महाराष्ट्र

पृथ्वीराज चव्हाणांनी घेतली जरांगे यांची भेट; राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण

Swapnil S

छत्रपती संभाजीनगर : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण हळूहळू तापू लागले आहे. मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांनी विधानसभेसाठी २८८ उमेदवार देण्याचे जाहीर केले असून उमेदवारांच्या मुलाखतीही घेण्यास सुरुवात केली आहे. त्यातच माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी अंतरवाली सराटी येथे जाऊन जरांगे-पाटील यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आले आहे. या दोन्ही नेत्यांमध्ये आगामी विधानसभा निवडणुकांसदर्भात चर्चा झाल्याची शक्यता नाकारता येणार नाही.

मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण दिले नाही, तर राजकारणामध्ये उतरण्याचा निर्णय मनोज जरांगे-पाटील यांनी घेतला आहे. त्याबाबत सरकारला इशारादेखील दिला आहे. यामुळे जरांगे यांची तयारी सुरू झाली असून दौरे देखील वाढले आहेत. मात्र, मनोज जरांगे यांच्या राजकीय निर्णयामुळे महायुतीसह महाविकास आघाडीचे टेन्शन वाढले आहे. त्यामुळे आता सर्वपक्षीय नेते मनोज जरांगे यांची भेट घेऊन अंदाज बांधत आहेत. या पार्श्वभूमीवर गुरुवारी मनोज जरांगे-पाटील यांच्या अंतरवाली सराटी या जालन्यातील गावामध्ये पृथ्वीराज चव्हाण दाखल झाले होते.

पृथ्वीराज चव्हाण यांनी मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात मराठा समाजाला दिलेल्या आरक्षणासंदर्भात या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. निवडणुकांपूर्वीच मनोज जरांगे-पाटील यांनी आगामी निवडणुकीत उमेदवार उभे करण्याची घोषणा केली होती. मात्र याबाबतचा अंतिम निर्णय अद्याप जाहीर केलेला नाही. यासंदर्भातील घोषणेपूर्वीच पृथ्वीराज चव्हाण आणि मनोज जरांगे-पाटील यांची भेट झाल्याने राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे.

महायुती, मविआच्या टेन्शनमध्ये वाढ

आगामी विधानसभा निवडणुका लढवण्याबाबत मनोज जरांगे-पाटील हे येत्या २९ ऑगस्ट रोजी निर्णय जाहीर करणार होते. मात्र त्यांनी घोषणेची तारीख पुढे ढकलली आहे. उमेदवारांची नावे जाहीर करून त्यांना पाडा किंवा त्याऐवजी मराठा समाजाचा उमेदवार उभा करणार असल्याची घोषणा त्यांनी केली आहे. त्यामुळे महायुतीचे टेन्शन वाढले आहे. त्यातच आता पृथ्वीबाबा आणि जरांगे-पाटील यांच्या भेटीने महायुतीचे टेन्शन आणखीनच वाढणार आहे.

फडणवीसांनी राजीनामा द्यावा - पृथ्वीराज चव्हाण

पृथ्वीराज चव्हाण यांनी बदलापूर घटनेनंतर राज्य सरकार तसेच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. “राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था राखण्यात फडणवीस यांना अपयश आले असून त्यांनी राजीनामा द्यावा. राज्यात सध्या विविध भागात गुन्हेगारी घटना वाढल्या असून यामुळे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा,” अशी मागणी पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे.

मविआचा तिढा सुटला! २६० जागांवर सहमती; २८ जागांवर रस्सीखेच; १-२ दिवसांत जागावाटप जाहीर होणार

पोलिसांवर हायकोर्ट संतापले; अतिरिक्त पोलीस आयुक्तांना हजर राहण्याचे आदेश

रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी; तिकीट आरक्षणाच्या नियमात बदल; १ नोव्हेंबरपासून होणार लागू

Maharastra Assembly Elections 2024: पक्षांतर्गत बंडाळीच्या धोक्यामुळे महायुती, मविआकडून सावध पवित्रा

नागरिकत्व कायद्यातील अनुच्छेद '६ए' वैध; सर्वोच्च न्यायालयाचा बहुमताने निर्वाळा