नाशिकमध्ये भूकंपाचे धक्के; काही घरांना तडे 
महाराष्ट्र

नाशिकमध्ये भूकंपाचे धक्के; काही घरांना तडे

नाशिक जिल्ह्यात शनिवारी रात्री १० वाजून १ मिनिटाच्या सुमारास ४.३ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंपाचा धक्का जाणवला. त्यानंतर रविवारी पहाटे ५ वाजून ३३ मिनिटांनी ३.३ रिश्टर स्केल तीव्रतेचा धक्का जाणवला.

Swapnil S

लासलगाव : नाशिक जिल्ह्यात शनिवारी रात्री १० वाजून १ मिनिटाच्या सुमारास ४.३ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंपाचा धक्का जाणवला. त्यानंतर रविवारी पहाटे ५ वाजून ३३ मिनिटांनी ३.३ रिश्टर स्केल तीव्रतेचा धक्का जाणवला. सुमारे २० ते २२ सेकंद जमीन थरथरल्याचे नागरिकांनी सांगितले. काही भागांत गूढ आवाजही ऐकू आला. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही; मात्र काही घरांच्या भिंतींना तडे गेले आहेत.

राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राच्या माहितीनुसार, भूकंपाचा केंद्रबिंदू जमिनीखाली सुमारे पाच किलोमीटर खोलीवर दिंडोरी तालुक्यातील भानवड-शिंदपाडा परिसरात असल्याचे प्रशासनाने सांगितले. नाशिक शहरासह सुरगाणा, पेठ, कळवण, दिंडोरी, निफाड, देवळा, चांदवड, सिन्नर आदी तालुक्यांतील अनेक गावांना धक्के जाणवले.

सुरगाणा तालुक्यातील भादर गावातील काही घरांच्या भिंतींना तडे गेले. दिंडोरी तालुक्यातील ननाशी परिसरातही घरांचे नुकसान झाल्याची माहिती आहे. ननाशी भागात गेल्या पंधरा दिवसांत चार वेळा भूकंपाचे धक्के जाणवल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. रमाकांत शार्दुल यांच्या घराच्या भिंतीला तडे गेल्याचे सांगण्यात आले.

पेठ तालुक्यातील डांगसौंदाणे, दळवट, वणी, तसेच निफाड तालुक्यातील पिंपळगाव बसवंत, चांदोरी आणि कसबे सुकेणे परिसरातही भूकंपाचे धक्के जाणवले. सप्तशृंगगडावर काही सेकंद गूढ आवाज ऐकू आल्याचे नागरिकांनी सांगितले.

दरम्यान, प्रशासनाने परिसरातील धरणांची पाहणी केली असून, कोणत्याही धरणाला हानी झालेली नसल्याचे स्पष्ट केले आहे.

भूकंपाचा केंद्रबिंदू जमिनीखाली ५ कि.मी.

राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राच्या (NCS) माहितीनुसार, नाशिक जिल्ह्यातील भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ४.३ इतकी नोंदविण्यात आली आहे. मेरी, नाशिक येथून प्राप्त माहितीनुसार भूकंपाची तीव्रता ४.१ मॅग्निट्यूड इतकी नोंदविण्यात आली. भूकंपाचा केंद्रबिंदू जमिनीखाली सुमारे ५ किलोमीटर खोलीवर होता. केंद्रबिंदू मेरीपासून सुमारे ४४ किलोमीटर अंतरावर असल्याची माहिती देण्यात आली आहे.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

नगरसेवकांना मिळणार अद्ययावत टॅब; मुंबई महापालिका सभागृहाचा कारभार डिजिटल

विवाहपूर्व तपासणीसाठी पालकांचा खासगी गुप्तहेरांकडे मोर्चा; लोणावळ्यातील लोहगड हत्याकांडानंतर सखोल चौकशीवर भर

Panvel-Karjat Suburban Corridor : वर्षाअखेरीस सुरक्षा तपासणी; पावसाळ्यातही एमआरव्हीसीच्या प्रकल्पांना वेग

पाणीचोरी वाढली! मुंबईकरांच्या हक्काच्या पाण्यावर डल्ला; दीड वर्षात सहा हजार अनधिकृत नळजोडण्या 

Maharashtra Rain : गुरुवारनंतर राज्यभरात पावसाचा जोर वाढणार!