Nashik : सिंहस्थ कुंभमेळ्याला सुरुवात; राष्ट्रपतींच्या हस्ते रामकुंडावर ध्वजारोहण, गोदावरी घाटावर भाविकांची अलोट गर्दी (Photo-X)
महाराष्ट्र

Nashik : सिंहस्थ कुंभमेळ्याला सुरुवात; राष्ट्रपतींच्या हस्ते रामकुंडावर ध्वजारोहण, गोदावरी घाटावर भाविकांची अलोट गर्दी

Simhastha Kumbh Mela 2026 : या कार्यक्रमाला संत, आध्यात्मिक गुरू, धार्मिक प्रतिनिधी, राजकीय नेते आणि मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते.

किशोरी घायवट-उबाळे

नाशिक : नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा २०२६ च्या पर्वाला शनिवारी (दि. ३१) धार्मिक ध्वजारोहणाने सुरुवात झाली. नाशिकमधील गोदावरी नदीच्या रामकुंडावर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या सोहळ्यासाठी गोदावरी घाटावर संत-महंत, धार्मिक प्रतिनिधी आणि हजारो भाविक उपस्थित होते.

रामकुंडावर राष्ट्रपतींच्या हस्ते धार्मिक विधी

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी रामकुंड येथे आयोजित ध्वजारोहण सोहळ्यात सहभाग घेत पारंपरिक धार्मिक विधी केले. या सोहळ्याची दृश्ये वृत्तसंस्था पीटीआयने प्रसिद्ध केली आहेत.

तसेच, त्र्यंबकेश्वर येथील कुशावर्त तीर्थावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते धार्मिक ध्वजारोहण करण्यात आले. शृंगेरी शारदा पीठाचे जगद्गुरू श्री श्री भारती तीर्थ महास्वामीजी यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्र्यांनी पूजा केली. या सोहळ्यालाही संत, आध्यात्मिक गुरू, धार्मिक प्रतिनिधी, राजकीय नेते आणि मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते.

दोन्ही तीर्थक्षेत्रांवर विशेष सजावट

ध्वजारोहण सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर रामकुंड, गोदावरी घाट आणि कुशावर्त तीर्थ परिसरात विशेष सजावट करण्यात आली होती. धार्मिक सोहळे पाहण्यासाठी सकाळपासूनच भाविकांनी गर्दी केली होती. अनेक आमदार, राजकीय नेते आणि धार्मिक प्रतिनिधींनीही या कार्यक्रमांना हजेरी लावली.

नाशिक आणि त्र्यंबकेश्वर या दोन्ही तीर्थक्षेत्रांना भारतीय धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरेत महत्त्वाचे स्थान आहे. सिंहस्थ कुंभमेळ्यामुळे या ठिकाणी देशभरातून भाविक आणि साधू-संत दाखल होतात. त्यामुळे ध्वजारोहण सोहळ्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

सुरक्षा आणि वाहतूक व्यवस्थेचे नियोजन

राष्ट्रपतींचा दौरा आणि भाविकांची संभाव्य गर्दी लक्षात घेऊन प्रशासनाकडून नाशिक आणि त्र्यंबकेश्वर परिसरात कडेकोट सुरक्षा व्यवस्था करण्यात आली होती. वाहतूक नियोजन, गर्दी नियंत्रण आणि स्वच्छतेसाठी विशेष उपाययोजना राबवण्यात आल्या. पोलिसांसह विविध नागरी विभागांनी समन्वय साधून सोहळे सुरळीत पार पाडण्यासाठी व्यवस्था केली.

या धार्मिक ध्वजारोहणाने नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा २०२६ च्या पर्वाची औपचारिक सुरुवात झाली असून, आगामी कुंभमेळ्याच्या तयारीच्या दृष्टीने हा महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

फ्लोटिंग होर्डिंग्जच्या प्रकाशप्रदूषणाचा फ्लेमिंगोंना धोका; तरंगत्या जाहिरात फलकामुळे सागरी जैवविविधतेवर परिणाम होण्याची भीती

बॉलिवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक संजय गुप्ता यांचे निधन; बाथरूममध्ये पडल्याने राहत्या घरात दुर्दैवी अंत

नवी मुंबईतील एपीएमसीत हापूसची पहिली पेटी दाखल; सिंधुदुर्गच्या शेतकऱ्याची बाजी, हवामानातील बदलांमुळे चिंता कायम

Mumbai : लैंगिक पुनर्रचना शस्त्रक्रियेत सायन रुग्णालय अव्वल; तीन वर्षांत ३५ शस्त्रक्रिया यशस्वी

परराज्यात चारा पाठवण्यास बंदी; टंचाईवर मात करण्यासाठी कृती आराखडा