नाशिक : आडवण येथील प्रस्तावित तीनशे एकर जागेवर महिंद्रा कंपनीचा प्रकल्प येणे आता निश्चित मानले जात आहे. राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी तशी घोषणा करताना थेट महिंद्रा कंपनीचे पत्रच उद्योजकांच्या बैठकीत सादर केले. या प्रकल्पासाठी एमआयडीसी जागा उपलब्ध करून देणार असल्याचेही सामंत यांनी जाहीर केल्याने अनेक दिवसांपासून नाशिककरांना प्रतिक्षा असलेल्या बड्या प्रकल्पाला मुहूर्त लागण्यावर आता शिक्कामोर्तब झाल्याची भावना उद्योग वर्तुळातून व्यक्त होत आहे.
सोमवारी नाशिक दौऱ्यावर असलेल्या उद्योगमंत्री सामंत यांनी शहरातील औद्योगिक संघटनांची बैठक घेतली. यावेळी शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे, अन्न व औषध प्रशासनमंत्री नरहरी झिरवाळ यांच्यासह आमदार, निमा, आयमा या संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. मंत्री सामंत म्हणाले, महिंद्रा कंपनीचा प्रकल्प आडवण येथे येण्याची चर्चा तशी जुनी आहे. तथापि, जागेच्या व्याप्तीवरून त्याला विरोध झाल्याने प्रारंभी ६५० एकरावरील होवू घातलेला हा प्रकल्प नंतर पाचशे, साडेचारशे आणि अखेर तीनशे एकर जागेवर साकारण्यास अंतिम स्वरूप देण्यात आले. महिंद्रा या माध्यमातून नेमकी किती गुंतवणूक करणार, याबाबत मात्र बैठकीत कोणतीही माहिती देण्यात आली नाही. या बैठकीस आ. सीमा हिरे, सरोज आहिरे, दिलीप बनकर, हिरामण खोसकर, निमा अध्यक्ष आशिष नहार, आयमा अध्यक्ष ललित बूब, लघुद्योग भारतीचे निखील तापडिया, महाराष्ट्र चेम्बरचे संजय सोनवणे आदी उपस्थित होते.
प्रकल्प टिकवण्यासाठी वज्रमूठ आवळा..
दरम्यान, प्रारंभी वादाव्ही किनार लाभलेल्या महिंद्राच्या प्रस्तावित प्रकल्पासाठी सर्व बाजूंनी सकारात्मक वातावरण निर्माण झाल्याचे सांगताना मंत्री सामंत यांनी आता प्रकल्प टिकवण्याची सामुहिक जबाबदारी शासनाइतकीच स्थानिक लोकप्रतिनिधी तसेच औद्योगिक संघटनांची असल्याचे स्पष्ट केले. यासाठी सर्वांनी ऐक्याची वज्रमूठ आवळावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. नाशिक औद्योगिक परिक्षेत्रात आता जागेची कमतरता भासत असल्याने land bank तयार करण्याची सूचना सामंत यांनी व्यक्त केली.
औद्योगिक विकासाला चालना मिळणार
"उद्योगमंत्री उदय सामंत यांनी महिंद्रा कंपनीच्या प्रस्तावित प्रकल्प उभारणीची केलेली घोषणा स्वागतार्ह आहे. या प्रकल्पामुळे सुमारे १५०० थेट आणि तीन हजार अप्रत्यक्ष रोजगार निर्मिती होणार आहे. या प्रकल्पाबाबत नाशिकमधील सर्व औद्योगिक संघटना अनेक दिवसांपासून पाठपुरावा करीत होत्या. अखेर काल राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी त्याची औपचारिक घोषणा करून नाशिकककरांना सुखद भेट दिली. महिंद्राचा प्रकल्प नाशिकच्या औद्योगिक विकासाला चालना देण्यास पूरक ठरेल." - ललित बूब , अध्यक्ष, आयमा , नाशिक
अतिक्रमण हटवण्यास ६० दिवसांची मुदत
नाशकात ज्वलंत बनलेल्या औद्योगिक क्षेत्रांतील अतिक्रमणावर भाष्य करताना सामंत यांनी याबाबत कोणाचाही मुलाहिजा बाळगणार नसल्याचे स्पष्ट केले. संबंधित उद्योगांना नोटीसीद्वारे अतिक्रमण हटवण्यास ६० दिवसांची मुदत देण्यात येईल. या मुदतीत उद्योजकांनी स्वत:हून अतिक्रमण काढून न घेतल्यास एमआयडीसी कारवाई करेल. अशी जागा दुसऱ्या उद्योगांना बहाल केली जाईल, अशी माहिती त्यांनी दिली. यासंदर्भात सामंत यांनी छत्रपती संभाजीनगर येथील उदाहरण दिले.