लासलगाव : येवला कृषी उत्पन्न बाजार समिती आणि कंटेनर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया यांच्या माध्यमातून उभारण्यात आलेल्या २,५०० मेट्रिक टन क्षमतेच्या पेरिशेबल कार्गो सेंटरला निफाड ड्रायपोर्टशी जोडण्यासाठी प्रस्तावित रेल्वे मार्गाला जवाहरलाल नेहरू पोर्ट प्राधिकरणाने तत्त्वतः मान्यता दिली आहे. येवला-पिंपळस महामार्ग परिसरातून कसबे-सुकेणे रेल्वे स्थानकाद्वारे निफाड ड्रायपोर्टला जोडणाऱ्या या प्रकल्पामुळे नाशिक जिल्ह्यातील शेतमाल निर्यातीला मोठी चालना मिळण्याची शक्यता आहे.
येवला, लासलगावसह नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या कांदा, द्राक्षे, फळे आणि भाजीपाल्याला आंतरराष्ट्रीय बाजारपेठ उपलब्ध व्हावी, वाहतुकीचा खर्च व वेळ वाचावा आणि निर्यातीच्या संधी वाढाव्यात, यासाठी मंत्री छगन भुजबळ यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांच्या प्रयत्नांना आता यश मिळाले आहे.
यासंदर्भात मंत्री भुजबळ यांनी केलेल्या पत्रव्यवहारानंतर जवाहरलाल नेहरू पोर्ट प्राधिकरणाचे अध्यक्ष गौरव दयाल यांनी पत्राद्वारे रेल्वे जोडणीच्या प्रस्तावाला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. या प्रकल्पाचा सविस्तर व्यवहार्यता अभ्यास अहवाल तयार करण्याचे काम सुरू असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
प्रस्तावित रेल्वे जोडणी प्रत्यक्षात साकारल्यास येवला परिसरातील शीतगृह आणि कंटेनर सुविधांच्या माध्यमातून शेतमाल निफाड ड्रायपोर्टमार्गे जवाहरलाल नेहरू बंदर तसेच वाढवण बंदराशी जोडता येणार आहे. त्यामुळे नाशवंत शेतमालाची नासाडी कमी होऊन वाहतुकीचा खर्च आणि वेळ वाचण्यास मदत होईल. शेतकऱ्यांना थेट आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत शेतमाल पाठविण्याच्या अधिक संधी उपलब्ध होतील.
आर्थिक विकासाला मोठी चालना मिळणार
येवला-पिंपळस महामार्ग, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६० आणि राज्य महामार्ग क्रमांक ३० यांच्या माध्यमातून निफाड ड्रायपोर्टला रस्ते जोडणी उपलब्ध करून देण्याच्या पर्यायांचाही नॅशनल हायवेज लॉजिस्टिक्स मॅनेजमेंट कंपनीमार्फत अभ्यास सुरू आहे. प्रकल्पाचा तांत्रिक सुसाध्यता आणि सविस्तर व्यवहार्यता अभ्यास पूर्ण झाल्यानंतर पुढील कार्यवाहीला गती मिळेल, असा विश्वास मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केला. हा प्रकल्प पूर्ण झाल्यास येवला, लासलगावसह संपूर्ण नाशिक जिल्ह्याच्या कृषी आणि आर्थिक विकासाला मोठी चालना मिळणार आहे.