संजय करडे/मुरूड-जंजिरा
मुरूड नगरपरिषदेची सार्वत्रिक निवडणूक अतिशय चुरशीची ठरली असून थेट नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या आराधना मंगेश दांडेकर यांनी शिवसेनेच्या माजी नगराध्यक्षा कल्पना संदीप पाटील यांचा पराभव करत २४६ मतांनी विजय मिळवला आहे.
आराधना दांडेकर यांना ४,१९४ मते मिळाली, तर कल्पना पाटील यांना ३,९४९ मते मिळाली. या विजयामुळे शिवसेनेच्या ताब्यात असलेली मुरूड नगरपरिषद आता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या प्रभावाखाली आली आहे. नगरसेवक निवडणुकीत शिवसेनेने सर्वाधिक १२ जागांवर विजय मिळवला असला, तरी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ४ आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे ४ नगरसेवक निवडून आल्याने सत्तासमीकरण बदलले आहे. थेट नगराध्यक्षपद राष्ट्रवादीकडे गेल्याने नगरपरिषदेत राष्ट्रवादी-उबाठा गटाचे वर्चस्व प्रस्थापित झाले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून प्रीता चौलकर, प्रमिला माळी, तमिम धाकम व प्रांजली मकू या नगरसेविका विजयी झाल्या. उबाठा गटाकडून श्रद्धा चंद्रकांत अपराध, आदेश दांडेकर, रुपेश पाटील व देवयानी गुरव यांनी विजय मिळवला.
शिवसेनेकडून रुपेश रणदिवे, वीरेंद्र भगत, नितीन आंबुर्ले, यास्मिन कादरी, नागमना खांजादे, मनीष वीरकुड, विजय पाटील, पांडुरंग आरेकर, सुगंधा मकू (काँग्रेस आय), वैदही आरेकर, श्रीकांत खोत व अंकिता गुरव हे बारा उमेदवार विजयी झाले.