नांदेडमध्ये ऑनर किलिंगची धक्कादायक घटना समोर आली आहे. उमरी तालुक्यातील गोळेगाव येथे सोमवारी (दि. २५) संध्याकाळी जन्मदात्या पित्यानेच आपल्या मुलीला आणि तिच्या प्रियकराला संपवले. दोघांना मारहाण करून विहिरीत फेकून दिले. त्यानंतर स्वतः पोलिस ठाण्यात जाऊन गुन्ह्याची कबुलीही दिली. संजीवनी कमळे (रा. गोळेगाव) आणि लखन भंडारे (रा. बोरजुन्नी) अशी मयतांची नावे आहेत.
सासरच्यांनी प्रियकरासोबत रंगेहाथ पकडलं
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, संजीवनीचे एक वर्षापूर्वी गोळेगावातील सुधाकर कमळे याच्याशी लग्न झाले होते. मात्र, विवाहाआधीपासूनच तिचे लखन भंडारे याच्याशी प्रेमसंबंध होते. लग्नानंतरही त्यांच्यातील संपर्क सुरूच होता. सोमवारी दुपारी सासरचे मंडळी घराबाहेर गेल्याने संजीवनीने आपल्या प्रियकराला घरी बोलावले. पण, अचानक परतलेल्या पती व कुटुंबीयांनी त्यांना आक्षेपार्ह अवस्थेत एकत्र पाहिले.
हा प्रकार उघडकीस आल्यावर संजीवनीच्या नवऱ्याने तिच्या वडिलांना फोन करून बोलावले. संध्याकाळी वडील मारोती सुरणे, काका माधव आणि आजोबा लक्ष्मण हे गोळेगाव येथे पोहोचले. सासरच्यांनी घडलेला सर्व प्रकार मुलीच्या वडिलांना सांगितला. संतप्त वडिल संजीवनी आणि लखनला घेऊन निघाले. त्यांनी करकाळा शिवारात दोघांना मारहाण केली. त्यानंतर त्यांनी पाण्याने भरलेल्या खोल विहिरीत दोघांनाही फेकून दिले.
"मी माझ्या मुलीला आणि तिच्या प्रियकराला मारून टाकले"
या सर्व प्रकारानंतर आरोपी मारोती सुरणे स्वतः उमरी पोलिस ठाण्यात पोहोचले. त्यांनी "मी मुलगी आणि तिच्या प्रियकराला मारून टाकले" असा धक्कादायक खुलासा केला. त्यानंतर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळ गाठले. दरम्यान, पोलिसांनी संजीवनीचे वडील मारोती सुरणे, आजोबा लक्ष्मण आणि काका माधव या तिघांना ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे नांदेड जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.