

पुणे जिल्ह्यातील भीमाशंकर येथे वसलेले श्रीक्षेत्र भीमाशंकर मंदिर हे देशातील प्रसिद्ध आणि श्रद्धास्थान मानल्या जाणाऱ्या मंदिरांपैकी एक आहे. हे मंदिर भारतातील १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक असून महाराष्ट्रातील तीन ज्योतिर्लिंगांमध्ये त्याचा समावेश होतो.
जानेवारी २०२६ पासून बांधकाम आणि पुनर्विकास प्रकल्पांमुळे बंद असलेले भीमाशंकर मंदिर अखेर १५ जून २०२६ रोजी भाविकांसाठी पुन्हा खुले होणार आहे. मात्र, दर्शनासाठी येण्यापूर्वी भाविकांना ऑनलाइन नोंदणी करणे बंधनकारक असणार आहे. गर्दीचे योग्य नियोजन करण्यासाठी मंदिर व्यवस्थापन समितीने हा निर्णय घेतला आहे.
ऑनलाइन नोंदणी बंधनकारक
तात्पुरत्या बंदीनंतर १५ जूनपासून श्रीक्षेत्र भीमाशंकर मंदिरात पुन्हा दर्शन सुरू होणार आहे. देशभरातून दरवर्षी हजारो भाविक येथे दर्शनासाठी येतात. मंदिर खुले होण्यापूर्वी प्रशासनाने भाविकांना दर्शनासाठी येण्यापूर्वी ऑनलाइन नोंदणी पूर्ण करण्याचा सल्ला दिला आहे.
श्रीक्षेत्र भीमाशंकर मंदिर व्यवस्थापनाने दर्शनासाठी ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया अनिवार्य केली आहे. मंदिराच्या व्यापक नूतनीकरणानंतर गर्दी नियंत्रणासाठी हा नवीन आणि तात्पुरता नियम लागू केला आहे.
दररोज एक हजार भाविकांना दर्शनाची परवानगी
नोंदणी प्रक्रिया ५ जून २०२६ पासून सुरू होणार असून भाविकांना भीमाशंकर मंदिराच्या https://shreebhimashankar.com/ या अधिकृत संकेतस्थळावर नोंदणी करता येणार आहे. गर्दी नियंत्रणासाठी सुरुवातीला दररोज केवळ १,००० भाविकांना दर्शनाची परवानगी दिली जाणार आहे. दर्शनाची वेळ सकाळी ७.०० ते रात्री ११.०० वाजेपर्यंत असणार आहे.
भाविकांची प्रतीक्षा संपणार?
सुरुवातीला मंदिर ९ जानेवारीपासून केवळ तीन महिन्यांसाठी बंद ठेवण्यात येणार असून १० एप्रिलपासून दर्शन पुन्हा सुरू होईल, असे प्रशासनाकडून जाहीर करण्यात आले होते. सभामंडपाचे काम विक्रमी वेळेत पूर्ण होणार असल्याचा दावाही करण्यात आला होता. मात्र, काम पूर्ण होण्यास अपेक्षेपेक्षा अधिक वेळ लागल्याने एप्रिलनंतरही मंदिर सुरू होण्याची तारीख पुढे ढकलण्यात आली. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी काही दिवसांपूर्वी पुण्यात पत्रकार परिषदेत ३१ मे रोजी मंदिर दर्शनासाठी खुले करण्यात येईल, असे सांगितले होते. मात्र, आता मंदिर खुले करण्यासाठी १५ जूनची तारीख देण्यात आली आहे.
भीमाशंकर : आवर्जून भेट द्यावे असे ठिकाण
महाराष्ट्रातील सह्याद्री पर्वतरांगांमध्ये वसलेले भीमाशंकर हे केवळ धार्मिक स्थळ नसून निसर्गप्रेमी आणि ट्रेकर्ससाठीही लोकप्रिय पर्यटनस्थळ आहे. दाट जंगल आणि समृद्ध जैवविविधतेने वेढलेला हा परिसर वन्यजीव अभयारण्याचाही भाग आहे.
पौराणिक कथेनुसार, भगवान शिव यांनी याच ठिकाणी दैत्य भीमाचा वध करून ज्योतिर्लिंगाच्या रूपात वास्तव्य केले. त्यांच्या शरीरातून गळालेल्या घामातून भीमा नदीची निर्मिती झाल्याचे मानले जाते.