मुंबई : सरकारी नियमावलीला फाटा देऊन बेकायदेशीर प्रवासी वाहतूक करून प्रवाशांचा जीव धोक्यात घालणाऱ्या रॅपिडो, उबेर यासारख्या ॲप आधारित बाइक टॅक्सी कंपन्यांविरोधात गुन्हे दाखल करा, असे स्पष्ट निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मोटार परिवहन विभागाला दिले आहेत.
सरकारने ई-बाइक धोरण नुकतेच जाहीर केले आहे. त्यानुसार अनेक ॲप आधारित बाइक टॅक्सी कंपन्यांनी व्यवसाय सुरू केला आहे. तथापि, चालकांना नियमावली व प्रवासी सुरक्षिततेसंबंधी कोणतेही प्रशिक्षण न देता त्यांची नियुक्ती करून त्या खासगी अथवा साध्या बाइकद्वारे प्रवासी सेवा दिली जात आहे. हे अत्यंत धोकादायक आहे. नुकतीच एका प्रवाशाचा अशा अवैध बाइक टॅक्सीवरून जाताना मृत्यू झाला आहे. ही घटना ताजी असताना उपरोक्त ॲप आधारित बाइक टॅक्सी कंपन्या शासनाच्या नियमावलीची पायमल्ली करून बेकायदेशीर व्यवसाय करत आहेत. अशा अनेक तक्रारी मंत्री सरनाईक यांच्याकडे येत होत्या.
या तक्रारीची दखल घेत अशा बेकायदेशीर व्यवसाय करणाऱ्यांवर थेट गुन्हे दाखल करण्याचे निर्देश सरनाईक यांनी दिले. देशातील इतर राज्यांत ज्या पद्धतीने या कंपन्या शासकीय नियमांना हरताळ फासून बेकायदेशीर व्यवसाय करतात, तसे महाराष्ट्रात चालणार नाही, प्रवाशांची सुरक्षितता केंद्रस्थानी ठेवून सर्वसामान्य चालकांचे शोषण न करता नियम व सुरक्षिततेचे निकष पाळून आपला व्यवसाय करणाऱ्या ॲप आधारित बाइक टॅक्सी कंपन्यांना शासनाचा पाठिंबा राहील, परंतु चालकांचा गैरफायदा घेऊन बेकायदेशीररीत्या शासकीय नियमांची पायमल्ली करून प्रवाशांचा जीव धोक्यात आणणाऱ्या ॲप आधारित बाइक टॅक्सी कंपन्यांवर यापुढेही अशीच धडक मोहीम राबवली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.
...तर मालकांवरही गुन्हे दाखल होणार
जितक्या बाइक अशाप्रकारे बेकायदेशीर वाहतूक करताना आढळतील तितके गुन्हे संबंधित चालकावर न दाखल करता ती बाइक ज्या ॲप आधारित कंपनीची आहे, त्या मालकावर गुन्हे दाखल करण्यात येतील, असा सज्जड दम परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिला आहे.
रॅपिडोविरोधात गुन्हा दाखल
त्यांच्या निर्देशानुसार २ डिसेंबर रोजी 'रॅपिडो या ॲप आधारित कंपनीविरोधात मोटार परिवहन विभागाने मुंबईतील घाटकोपर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. 'रॅपिडो' कंपनीच्या वतीने मोटार वाहन कायदा, १९८८ च्या कलम ६६ (१) आणि १९२ अन्वये बेकायदेशीररीत्या 'बाइक टॅक्सी' चालवल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे.
नफ्यासाठी खासगी वाहनांचा वापर
मुंबई आरटीओच्या मोटार वाहन निरीक्षकांनी केलेल्या तपासणीत 'रॅपीडो' म्हणजे रोपन ट्रान्सपोर्ट कंपनी 'राइड शेअरिंगच्या नावाखाली प्रवाशांची वाहतूक करत असल्याचे उघड झाले. विशेष म्हणजे कंपनीने प्रवासासाठी वापरलेली वाहने ही खासगी मालकीची होती. मोटार वाहन कायद्यानुसार, खासगी वाहने प्रवासी वाहतुकीसाठी वापरण्यास सक्त मनाई आहे. असे असतानाही, कंपनीने नफा मिळवण्याच्या उद्देशाने या नियमांचे उल्लंघन केले.