२०२७ मध्ये नाशिक येथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याची तयारी वेगाने सुरु आहे. दरम्यान, तपोवन परिसरातील ‘साधूग्राम’ प्रकल्पासाठी करण्यात येणाऱ्या संभाव्य वृक्षतोडीवरून नवे वादळ उठले आहे. अशातच, रोहित पवार यांची सोशल मीडिया पोस्ट सध्या चर्चेत आली आहे.
अभिनेते आणि पर्यावरणप्रेमी सयाजी शिंदे यांनी नाशिकच्या वृक्षतोडीवर घेतलेल्या भूमिकेवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाष्य केले. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी "लोकं राजकीय कारणासाठी पर्यावरणवादी झाले आहेत,"असे म्हणत विरोधकांवर निशाणा साधला. या दोन्ही नेत्यांच्या वक्तव्यावरून आमदार रोहित पवार यांनी त्यांचे काका उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे कौतुक केले तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आज (दि.३ ) टीका केली आहे.
आमदार रोहित पवार म्हणाले, "लोकं राजकीय कारणासाठी पर्यावरणवादी झाल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं विधान हे समस्त पर्यावरणवादी कार्यकर्त्यांचा अवमान करणारं आणि त्यांची खिल्ली उडवणारं आहे. एकीकडं ठेकेदारांचं बिऱ्हाड जगवण्यासाठी हजारो झाडांवर कुऱ्हाड चालवण्याची चूक करायची आणि त्याला विरोध करणाऱ्या कार्यकर्त्यांचा अवमान करायचा हे सरकारला शोभत नाही." असे म्हणत रोहित पवारांनी मुख्यमंत्र्यांवर टीकास्त्र डागले.
पुढे ते म्हणाले, "दुसऱ्या बाजूला राजकीय पर्यावरणाचा विचार न करता तपोवनातील वृक्षतोडीसंदर्भात अजितदादांनी घेतलेली भूमिका ही निश्चितच स्वागतार्ह आहे. त्यांच्या या भुमिकेमुळं तपोवनातील वृक्ष वाचवण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या पर्यावरणवादी कार्यकर्त्यांना नक्कीच बळ मिळेल!" असे म्हणत रोहित पवारांनी अजित पवारांच्या विधानाबद्दल समाधान व्यक्त केले.
अजित पवारांची भूमिका काय?
"तपोवनातील वृक्षतोडीच्या संदर्भात समोपचारानं तोडगा काढला पाहिजे. यासंदर्भात अभिनेते सयाजी शिंदे यांनी घेतलेली भूमिका पर्यावरण हिताची आहे. विकासाबरोबर पर्यावरणाचा समतोल राखणं ही देखील काळाची गरज आहे. पर्यावरण वाचलं तरच पुढची पिढी सुरक्षित राहीलं, हे आपण सर्वांनी लक्षात ठेवलं पाहिजे," असे अजित पवार म्हणाले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विरोधकांवर टीका
“काही जण राजकीय कारणांनी अचानक पर्यावरणवादी बनले आहेत. कुंभमेळा हा निसर्गाशी साधर्म्य साधणाऱ्या आपल्या संस्कृतीचे प्रतीक आहे. म्हणूनच, पर्यावरणाचा कोणताही ऱ्हास होणार नाही, असा मार्ग आम्ही नक्की काढू. पण कोणाला असे वाटत असेल की, कुंभमेळ्यात अडथळे निर्माण करावेत, तर असे अडथळे आम्ही येऊ देणार नाही,” असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.