परभणी : पोलिसांच्या मारहाणीत कोठडीत मृत्यू झालेल्या सोमनाथ सूर्यवंशीच्या कुटुंबीयांनी १० लाखांची शासकीय मदत नाकारली आहे. जोपर्यंत सोमनाथला न्याय मिळत नाही, त्याच्या मृत्यूला जबाबदार असलेल्या पोलिसांवर कारवाई होत नाही, तोपर्यंत मदत स्वीकारणार नाही, अशी भूमिका सूर्यवंशी कुटुंबीयांनी घेतली आहे. न्यायालयीन कोठडीत असताना ३५ वर्षीय सोमनाथचा मृत्यू झाला होता.
तलाठी आणि मंडळ अधिकारी हे १० लाखांच्या मदतीचा चेक घेऊन सूर्यवंशी कुटुंबीयांच्या भेटीला आले होते. त्यावेळी सोमनाथच्या कुटुंबीयांनी ही मदत नाकारली. माझ्या मुलाला जोपर्यंत न्याय मिळत नाही, तोपर्यंत मी मदत घेणार नाही, अशी भूमिका सोमनाथच्या आईने घेतली. सोमनाथच्या मृत्यूला जबाबदार पोलिसांवर कारवाई होत नाही तोपर्यंत मदत स्वीकारणार नाही, असे सोमनाथच्या भावाने स्पष्ट केले.