटोले यांनी केला.

'मंगलपर्व' आजपासून, मुंबईसह देशात गणेशोत्सवाचा जल्लोष

उद्या हार्बर, ट्रान्स-हार्बर मार्गावर मेगाब्लॉक नाही; मुख्य मार्गावर शनिवारी रात्रकालीन ब्लॉक

'लाडकी बहीण' योजनेचे अर्ज केवळ अंगणवाडी सेविकाच स्वीकारणार

Traffic Update: मुंबई-गोवा महामार्गावर चाकरमान्यांचे हाल सुरूच; गणेश भक्तांची १२ तास रखडपट्टी

निवडणुकीनंतरच महायुतीचा मुख्यमंत्री ठरेल - फडणवीस