महाराष्ट्र

अनधिकृत शाळांना कायमचे टाळे ; विद्यार्थ्यांचे जवळील शाळेत समायोजन करणार

नवशक्ती Web Desk

मुंबई : मुंबईत सुरू असलेल्या २१० अनधिकृत शाळांना आता कायमचे टाळे लागणार आहे. अनधिकृत शाळा चालवणाऱ्या व्यवस्थापकांनी यंदाचे शैक्षणिक वर्ष सुरू होण्याआधी शाळा बंद कराव्यात, अन्यथा संबंधित शाळा व्यवस्थापना विरोधात थेट फौजदारी कारवाई करण्यात येईल, असा इशारा मुंबई महापालिका प्रशासनाने दिला आहे. दरम्यान, या २१० शाळांमध्ये सुमारे ६० हजार विद्यार्थी शिक्षण घेत असून, त्या शाळांतील सगळ्या विद्यार्थ्यांचे जवळील शाळेत समायोजन करण्यात येईल, असे पालिकेच्या शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले.

शिक्षण हा प्रत्येक मुलाचा अधिकार आहे; मात्र मुंबईत गेल्या १० वर्षांपासून बेकायदा शाळांनी शिक्षणाचा बाजार मांडला होता. या २१० अनधिकृत शाळांना वारंवार नोटीस बजावली, तरी नोटीसीला केराची टोपली दाखवली जात होती. अखेर राज्य सरकारने बेकायदा शाळा कायमस्वरुपी बंद करण्याचा निर्णय घेतला असून, राज्य सरकारच्या आदेशानुसार मुंबईतील २१० अनधिकृत शाळा आता कायमस्वरुपी बंद करण्यात येत आहे. पालिकेच्या इशाऱ्यानंतर ही अनधिकृत शाळा सुरू असल्याचे निदर्शनास आल्यास संबंधित शाळा व्यवस्थापनाविरोधात थेट फौजदारी कारवाई करण्यात येईल, असा इशारा दिल्याचे मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागाचे सहआयुक्त अजित कुंभार यांनी सांगितले.

अनधिकृत शाळांना नोटीस दिल्यानंतर राज्य सरकारच्या सेल्फ फायनान्स विभागाकडे दंडाची रक्कम भरल्यानंतर अनधिकृत शाळा नियमित होत असे; मात्र आता राज्य सरकारने मुंबईतील अनधिकृत शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मुंबईतील २१० अनधिकृत शाळा व्यवस्थापनांना शैक्षणिक वर्षे सुरु होण्याआधी बंद करण्यास सांगितले आहे. शैक्षणिक वर्ष सुरू झाल्यानंतर ही या २१० शाळा सुरू असल्यास संबंधित शाळा व्यवस्थापनाविरोधात थेट फौजदारी कारवाई करण्यात येईल, असे कुंभार यांनी स्पष्ट केले.

फलक लावून पालकांमध्ये जनजागृती

मुंबईत २१० शाळा अनधिकृत सुरू असून, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी अनधिकृत शाळेत प्रवेश घेऊ नये या शाळा बंद होणार आहेत, असे शाळा परिसरात फलक लावून पालकांमध्ये जनजागृती करण्यात येईल.

- अजित कुंभार, सहआयुक्त, शिक्षण, महापालिका

निवडणुकीनंतरही संघर्षमय राजकारण

ऑनलाईन गेमची उलाढाल

घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडेला अटक

ठाणे, कोकण, मराठवाड्यात अवकाळीचा कहर सुरूच

‘इंडिया’ आघाडीला बाहेरून पाठिंबा देणार,ममता बॅनर्जी यांची घोषणा