आता संकट चारा टंचाईचे; नाशिक जिल्ह्यात चार महिने पुरेल इतकाच चारा शिल्लक 
महाराष्ट्र

आता संकट चारा टंचाईचे; नाशिक जिल्ह्यात चार महिने पुरेल इतकाच चारा शिल्लक

दुष्काळामुळे आधीच खरीप पिकांच्या उत्पादनावर परिणाम झाला आहे. शेतीपिके दुष्काळाच्या झळांनी करपत चालली असतानाच पावसाची अनिश्चितता आणि संभाव्य पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर पशुधनाच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

प्रतिनिधी

हारून शेख/लासलगाव

दुष्काळामुळे आधीच खरीप पिकांच्या उत्पादनावर परिणाम झाला आहे. शेतीपिके दुष्काळाच्या झळांनी करपत चालली असतानाच पावसाची अनिश्चितता आणि संभाव्य पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर पशुधनाच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

प्रशासनाच्या आकडेवारीनुसार नाशिक जिल्ह्यात सुमारे १८ लाख पशुधन असून, त्यामध्ये ७ लाख २८ हजार ८७ गायी, १ लाख ११ हजार ५५१ वासरे, १ लाख ५६ हजार ४५० म्हशी, ५ लाख १७हजार ५६९ शेळ्या, २ लाख ४७हजार १७८ मेंढ्यांची संख्या आहे. त्यांच्यासाठी दररोज सुमारे ६ हजार ४०६ मेट्रिक टन याप्रमाणे दरमहा तब्बल २ लाख ७ हजार ३९३ मेट्रिक टन वैरणीची गरज भासते. सध्या उपलब्ध असलेला चारा पुढील चार महिने पुरेल, अशी प्रशासनाची आकडेवारी आहे.

याबरोबरच पशुधनासाठी दररोज सुमारे ३६ कोटी ८८लाख ०४ हजार लिटर पाण्याची गरज असते. त्यामुळे पाणीटंचाई लांबल्यास पशुधनाच्या चाऱ्याबरोबरच पाण्याचा प्रश्नही गंभीर होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. जिल्ह्याच्या १५ तालुक्यांमध्ये पशुधनासाठी सुमारे ८ लाख ९३ हजार मेट्रिक टन चारा उपलब्ध असून हा साठा सध्याच्या गरजेनुसार चार महिन्यांहून काही दिवस अधिक काळ पुरू शकतो. मात्र, पाणीटंचाईच्या काळात जनावरांना पाण्याबरोबर हिरव्या चाऱ्याची उपलब्धता कमी झाल्यास या साठ्यावर अतिरिक्त ताण येण्याची शक्यता आहे.

पिकाचे अवशेष आणि शेतातील उपलब्ध चारा यावर पशुपालक मोठ्या प्रमाणावर अवलंबून असतात. तथापि, पावसाचा खंड आणि पिकाचे नुकसान कायम राहिल्यास पुढील काळात चाऱ्याची उपलब्धता आणखी घटण्याची शक्यता आहे. त्यामुळे दुष्काळाची दाहकता वाढण्यापूर्वीच चारा छावण्या, चारा डेपो, पाण्याचे टँकर आणि पर्यायी पाणी स्रोत यांचे पूर्वनियोजन करण्याची गरज व्यक्त केली जात आहे.

स्वतंत्र पाणीपुरवठा यंत्रणा हवी

चाऱ्याबरोबरच पाणीटंचाईग्रस्त गावांतील पशुधनासाठी टँकरद्वारे पाणीपुरवठ्याचे नियोजन प्रशासनाकडून केले जात आहे. शासकीय तसेच खासगी पाणी स्रोतांची उपलब्धता तपासून आवश्यकतेनुसार टँकरची संख्या निश्चित केली जाणार आहे. मात्र, टंचाईग्रस्त गावांची संख्या वाढल्यास पशुधनासाठी स्वतंत्र पाणीपुरवठा यंत्रणा उभारण्याचे आव्हान प्रशासनासमोर उभे राहणार आहे.

(संबंधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

वेळेआधीच मान्सूनची माघार; मुंबईसह महाराष्ट्रातून परतीचा प्रवास सुरू, हवामान खात्याची घोषणा

Mumbai : ठाकरे बंधूंचा आज गर्जना मोर्चा

'मविआ'त नाराजीनाट्य; काँग्रेसने विधान परिषद उमेदवारी जाहीर केल्याने आघाडीत बिघाडी; नेत्यांमध्ये आज पुन्हा चर्चा

शिवाजी पार्कवर विनापरवानगी आंदोलन; ५०० जणांवर गुन्हे, दीपकेंसह आयोजकांचा समावेश

जंतरमंतरवर १५० आंदोलक ताब्यात; नेहा बोरा, योगेंद्र यादव, प्रशांत भूषण यांचा समावेश