नाशिक : शेतकऱ्यांना कर्जाच्या दुष्टचक्रातून बाहेर काढण्यासाठी नव्या तंत्रज्ञानावर आधारित व्यवस्था उभी करणे आवश्यक आहे. कृषी क्षेत्रातील आव्हाने लक्षात घेऊन आधुनिकीकरण, नवे तंत्रज्ञान आणि संशोधनाच्या माध्यमातून उत्पादन खर्च कमी करून उत्पादकता वाढविण्यात कृषी महाविद्यालयांनी महत्त्वाची भूमिका बजावावी, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या दिंडोरी तालुक्यातील चाचडगाव येथील कर्मयोगी दुलाजी सीताराम पाटील कृषी महाविद्यालयाच्या नूतन इमारतीचे उद्घाटन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमास पालकमंत्री गिरीश महाजन, मंत्री छगन भुजबळ, दादाजी भुसे, नरहरी झिरवाळ, खासदार डॉ. शोभा बच्छाव, खासदार राजाभाऊ वाजे, खासदार भास्कर भगरे, महापौर हिमगौरी आहेर-आडके आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, राज्यातील सुमारे ८० टक्के शेतकरी अल्पभूधारक असून त्यांची गुंतवणूक करण्याची क्षमता मर्यादित आहे. वाढता उत्पादनखर्च आणि हमीभावातून मिळणारा मर्यादित लाभ ही कृषी क्षेत्रासमोरील प्रमुख आव्हाने आहेत. त्यामुळे कृषी संशोधनाला चालना देऊन त्याचा प्रत्यक्ष लाभ शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविणे आवश्यक आहे.
नाशिक जिल्हा कृषी क्षेत्रात अग्रेसर असून देशाच्या द्राक्ष निर्यातीत जिल्ह्याचा मोठा वाटा आहे. नाशिकचा कांदाही देशभर प्रसिद्ध आहे.
मात्र, रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे जमिनीची सुपीकता कमी होत आहे. त्यामुळे मातीच्या पोतानुसार खतांचा वापर, कमी खर्चात अधिक उत्पादन आणि आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित शेतीकडे वळण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापरावर भर
कृषी क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) प्रभावी वापर केल्यास उत्पादन खर्च २५ ते ३० टक्क्यांपर्यंत कमी करून उत्पादकता ४० टक्क्यांपर्यंत वाढविता येऊ शकते, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. राज्य शासनाने तयार केलेल्या ‘महाविस्तार ॲप’च्या माध्यमातून शेतकऱ्यांना संपूर्ण पीकसाखळीबाबत मार्गदर्शन मिळणार असून, विविध भाषांमध्ये त्यांच्या प्रश्नांची उत्तरे उपलब्ध होणार असल्याचे त्यांनी नमूद केले.
‘मविप्र पत्रिका’च्या विशेषांकाचे प्रकाशन
पालकमंत्री गिरीश महाजन यांनी नूतन इमारतीमुळे विद्यार्थ्यांच्या भविष्याला आकार देणारे ज्ञानमंदिर उभे राहिल्याचे सांगितले. हवामान बदलामुळे कृषी क्षेत्रासमोरील आव्हाने दिवसेंदिवस वाढत आहेत. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाने सक्षम करून कृषी क्षेत्रात रोजगारनिर्मिती करणारे उद्योजक, शास्त्रज्ञ आणि तंत्रज्ञ घडवावेत, असे आवाहन त्यांनी केले.