सिंधुदुर्ग : सिंधुदुर्गातील प्रत्येक विद्यार्थी ही जिल्ह्याची खरी संपत्ती आहे. त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी रोजगार, शिक्षण आणि विकासाच्या संधी निर्माण करत असताना अमली पदार्थांचे संकट त्यांच्या आयुष्यावर काळी छाया टाकत असेल, तर विकासाची सर्व स्वप्ने अपूर्ण राहतील. त्यामुळे 'नशामुक्त सिंधुदुर्ग' ही केवळ मोहीम नसून जिल्ह्याच्या भवितव्याशी निगडित चळवळ आहे, असे सांगत अमली पदार्थांविरोधात पोलिसांनी कठोर भूमिका घ्यावी, असे आवाहन पालकमंत्री नितेश राणे यांनी केले.
सिंधुदुर्ग पोलीस दलाच्या वतीने आयोजित 'नशामुक्त सिंधुदुर्ग' अभियानाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमाला अभियानाचे प्रमुख मार्गदर्शक माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायणराव राणे उपस्थित होते.
जिल्हाधिकारी तृप्ती धोड मिसे, मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर, जिल्हा पोलीस अधीक्षक मोहन दहीकर, सिंधुदुर्ग बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अनंत डवंगे, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष दादा साईल आणि सुप्रिया वालावलकर यांच्यासह स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते, विद्यार्थी, पालक व नागरिक उपस्थित होते. यावेळी नितेश राणे यांनी विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधत अमली पदार्थ, ऑनलाइन गेमिंग आणि व्यसनाधीनतेच्या वाढत्या धोक्याबाबत चिंता व्यक्त केली.
"पोलीस दलाने इच्छाशक्ती दाखवली तर सिंधुदुर्गात ड्रग्जचा एकही कण प्रवेश करू शकत नाही. अमली पदार्थ कोणत्या मार्गाने येतात आणि त्यामागे कोण आहेत, याची माहिती यंत्रणेकडे असते. त्यामुळे केवळ जनजागृती न करता ड्रग्जच्या पुरवठा साखळीवर कठोर कारवाई झाली पाहिजे," असे त्यांनी स्पष्ट केले. सर्वांनी एकत्रित प्रयत्न केल्यास सिंधुदुर्ग देशातील पहिला नशामुक्त जिल्हा म्हणून ओळखला जाईल, असा विश्वास नितेश राणे यांनी व्यक्त केला.
विद्यार्थ्यांनी उज्ज्वल भविष्य घडविण्यावर लक्ष द्यावे !
ड्रग्जबाबत शून्य सहनशीलता हीच आमची भूमिका आहे. मटका, जुगार, अमली पदार्थ किंवा समाजघातक कोणतीही प्रवृत्ती सिंधुदुर्गात खपवून घेतली जाणार नाही. विद्यार्थ्यांच्या भविष्याच्या आड येणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई झाली पाहिजे, असा इशाराही त्यांनी दिला. ऑनलाइन गेमिंगच्या व्यसनावरही त्यांनी चिंता व्यक्त केली. मोबाईलच्या अतिवापरामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असून मानसिक तणाव वाढण्याची शक्यता असल्याचे त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांनी वेळेचे नियोजन करून शिक्षण आणि उज्ज्वल भविष्य घडविण्यावर लक्ष केंद्रित करावे, असे आवाहन त्यांनी केले.