महाराष्ट्र

संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्या तोंडाला काळे फासले! छत्रपती संभाजी महाराजांचा एकेरी उल्लेख भोवला

छत्रपती संभाजी महाराज यांचा एकेरी उल्लेख आणि श्री स्वामी समर्थ यांचा अनादर केल्याच्या निषेधार्थ संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्या अंगावर काळी शाई टाकून त्यांच्या तोंडाला काळे फासण्यात आल्याचा प्रकार घडला.

Swapnil S

सोलापूर : छत्रपती संभाजी महाराज यांचा एकेरी उल्लेख आणि श्री स्वामी समर्थ यांचा अनादर केल्याच्या निषेधार्थ संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्या अंगावर काळी शाई टाकून त्यांच्या तोंडाला काळे फासण्यात आल्याचा प्रकार घडला. रविवारी अक्कलकोट येथे एका नागरी सत्कार आणि मानपत्र कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून आलेल्या प्रवीण गायकवाड यांना त्यांच्या गाडीतून बाहेर ओढून अंगावर जाण्याचा प्रकार घडला. हल्ल्यानंतर शिवधर्म फाऊंडेशनचे अध्यक्ष दीपक काटे आणि इतर कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दरम्यान, या घटनेचा राज्यभरातून तीव्र निषेध व्यक्त करण्यात येत आहे.

गायकवाड यांच्या निषेधार्थ शिवधर्म फाऊंडेशनच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. प्रवीण गायकवाड यांनी आपल्या संघटनेला संभाजी ब्रिगेड हे एकेरी नाव धारण केले होते. संपूर्ण महाराष्ट्रात प्रवीण गायकवाड यांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ आंदोलने सुरू आहेत. प्रवीण गायकवाड हे रविवारी अक्कलकोट येथे आले होते. प्रवीण गायकवाड यांना हलगीच्या कडकडाटात स्वागत करून संयोजक कार्यक्रमाच्या ठिकाणी घेऊन जात असताना, शिवधर्म फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी त्यांना वाटेतच अडवून त्यांच्या अंगावर शाई ओतली. तसेच त्यांच्या तोंडालासुद्धा काळे फासले. त्याच्या गाडीची काच फोडण्यात आली. तर गायकवाड यांना जमावाने गाडीतून बाहेर काढून संभाजी ब्रिगेडचे नाव ‘छत्रपती संभाजी महाराज ब्रिगेड’ करणार का नाही, म्हणून त्यांच्या अंगावर धावून गेले. त्यानंतर आपली सुटका करून घेण्यासाठी गायकवाड हात जोडून नाव बदलतो म्हणून विनवणी करत होते. कार्यकर्ते आणि मराठा बांधव आक्रमक झाले होते. हा सर्व प्रकार होत असताना सुरुवातीला तेथे पोलीस किंवा अन्य कोणीही बंदोबस्तासाठी नव्हते.

गोंधळ वाढल्यानंतर पोलीस घटनास्थळावर दाखल झाले. प्रवीण गायकवाड यांच्या निषेधार्थ कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. तर धर्मवीर संभाजी महाराज आणि श्री स्वामी समर्थांचा जयजयकार करून पदाधिकारी आणि कार्यकर्ते निघून गेले. प्रवीण गायकवाड यांच्या तोंडाला काळे फासण्यात आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. संभाजी ब्रिगेडच्या नावामध्ये धर्मवीर शब्द वापरासाठी काही दिवसापूर्वीच शिवधर्म फाउंडेशनच्या वतीने सोलापुरात मोठा मोर्चा काढण्यात आला होता. त्यानंतर रविवारी अक्कलकोटमध्ये प्रवीण गायकवाड यांच्या गाडीची काच फोडून त्यांच्या तोंडाला काळे फासण्यात आले आहे.

दीपक काटेसह सात जणांवर गुन्हा दाखल

प्रवीण गायकवाड यांच्यावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी संभाजी ब्रिगेडचे सोलापूर जिल्हा अध्यक्ष संभाजी भोसले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दीपक काटे, किरण साळुंखे , तसेच भैय्या ढाणे, कृष्णा क्षिरसागर, अक्षय चव्हाण, बाबू बिहारी, भवानेश्वर भगवान यांच्यावर अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हिंसेचा मार्ग अतिशय निंदनीय -अमोल कोल्हे

राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनीही या हल्ल्याचा निषेध व्यक्त केला आहे. ते म्हणाले की, “छत्रपती संभाजी महाराजांच्या स्वराज्यातील तरुणांना उन्नतीचा मार्ग दाखवणाऱ्या अशा व्यक्तिमत्वावर भ्याड हल्ला करणाऱ्या प्रवृत्तींचा निषेध करू तितका कमीच आहे. वैचारिक मतभेद असू शकतात, मात्र हा वैचारिक विरोध विचारांनीच करायला हवा. हिंसेचा हा मार्ग अतिशय निंदनीय व निषेधार्ह आहे.”

गुंडांना तत्काळ अटक करा - हर्षवर्धन सपकाळ

मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की महाराष्ट्र आता थांबणार नाही, पण प्रत्यक्षात महाराष्ट्रातील गुंडगिरी थांबत नाहीय हे सत्य आहे. राज्यात कायद्याचे राज्य आहे की गुंड आणि माफियाचे असा प्रश्न पडावा इतकी गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. पुरोगामी विचारवंत, संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष शिवश्री प्रवीण गायकवाड यांच्यावर गुंडांनी केलेला भ्याड हल्ला, हे त्याचेच प्रतिक आहे. सरकारने या हल्लेखोरांच्या मुसक्या आवळून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे.

शिवधर्मकडून हत्येचा कट रचला - प्रवीण गायकवाड

शिवधर्म फाऊंडेशनचे संस्थापक दीपक काटे आणि त्यांच्या सहकाऱ्यांकडून अक्कलकोट येथे माझ्यावर हल्ला करण्यात आला. माझ्या हत्येचाच कट रचण्यात आला होता, हे या हल्ल्यावरून लक्षात येते. राज्यघटनेला अभिप्राय असलेला विचार घेऊन आम्ही काम करतो. माझ्यावर झालेला हल्ला हा मराठा समाजावर झालेला आहे. नरेंद्र दाभोलकर, गोविंद पानसरे, गौरी लंकेश, कलबुर्गी यांचा खून झाला. समता, बंधुता, न्याय आणि स्वातंत्र्याचा आमचा विचार आहे. पुरोगामी विचाराचे कार्यकर्ते आज असुरक्षित आहेत. आपल्यावर झालेला हल्ला हा मोठा कट आहे आणि सरकारने हा कट उघड केला पाहिजे. सहकारी कार्यकर्ते संभाजी भोसले आणि त्यांच्या कार्यकर्त्यांमुळे मी आज जिवंत आहे, अशा शब्दांत हल्ल्यानंतर प्रवीण गायकवाड यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली.

देशात मतदार यादीची झाडाझडती; केंद्रीय निवडणूक आयोगाची तयारी

मद्य परवान्यावरून सरकारचा सावध पवित्रा; विधिमंडळाला विश्वासात घेतल्याशिवाय परवाने वाटप नाहीच -अजित पवार

अंतराळवीर शुभांशू शुक्ला आज पृथ्वीकडे परतणार

जनसुरक्षा कायदा ‘अर्बन नक्सल’विरोधात उपयुक्त ठरेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन

विरोधी पक्षनेतेपदासाठी ‘फिल्डिंग’; काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटामध्ये जोरदार रस्सीखेच, 'ही' नावे चर्चेत