विठ्ठल मूर्तीवर लेपन प्रक्रिया; २३, २४ जूनला पंढरपूरचे मंदिर बंद (Photo- @vitthalrukminimandir)
महाराष्ट्र

Solapur : विठ्ठल मूर्तीवर लेपन प्रक्रिया; २३, २४ जूनला पंढरपूरचे मंदिर बंद

पंढरपूरमध्ये पुरातत्त्व विभागाकडून विठ्ठल मूर्तीवर लेपन प्रक्रिया होणार आहे. त्यामुळे २३ आणि २४ जून रोजी विठ्ठल मंदिर सर्व प्रकारच्या दर्शनासाठी पूर्णपणे बंद राहणार आहे.

Swapnil S

पंढरपूर : पंढरपूरमध्ये पुरातत्त्व विभागाकडून विठ्ठल मूर्तीवर लेपन प्रक्रिया होणार आहे. त्यामुळे २३ आणि २४ जून रोजी विठ्ठल मंदिर सर्व प्रकारच्या दर्शनासाठी पूर्णपणे बंद राहणार आहे. भाविकांनी हे दोन दिवस पंढरपूरला येऊ नये, असे आवाहन मंदिर प्रशासनाकडून करण्यात आले आहे. विठ्ठल मूर्तीची झीज रोखण्यासाठी ही लेपन प्रक्रिया होणार आहे.

विठ्ठल मूर्तीच्या सातत्याने होत असलेल्या झीजप्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली मंदिर समिती, वारकरी संप्रदाय आणि पुरातत्त्व विभाग यांची बैठक झाली होती.

बैठकीदरम्यान पुरातत्त्व विभागाच्या तज्ज्ञांनी केलेल्या पाहणीत विठ्ठल मूर्तीच्या पायाजवळील काही भागांमध्ये झीज झाल्याचे निदर्शनास आले. तसेच मूर्तीवरील काही सूक्ष्म छिद्रे आणि झिजलेले भाग दुरुस्त करण्याची आवश्यकता असल्याचेही स्पष्ट झाले. यामुळे मूर्तीचे दीर्घकालीन संवर्धन करण्यासाठी विशेष लेपन प्रक्रिया राबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

या प्रक्रियेत मूर्तीच्या मूळ दगडाशी सुसंगत दगडी पावडर आणि विशेष सेंद्रिय रसायनांचा वापर केला जाणार आहे. झिजलेल्या भागांची दुरुस्ती केल्यानंतर मूर्तीवर संरक्षक आवरण देण्यात येणार असून त्यामुळे भविष्यातील झीज कमी होण्यास मदत होणार आहे.

श्री विठ्ठलाच्या मूर्तीचे यापूर्वीही सन १९८८, २००५, २०१२ आणि २०२० मध्ये संवर्धन करण्यात आले होते. आता पाच वर्षांनंतर पुन्हा एकदा ही प्रक्रिया हाती घेण्यात आली आहे. आषाढी वारीपूर्वीच मूर्तीचे संवर्धन पूर्ण करून भाविकांना सुरक्षित आणि सुरळीत दर्शन व्यवस्था उपलब्ध करून देण्याचा मंदिर प्रशासनाचा प्रयत्न आहे. त्यामुळे २३ आणि २४ जून रोजी पंढरपूरला येण्याचे नियोजन केलेल्या भाविकांनी या कालावधीत दर्शनासाठी येऊ नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

Video : नेपाळमध्ये महाप्रलय! भोटे कोशी नदीला अचानक महापूर; अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती, किमान १०५ भारतीय पर्यटक बेपत्ता

शासकीय, खासगी, धर्मादाय रुग्णालयांचे फायर ऑडिट; तातडीने कार्यवाही करण्याचे आरोग्य मंत्र्यांचे निर्देश, राज्य सरकार ॲक्शन मोडवर

Pune : भटक्या कुत्र्याचा महिलेवर हल्ला; तोल जाताच बाळ पडलं खाली, Video व्हायरल

Mumbai : निवासी वैद्यकीय अधिकाऱ्यांची कमतरता; राजावाडी रुग्णालयातील अन्य डॉक्टरांवर ताण, दिवसाला ५०० रुग्णांची तपासणी

Madhya Pradesh : भाजप आमदाराने अग्निशमन दलाच्या वाहनाने धुतली स्वतःची कार; VIDEO व्हायरल