महाराष्ट्र

आता वाहतूककोंडीचे विघ्न! कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांचे हाल

एसटी महामंडळाच्या संपामुळे दोन दिवस प्रवाशांचे पुरते हाल झाले असतानाच, आता गणेशोत्सवानिमित्त गावी जाणाऱ्या चाकरमान्यांसमोर वाहतूककोंडीचे विघ्न ओढवले आहे.

Swapnil S

पेण/अलिबाग/ठाणे/मुंबई : एसटी महामंडळाच्या संपामुळे दोन दिवस प्रवाशांचे पुरते हाल झाले असतानाच, आता गणेशोत्सवानिमित्त गावी जाणाऱ्या चाकरमान्यांसमोर वाहतूककोंडीचे विघ्न ओढवले आहे. एसटीचा संप मिटल्यानंतर हजारो बसेसनी कोकणच्या दिशेने धाव घेतली आहे. त्यातच अनेक चाकरमानी स्वत:च्या किंवा भाड्याच्या गाडीने कोकणाकडे निघाल्याने मुंबई-गोवा महामार्गावर प्रचंड वाहतूककोंडी झाली आहे. त्यामुळे अलिबाग येथील लोणेरे परिसरात सहा ते सात किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. दरम्यान, मुंबईतही ठिकठिकाणी वाहतूक कोंडी होऊन नागरिकांचे प्रचंड हाल झाले.

लाडक्या बाप्पाच्या आगमनासाठी अवघे काही दिवस उरले असताना, चाकरमान्यांनी गणेशोत्सवासाठी कोकणात जाण्यासाठी कूच केली आहे. त्यामुळेच बुधवार, गुरुवारपासून मुंबई-गोवा महामार्ग प्रचंड गजबजलेला होता. महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ सुरू असतानाच, सुकेळी खिंडीमध्ये कोलाड पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुरुवारी सकाळी साडेआठ वाजताच्या सुमारास महामंडळाच्या दोन एसटी बसेसमध्ये अपघात झाला. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना त्याचा मोठा फटका बसला. अपघातानंतर मुंबई-गोवा महामार्गावर वाहनांच्या जवळपास ४ ते ५ किलोमीटरपर्यंत रांगा लागून मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी झाली होती. त्यातच लोणेरे येथे उड्डाणपुलाचे काम सुरू असल्यामुळे वाहतूक या ठिकाणी सर्व्हिस रोडच्या अरूंद रस्त्यावरून सुरू आहे. त्यामुळे वाहतूककोंडीत अधिक भर पडत आहे. माणगाव बाजारपेठ, तळेगाव येथील उड्डाणपूल आणि लोणेरे विद्यापीठ जोडरस्ता परिसरात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.

पनवेल आगाराची महाडकडे जाणारी बस एका वळणावर बसचालक आर्यन पाटील याचे आपल्या गाडीवरील नियंत्रण सुटल्यामुळे कणकवली आगाराच्या मुंबईकडे येणाऱ्या कणकवली-बोरिवली बसला सुकेळी खिंडीत समोरून जोरदार धडक दिली. या अपघातात दोन ते तीन प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली.

दरम्यान, या अपघातामुळे गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना याचा मोठ्या प्रमाणात फटका बसला. एकाच ठिकाणी अडकून पडल्यामुळे चाकरमान्यांचे अक्षरश: हाल झाले. या अपघाताची खबर मिळताच वाकण टॅबच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक गीतांजली जगताप यांच्यासह त्यांचे सर्व कर्मचारी तसेच नागोठणे पोलीस, कोलाड पोलीस यांनी अथक प्रयत्न करून दोन्ही वाहने क्रेनच्या सहाय्याने बाजूला केली आणि जवळपास ४ ते ५ तासांच्या अथक प्रयत्नांनंतर वाहतूक सुरळीतरीत्या सुरू करण्यात आली. मात्र दरवर्षीप्रमाणे गणेशोत्सव काळातली सुकेळी खिंडीमध्ये होणारी वाहतूककोंडी ही यावर्षीदेखील कोकणवासीयांना अनुभवायला मिळाली.

ठिकठिकाणी पोलीस, तरीही कोंडी फुटेना

गणेशभक्तांचा प्रवास सुखकर व्हावा, यासाठी प्रशासनाने ६००हून अधिक पोलीस आणि गृहरक्षक दलाचे जवान मुंबई-गोवा महामार्गावर ठिकठिकाणी तैनात केले आहेत. तसेच या महामार्गावर मोटारसायकलद्वारेही पेट्रोलिंग केले जात आहे. वाहतूककोंडीवर लक्ष ठेवण्यासाठी ड्रोन कॅमेरेही तैनात ठेवण्यात आले आहेत. बेशिस्त वाहनचालकांमुळे वाहतूककोंडीच्या समस्येत अधिकच भर पडली आहे. वाहतूक पोलिसांकडून प्रयत्न करूनही लोणेरे परिसरातील वाहतूककोंडी सुरळीत होताना दिसत नाही.

बसस्थानके, रेल्वे स्टेशनवरही मोठी गर्दी

गुरुवारी सकाळपासून कोकण रेल्वेला मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वे मार्गावर मुंबई, सुरत, अहमदाबाद, वांद्रे, पनवेलवरून ३१० विशेष गाड्या सुटणार आहेत. गावी जाण्यासाठी प्रवाशांनी मोठी गर्दी केली असून प्रवाशांच्या सुरक्षेसाठी जवळपास १५० रेल्वे सुरक्षा बल कर्मचारी अधिकारी तैनात केले आहेत.

Maharashtra Assembly Elections Results 2024 LIVE: महाराष्ट्राचा महानिकाल! एकाच क्लिकवर बघा कल आणि निकाल

अपक्ष, बंडखोरांसाठी रस्सीखेच; महायुती, महाआघाडीत खलबते

राहुल गांधी, खर्गे यांनी माफी मागावी, अन्यथा कारवाईला सामोरे जावे; विनोद तावडे यांची नोटीस

...तोपर्यंत मतमोजणी केंद्र सोडू नका; शरद पवारांचा उमेदवारांना आदेश

झारखंडमध्ये आज मतमोजणी