नाशिक : गंगापूर रोडवरील गोळीबार प्रकरणात संशयास्पद भूमिका असलेल्या मामा राजवाडे या स्थानिक भाजप नेत्यास पोलिसांनी ताब्यात घेवून आणखी एका धाडसी कारवाईची प्रचीती दिली आहे. स्थानिक गुन्हे शाखेकडून राजवाडे यांची तब्बल १५ तास कसून चौकशी करण्यात आल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वीच राजवाडे यांनी शिवसेना उबाठा गटातून भाजपमध्ये प्रवेश केला होता.
सदर प्रकरणात अजय बागुल यास आधीच पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. राजवाडेंच्या अटकेने स्थानिक राजकारण ढवळून निघाले आहे. मुख्यमंत्री शुक्रवारी नाशिक दौऱ्यावर असताना गेल्या दोन दिवसांपासून पोलिसांनी गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या काही राजकीय व्यक्तींना अटक करण्याचे सत्र सुरु केले आहे. त्यामध्ये काही भाजपशी संबंधित आहे. या मंडळींच्या व्यतिरिक्त केवळ कारवाया टाळण्यासाठी भाजप वा सत्तेतील पक्षात दाखल झालेल्या बड्या नेत्यांबाबत पोलीस ठोस भूमिका घेतात का, याकडे नाशिककरांचे लक्ष लागून राहणार आहे.
आतापर्यंत अटक झालेले नेते...
उद्धव निमसे, जगदीश पाटील, अजय बागुल, मामा राजवाडे ( सर्व भाजप ), पवन पवार ( शिवसेना उबाठा ), प्रकाश लोंढे ( रिपाइं, आठवले गट )