मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीत महायुतीतील घटक पक्ष अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांच्या नेतृत्वाला भाजपने विरोध दर्शवला आहे. महायुतीतील तणाव कायम असल्याचे समोर आले आहे.
गेल्या काही दिवसांपासून महायुतीत काहीच आलबेल नसल्याचे समोर येत आहे. उल्हासनगर, डोंबिवली येथील शिंदे सेनेचे माजी नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला. एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यातही भाजपने पाय रोवण्यास सुरुवात केली आहे. हा मुद्दा उपस्थित करत शिंदे सेनेच्या मंत्र्यांनी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीवर बहिष्कार टाकत नाराजी व्यक्त केली, तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नवीन फौजदारी कायद्याच्या प्रदर्शनाच्या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री तथा शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी पाठ फिरवत आपली नाराजी एकप्रकारे उघड केली. त्यानंतर महायुतीतील मोठा भाऊ भाजप आणि घटक पक्ष अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते तथा मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी निरीक्षक नवाब मलिक यांच्या नावाला भाजपने विरोध केला आहे.
भाजपचे नेते आणि मंत्री आशिष शेलार यांनी नवाब मलिकांच्या नावावर तीव्र आक्षेप घेत मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत महायुतीमध्ये राष्ट्रवादी नको, अशी भूमिका घेतली आहे. याबाबत त्यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना म्हटले आहे की, नवाब मलिक हे मुंबईतील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेतृत्व किंवा निवडणुकीची जबाबदारी सांभाळणार आहेत, अशी चर्चा आम्ही ऐकत आहोत. त्यामुळे कुठल्याही पद्धतीने नवाब मलिक किंवा नवाब मलिकांची भूमिका, त्यांचे त्यांच्या पक्षात असलेले नेतृत्व याच्याशी आम्ही जुळवून घेऊ शकत नाही.
नवाब मलिक यांच्यावर आरोप काय?
नवाब मलिक यांच्यावर मुंबईतील गोवावाला कम्पाऊंडमधील मुनीरा प्लंबर या महिलेची तीन एकर जमीन कट रचून बळकावल्याचा आरोप आहे. ही जमीन बळकावताना अंडरवर्ल्ड डॉन दाऊदशी संबंधित हसीना पारकर, सलीम पटेल, १९९३ मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी सरदार खान यांचाही सहभाग होता. मुनीरा प्लंबर या महिलेने १९९९ मध्ये सलीम पटेलच्या नावाने ‘पॉवर ऑफ ‘ॲटर्नी’ जारी केली होती.